हा लेख मला फक्त रितुपर्णो घोषबद्दल लिहायचा होता, पण अवेळी आत्महत्या करून जिया खान नावाच्या कोवळ्या अभिनेत्रीनी स्वत:ला श्रद्धांजलीत घुसवून घेतलंय. चार-पाच वर्षांपूर्वी ‘सो.कुल’मध्येच कुलजित रंधावाबद्दल जे लिहिलं होतं तेच सगळं दुप्पट पोटतिडकीनं वाटलं. भावना नावाच्या कवितांना तू राक्षस का मानलंस जिया? क्षणिक फोलपणाला तू गळ्याभोवती बांधलंस? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय तू का घेतलास गं.
आजच्या बंगाली चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट, अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील दिग्दर्शक रितुपर्णो घोषचं गेल्या आठवडय़ात आकस्मिक निधन झालं. १९९६च्या जानेवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तो मला पहिल्यांदा भेटला – सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा मित्र म्हणून. त्या वर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये माझे दोन सिनेमे होते. दोघी (मराठी) आणि दि वृंदावन फिल्म स्टुडिओज (इंग्लिश) तर रितूची एक बंगाली फिल्म होती- उन्निशे एप्रिल. आजतागायत मला आवडलेल्या सवरेत्कृष्ट दहा फिल्ममधली एक. गेल्या १६-१७ वर्षांत आवडत्या सिनेमांची नावं बदलली, वरखाली झाली. पण उन्निशे एप्रिल आजही कायम आहे.
आपण एकदम भागच होऊन जातो त्या सिनेमाच्या गोष्टीचा. गुंगच होतो बघताना. एकोणीस एप्रिलला काय झालं, कशामुळे झालं, आता काय होणार- या प्रश्नांचा आपल्यालाही तितकाच पीळ पडतो- जितका त्या सिनेमातल्या पात्रांना अपर्णा सेनसारख्या सिद्धहस्त दिग्दर्शिकेची अभिनयाच्या प्रांतातली जाण आणि सहजता पाहून आपण जितके थक्क होतो. तितकेच देबश्री रॉयच्या खऱ्याहून खऱ्या वाटणाऱ्या परफॉरमन्सनी. या दोघी उन्निशे एप्रिल ही फिल्म, हे नातं तंतोतंत जगल्या आहेत. त्याचं श्रेय त्यांच्या दिग्दर्शकाला रितुपर्णोला द्यायलाच पाहिजे. ही फिल्म केली तेव्हा तो अगदी तरुण म्हणजे ३०-३२ वर्षांचा असणार. त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत, सिनेमा या माध्यमावरची पकड पाहून खरंच अंतर्मुख होतो. खरं तर त्याचा प्रत्येक सिनेमा पाहून आपण गप्प होतो. स्वत:पाशी येतो.
उदाहरणार्थ ‘दहन’. बाकी कलाकारांची नावं आठवत नाहीत, पण इंद्राणी हलदार आणि रितुपर्ण सेनगुप्ता या दोघींनी अक्षरश: तोडलं होतं काम. एखादी कलाकृती बघताना आपण इतके गुंतत जातो की, ही पात्र आहेत, हा अभिनय आहे, त्यांचे कपडे, मेकअप, लायटिंग हे सगळं आपल्याला वेगळं असं जाणवतच नाही. एखाद्या सीनला पर्याय सुचवणं, एडिटिंग, सिनेमाची लांबी, अशा मुद्दय़ांशी आपण जराही थांबत नाही. ती कलाकृती आपल्याला स्थळ, काळाच्या पलीकडे नेते. ही ताकद होती रितुपर्णोच्या दिग्दर्शनाची. प्रेक्षकाला असं इन्व्हाल लावणारे दिग्दर्शक मी तरी फार कमी पाहिलेत. रितूला माणसांची, नात्यांची आणि चित्रपट या माध्यमाची फार प्रगल्भ समज होती. त्या सगळ्या सिनेमांमधल्या पात्रांच्या सुख-दु:खाविषयी आपल्याला आंतरिक आस्था वाटत राहते.
इतक्या कमी काळात त्यांनी एक संस्मरणीय कारकीर्द उभी केली त्यांनी. प्रत्येक गोष्ट मनाचा ठाव घेणारी. त्या गोष्टीसाठी निवडलेल्या सर्व कलाकारांकडून जिवंत अभिनय करून घेणं ही रितूची खासियत. मला कधी त्याच्याकडे काम करायला मिळालं नव्हतं- ही आता आयुष्यभर खंत राहणार मला. एखाद्याच्या सौंदर्यदृष्टीवर पूर्णपणे विसंबून जावंसं वाटत असणार सगळ्या कलाकारांना. ऐश्वर्या राय, रिया सेन यांनी दृष्ट लागण्यासारखी कामं केली आहेत रितूबरोबर. सगळ्या चिंता, प्रसिद्धी, गॉसिप्स हे सगळं बाजूला ठेवून चित्रपटात समरस होण्याचा विश्वास देत असणार रितू सगळ्या कलाकारांना. सर्वच जण त्याच्याकडे काम करण्यासाठी उत्सुक असत.
त्याची पहिली भेट मला स्वच्छ आठवते. अत्यंत मृदू बोलणारा, सावळ्या रंगाची शोभा वाढविणारा, पाणीदार डोळ्याचा एक माणूस. दिल्लीच्या सिरीफोर्ट ऑडिटोरिअमबाहेर ऐन हिवाळ्यात धुक्याच्या लाटा उठत असताना लांब कुठेतरी उन्हाची एक ऊबदार तिरीप आली होती. ओळख झाल्यावर गोड हसला होता तो. प्रेमानी काहीतरी चौकशी केली होती माझी. पांढऱ्याशुभ्र सलवार कुर्त्यांवर खास बंगाली पण अगदी मुलींची वाटेल अशी त्यांनी घेतलेली ओढणी मला जरा विचित्र वाटली होती, तसेच पुरुषांच्या ठरावीक पद्धतीला छेद देणारे लाडिक हातवारे. पुढे काही वर्षांनी तो गे आहे असं कळलं आणि माझ्या तेव्हाच्या बालिश कुतुहलाला पूर्णविराम मिळाला. स्वीकृती आली.
गेल्या वर्षी रितूनी प्लास्टिक सर्जरीनी ब्रेस्ट इन्प्लांट करून घेतल्याचं कळलं. मला त्याचा स्वत:शी चालू असलेला झगडा कळला नाही. स्वीकारायचं- आधी आपण स्वत:ला असतं ना? म्हणजे त्यांनी ते केलं नसेल असं नाही. पण कसेही असो आपण माणूस असतो ना? काळे, गोरे, उंच, बुटके, जाड, लुकडे, आंधळे, अपंग, लेस्बिअन, गे, आशावादी, हरलेले कसेही असलो तरी आपण आपल्याला आहोत तसे मान्य करतो. आपलं माणूसपण निर्विवाद असतं. तहान, भूक, झोप आणि आश्रयाची गरज ही कमी-अधिक प्रमाणात आपल्या सगळ्यांना असते. कपडे कसले, कुठल्या रंगाचे घालावे हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आपण जन्माला आलो त्या संहितेला- शरीरालाच बदलायला जाणं मला फार फॉरवर्ड वाटतं, आक्रमक वाटतं. माणसं नाक, केस, चेहरा सुधारून घेतात ते सौंदर्य उठावदार करण्यासाठी असेल. अधू माणसानं कृत्रिम पाय बसविणे, दृष्टीसाठी डोळ्याचं ऑपरेशन करणं हे अपंगत्वावर मात करण्यासाठी, पण शरीराला कुठलीही व्याधी नसताना- नसलेला एक अवयवच घालून घेणे हट्टीपणाचं वाटतं. इतका हळवा, समंजस रितू स्वत:च्या शरीराला बदलण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत का गेला असावा? तिथे जाईपर्यंत त्याची किती एनर्जी आणि भावना खर्च झाल्या असतील. आपण किती एक्झॉर्स्ट होतो या खासगी, व्यक्तिगत झगडय़ात.
आपल्या मनाला, आयुष्याला समजता नुमजता ते श्रमून जाणं. मला कळतंय अगदी, पण धाप लागल्यावर टाइमप्लीज न घेता, तू निघूनच जावंस रितू? तू? आमच्या भावनांवर फुंकर घालणाऱ्या जाणिवांना संपन्न करणाऱ्या तुझ्यासारख्या विलक्षण दिग्दर्शकांनी इतक्या तरुण वयात अनंतात विलीन होणं आम्हाला फारच विदीर्ण करणारं आहे उन्निशे एप्रिल आता कुठे उगवून माथ्यावर आला होता. असं अवचित मावळणं मनाला पटतच नाहीए. कशाचं ग्रहण लागलं तुझ्या आयुष्याला रितू… भारतीय सिनेमाला कायमच तुझा अभिमान वाटेल आणि माझ्यासारख्या प्रेक्षकांना कायमची हळहळ. की तुझी निर्मिती थांबली. भावपूर्ण श्रद्धांजली.
सो कुल : कोथाय तुमी हृदयेर बोंधु..
हा लेख मला फक्त रितुपर्णो घोषबद्दल लिहायचा होता, पण अवेळी आत्महत्या करून जिया खान नावाच्या कोवळ्या अभिनेत्रीनी स्वत:ला श्रद्धांजलीत घुसवून घेतलंय. चार-पाच वर्षांपूर्वी ‘सो.कुल’मध्येच कुलजित रंधावाबद्दल जे लिहिलं होतं तेच सगळं दुप्पट पोटतिडकीनं वाटलं.
First published on: 14-06-2013 at 12:52 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sad demise of rituporno ghosh