शब्दांकन: श्रुती कदम
‘इरादा तो सिर्फ दोस्ती का था
न जाने कब तुमसे प्यार हो बैठा’
स्पॉटिफायवर प्रसारित होणाऱ्या ‘तुमने कभी किसी से प्यार किया’ या पॉडकास्टमधील ‘मुझसे दोस्ती करोगी’ या भागात आर. जे. लक्ष्य दत्ता याने त्याच्या आयुष्यात घडलेली एक प्रेमकथा सांगितली आहे. १९९७ साली शाळेत शिकत असताना नवीन वर्गात त्याच्या बाजूला एक मुलगी येऊन बसते. तिचं नाव निधी. शाळेत बडबड आणि मस्ती करणारी निधी शांत लक्ष्यला नेहमी बोलकं करायचा प्रयत्न करते. हळूहळू त्यांची घट्ट मैत्री होते. एक दिवस शाळेला दांडी मारून ते दोघं ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट बघायला जातात आणि तो चित्रपट बघून झाल्यानंतर लक्ष्यला आपणही पहिल्यांदा प्रेमात पडल्याचं जाणवतं. हा भाग संपवताना लक्ष्यने ‘इरादा तो सिर्फ दोस्ती का था, न जाने कब तुमसे प्यार हो बैठा’ या ओळी ऐकवत पहिल्या प्रेमाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा >>> अवकाशाशी जडले नाते: ऐक मानवा तुझी कहाणी!
मारामारी, सासू-सुनांचे भांडण किंवा गुन्हेगारी विश्वावर आधारित काही पाहण्या, वाचण्या किंवा ऐकण्यापेक्षा मला अशा हलक्याफुलक्या प्रेमकथा ज्यामध्ये निरागस भाव उमटतात अशा कथा ऐकायला किंवा वाचायला फार आवडतात. आर. जे. लक्ष्य दत्ता याच्या कानाला मधुर वाटणाऱ्या आवाजात साध्या, छोटया-छोटया प्रेमकथा ‘कभी किसी से प्यार किया’ या पॉडकास्टद्वारे ऐकायला मिळतात. या पॉडकास्टमधील ‘मुझसे दोस्ती करोगी’ या भागात शाळेत खुलणारं प्रेम अगदी साध्या पद्धतीने मांडलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेत शिकत असताना कोणी ना कोणी अशी व्यक्ती येते जी आपल्याला सगळयांपेक्षा जास्त समजून घेते. ही गोष्ट त्याच व्यक्तीवर आधारित आहे. त्यामुळे ती कोणा एकापुरती मर्यादित न राहता बहुतांशी लोक या गोष्टीशी स्वत:ला जोडून घेऊ शकतात. – तिश्मा भामरे, विद्यार्थी