शब्दांकन: श्रुती कदम
जिन्दगी एक संगीत की तरह है
कोई हसकर गाता है तो
कोई रोकर अपना दिल बहलाता है..
‘सावन स्टुडिओ’वर प्रसारित होणाऱ्या ‘टॉकिंग म्युझिक’ या पॉडकास्टमध्ये आर. जे. क्रिती शेट्टी आपल्या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकारांना बोलवून त्यांच्यासोबत संवाद साधतो. या पॉडकास्टमध्ये तो पाहुण्यांना त्यांचा अनुभव विचारतो आणि अनेक गमतीशीर खेळ त्यांच्यासोबत खेळतो. ‘टॉकिंग म्युझिक’ या पॉडकास्टच्या दहाव्या भागात संगीतकार शान बरोबर गप्पा मारून त्याने श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. शान त्याचे अनेक अनुभव या भागात सांगतो. त्याच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्याच्या घरी असलेल्या संगीतमय वातावरणाचा या भागात त्याने उल्लेख केला आहे. लहानपणी शानला संगीतकार होण्याआधी पत्रकार व्हायचे होते, पण कालांतराने तो संगीताकडे वळला. या पॉडकास्टमध्ये शान सांगतो, मी ज्या चित्रपटांसाठी गायलो त्यातील अनेक चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे मी कुठे तरी निराश झालो होतो. तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत. त्यानंतर ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आला आणि तेव्हा मला पुन्हा आत्मविश्वास मिळाला. अजून उत्साहात मी काम करू लागलो’. शानचा हा अनुभव ऐकून आर. जे. क्रितीने ‘जिन्दगी एक संगीत की तरह है.. कोई हसकर गाता है तो कोई रोकर अपना दिल बहलाता है..’ ही त्याची स्वयंरचित शायरी ऐकवून शानचे कौतुक केले.
मी स्वत: लहानपणापासून गातो आहे. मला माझ्या बाबांकडून गायनाचे धडे मिळाले. ‘टॉकिंग म्युझिक’ हा पॉडकास्ट मला आवडला, कारण यामध्ये अनेक संगीतकारांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. पण या भागाची खासियत म्हणजे शान हा माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहे आणि या भागात त्याच्याकडून कधीही निराश झालो म्हणून आपलं काम सोडायचं नाही, हा धडा मला मिळाला. कलाकाराने मनापासून आपली कला सादर करत राहावी.. प्रेक्षक नक्की दाद देतात, हे माझ्या मनात ‘टॉकिंग म्युझिक’ या पॉडकास्टमधला शानचा भाग ऐकून अधोरेखित झालं. – योगेश शिरसाट (संगीतकार)