मुलींकडे बघून अचकटविचकट कमेंट्स करणं, इव्ह टीजिंग हे प्रकार घृणास्पद आहेत, हे सगळ्यांना मान्य; पण ते सुरूच असतात. आता मात्र ‘राइज मुंबई’ चळवळीच्या निमित्ताने ‘इनफ इज इनफ’ असं म्हणून याविरुद्ध आवाज उठवायची तयारी झाली आहे. १६ डिसेंबरला तरुणाई त्यासाठी कीर्ती कॉलेजमध्ये एकत्र जमणार आहे.
एकटय़ादुकटय़ा मुलीवर होणारे अत्याचार हे आता नवीन राहिलेले नाहीत. त्याविरोधात आवाजही उठवला जातो, पण केवळ त्या घटनेपुरताच. काही दिवस निषेधाचे फलक उंचावले जातात आणि मग ती घटना सगळ्यांच्याच विस्मृतीत जाते. पण १६ डिसेंबर २०१२ च्या घटनेने पूर्ण देश ढवळून निघाला. दिल्लीतील त्या सामूहिक अत्याचाराने संपूर्ण महिलावर्ग पेटून उठला. अत्याचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी कायदेशीर लढाई सुरू झालीच, पण संपूर्ण तरुणाईलाही जाग आली आहे. कोणावरही अत्याचार होणार नाहीत, झालेच तर अत्याचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि संबंधित व्यक्तीलाही आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मानसिक बळ दिले पाहिजे या जाणिवेने मुंबईतल्या दोन महाविद्यालयीन तरुणांनी पुढाकार घेत उभी केली ‘राइझ’!
दिल्लीतल्या निर्भयाप्रमाणेच मुंबईतल्या अनेकजणी असतील. शक्ती मिल प्रकरणातील अत्याचारग्रस्त तरुणी वृत्तछायाचित्रकार असल्याने तिने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली, पण तिच्या अगोदर त्याच ठिकाणी त्याच वासनांधांच्या वासनेची शिकार झालेली दुसरी तरुणी मुंबई सोडून निघून गेली होती आणि ती कोणाकडे आपल्यावरील अत्याचाराबाबत बोलू शकत नव्हती. वृत्तछायाचित्रकार तरुणीने तक्रार करताच ती तरुणीही पुढे आली आणि मग वासनाकांडाची अनेक प्रकरणे उघड झाली. मात्र समाजात प्रतिक्रिया उमटल्या त्या ‘या देशाचे काय होणार’, ‘तरुण पिढी भरकटत चालली आहे’ अशा. या प्रतिक्रियांना उत्तर दिले आहे ते या दोन तरुणांनी सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेने! ‘राइझ’ ही कोणतीही सेवाभावी संस्था नाही. ती आहे एक चळवळ. युवा चळवळ, ज्यात महाविद्यालयीन तरुणांनी अशा अत्याचारांच्या विरोधात जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. शहरातील महाविद्यालयीन, नोकरदार तरुणींच्या सुरक्षेसाठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनाच एकत्र येण्याची साद घातली आहे. मुंबईच्या माटुंग्यातील आर. ए. पोदार महाविद्यालयातील नुकुल जैन आणि प्रतीक अय्यर या दोघांनी एक युवा चळवळ सुरू करून ही जागृती करण्याचे आणि युवा पिढीतही सामाजिक जाणिवा कायम असल्याचे भान दाखवून दिले आहे.
सोमवार, १६ डिसेंबर रोजी कीर्ती महाविद्यालयामध्ये त्यांच्या ‘राइझ’ या उपक्रमाद्वारे ते सगळ्या मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध कसा करता येईल, प्रत्येकाने कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कसे सहकार्य केले पाहिजे यासाठी ते सर्वाना जागृत करणार आहेत. ‘मावा’ (मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्युज), लायन्स क्लब ऑफ एसओएल प्रोफेशनल्स या संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. शहरातील ज्या ज्या ठिकाणी तरुणाई प्राधान्याने असते अशा मॉल्स, महाविद्यालये, रेल्वे स्थानके येथे पथनाटय़ांद्वारे आणि प्रचार पत्रकाद्वारे जागृती करून प्रत्येकाला सामाजिक भान जाणवून देणार आहेत. सकाळी ८ ते ९ या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांचे रजिस्ट्रेशन होईल आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळात विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ज्ञांकडून तरुणांना मार्गदर्शन केले जाईल. चला, आपणही स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी एकत्र येऊ या.

एकदा नुकुल, प्रतीक आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला गेले असताना त्यांच्या मैत्रिणींवर टारगट मुलांनी अश्लील कॉमेंट्स केल्या. कॉमेंट्स करून ती मुले निघून गेली आणि ही मुले असहायपणे पाहत राहिली. त्या वेळी आजूबाजूच्या लोकांनीही त्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट असे प्रकार नेहमीच घडत असतात, असे म्हणून दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्या मुलांना देण्यात आला. पण नुकुल आणि प्रतीक यांना स्वस्थ बसवत नव्हते. आपल्यादेखत आपल्या मैत्रिणींची छेड काढली जाते आणि आपण काहीच करू शकत नाही, हेच त्यांना पटत नव्हते. संघर्ष करून काहीही होणार नव्हते. कारण काही महिन्यांपूर्वीच अंधेरी येथे दोघा तरुणांनी आपले जीव गमावल्याचे त्यांच्या लक्षात होते. आपण संपूर्ण समाजाला जागृत करावे आणि त्यातूनच समाजाला भान येईल, या जाणिवेने त्यांनी ही चळवळ उभी केली आहे.

दर वेळी कुणीतरी आता काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. पण आपणच का सुरू करू नये, असं वाटून आम्ही मित्रांसमोर संकल्पना मांडली. सीएचा आणि कॉलेजचा अभ्यास सांभाळत ही चळवळ उभारली. सोशल नेटवर्किंग साइटवरून त्याचा वेगानं प्रसार झाला.
प्रतीक (एसवाय बीकॉम)

मित्र मित्र जमले की आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, वाद-विवाद करायचो. पण असे चारचौघात बोलण्याऐवजी सगळ्यांनी मिळून काही का करू नये, असं एकदा वाटलं आणि ‘राइझ’ची संकल्पना रुजली.
– नुकुल (एसवाय बीकॉम)

Story img Loader