मितेश रतिश जाशी

संग्रहालयातील पायपीट ही ज्ञानार्जनाबरोबरच इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तूंचे दर्शन घडवते. देशातील प्रसिद्ध संग्रहालयाच्या माहितीचा लेखाजोखा आजच्या सफरनामामध्ये.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक

संग्रहालय फिरणे हा लहानपणीच्या सुट्टीमधील एक भन्नाट कार्यक्रम असायचा. हा सफरनामा मनात खूप मोठे कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण करणारा असायचा. संग्रहालयात केलेली वस्तूंची मांडणी ही विशिष्ट हेतूने आणि ठरावीक पद्धतीने केलेली असते हे तिथे जाऊन लक्षात आले. संग्रहालय म्हणजे एकप्रकारे वर्गीकृत प्रदर्शन असते. हा सिस्टमॅटिक डिस्प्ले दिवसभरात खूप काही शिकवून जातो. हडप्पा संस्कृतीपासून ते अगदी अलीकडच्या काळातील पुरातन वस्तू, कलाकृती, चित्रकला, प्रकृती विज्ञान अशा अनेकविध विषयांना स्पर्श करणाऱ्या हजारो कलाकृतींचा खजिना एकाच ठिकाणी पाहायचा असेल तर संग्रहालय फिरल्याशिवाय पर्याय नाही.

संग्रहालयांचे अनेक प्रकार असतात. एखादे संग्रहालय केवळ नाण्यांचे असते, एखादे केवळ चित्रकृतींचे असते, तर उत्खननातील सापडलेल्या वस्तूंनी एखादे संग्रहालय सजलेले असते; पण या साऱ्या वस्तू एकाच जागी पाहायच्या असतील तर आपल्याला थेट मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट द्यावी लागेल. अक्षरश: हजारो कलाकृतींनी हे संग्रहालय समृद्ध आहे. पुरातन वस्तू, कलाकृती, चित्रकला, प्रकृतिविज्ञान अशा अनेकविध विषयांना स्पर्श करणारे हे संग्रहालय आपल्या समृद्ध अशा वारशाचे जतन करणारे आहे. इ. स. पूर्व २००० पासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत हजारो कलाकृतींना या संग्रहालयाने सामावून घेतले आहे. संपूर्ण भारतात कलासंवर्धन आणि जतनाचे कार्य करणारी, एएमएस फाइन आर्ट कॉन्झर्वेशनची पार्टनर-डिरेक्टर मधुरा जोशी शेळके या संग्रहालयाविषयी माहिती देताना म्हणाली, ‘भारत, तिबेट, नेपाळ आणि पौर्वात्य देशांतील या साऱ्या कलाकृती अत्यंत निगुतीने येथे संरक्षित आणि संवर्धित केल्या आहेत. देशभरातील कलाविद्यालयातून मिळालेल्या दुर्मीळ अशा तब्बल दोन हजार मिनिएचर पेंटिंग्जचा अनमोल संग्रह येथे करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुघलकालीन चित्रकृतींचा अनमोल खजानादेखील आहे. प्राचीन भारतीय कलेचा वारसा असणाऱ्या अनेक शिल्पांची स्वतंत्र गॅलरीच इथे दिसून येते. मौर्य आणि गुप्त काळातील अनेक अवशेष कलात्मक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारतीय शिल्पकलेची सुरुवात ज्या हडप्पा संस्कृतीपासून झाली त्या काळातील शिल्पकलेचे अनेक नमुने ही या संग्रहालयाची अनमोल ठेव म्हणावी लागेल. आज या संग्रहालयात सुमारे ५० हजारांहून अधिक वस्तूंचा समावेश दिसून येतो’. या संग्रहालयाचे पुरातन वस्तुसंग्रह, कलासंग्रह, प्रकृतिविज्ञानसंग्रह आणि चित्रसंग्रह असे ढोबळमानाने चार विभाग पडतात, असे सांगत त्याबद्दलची अधिक माहितीही मधुराने दिली. ‘सामुद्रिक वारसा दालन, प्राचीन शस्त्रे दालन आणि नाणीसंग्रह अशी आणखी तीन महत्त्वाची दालने इथे आहेत. नौकावहनाची तांत्रिक माहिती, दुर्मीळ नकाशे याचे दालन आपल्या प्राचीन दळणवळणाबाबतची उत्सुकता शमविणारे आहे. शस्त्र दालनातील अल्लाउद्दीन खिलजीची तलवार, सम्राट अकबराचे चिलखत आणि ढाल हे इथले आणखीन एक दुर्मीळ आकर्षण म्हणावे लागेल. त्या जोडीला असलेल्या इतर अनेक शस्त्रांवरून इतिहासकालीन विपुल शस्त्रभांडारांची कल्पना येऊ शकते. नाणीसंग्रह पाहताना तर त्या त्या काळातील अर्थव्यवस्थेत झालेले बदल हमखास जाणवतात. ब्रिटिश काळातील शासकीय अधिनियमाद्वारे शासकीय जागेत आणि काही वर्षे शासकीय निधीची मदत घेऊन विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आज कार्यरत असणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) या संस्थेने संग्रहालय विश्वात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संग्रहालयाने वेळोवेळी भरवलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शने, आपल्या दालनांची पुनर्निर्मिती, नवीन पुरावशेष व कलाकृती सातत्याने संपादित करून हे संग्रहालय अतिशय सुंदररीत्या सुरू ठेवले आहे’ असेही तिने सांगितले.

हेही वाचा >>> झोपी गेलेला प्रॉडक्टिव्ह झाला!!

पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालय वाड्यापासून खेड्यापर्यंतचा संग्रह, तसेच लाकडी दरवाजे आणि खिडक्या, देव्हारे, सौंदर्य प्रसाधनांचे साहित्य, जुन्या काळातील भांडी, वस्त्र प्रावरणे, खेळणी, पारंपरिक शस्त्रे, देवदेवतांच्या पितळी मूर्ती, विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, पानाचे डबे, चूनाळी, जनावरांचे दागिने, विविध प्रकारची वाद्यो, हस्तिदंती कलात्मक वस्तूंचा अफाट खजिना बाळगून आहे. डॉ दिनकर केळकर यांनी एक छंद म्हणून हा संग्रह एकत्र केला. ज्येष्ठ बंधुंसोबत ते चष्म्याचे दुकान चालवत होते. ऐतिहासिक कविता करत असताना केळकरांना आपल्या वस्तू संग्रहाच्या अनोख्या छंदाने साद घातली. १९२० मध्ये पेशव्यांचे एकेकाळचे सावकार दीक्षित-पटवर्धन यांच्याकडील एक लघुचित्र त्यांनी मिळवले. ही केळकर संग्रहालयाची पहिली कलाकृती ठरली. पुढे ते जुन्या वाड्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले. मदुराईतील जुन्या बाजारात त्यांना तेराव्या शतकातील चौल शैलीतील एक धातूच्या रामाच्या मूर्तीचे मुख मिळाले. त्याच बाजारात त्यांना या मूर्तीचे इतर अवशेषही मिळाले. दोन्हीही खरेदी करून पुण्याला आणल्यावर जोडून घेऊन एक पुरातन राममूर्ती तयार झाली, जी आजही संग्रहालयाची शान आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला मस्तानी महाल नंतरच्या काळात दुरवस्थेत होता. तो जसाच्या तसा आणून, दुरुस्ती करून, त्याला पूर्ववत झळाळी आणून आपल्या संग्रहालयात त्यांनी उभा केला. अशा या केळकरांच्या अफाट संग्रहाला आधी त्यांच्या राजा या, लहान वयातच मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव त्यांनी दिले. ‘राजा संग्रह’ असे संग्रहालयाचे सुरुवातीचे नाव होते. पुढे त्याचे ‘राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन’ आणि तद्नंतर ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव रूढ झाले. राजा दिनकर केळकर यांनी संग्रहित केलेल्या कलाकृती शासनास दान केल्या असता त्यांचा सांभाळ करण्याचे दायित्व शासनाने आर्थिक मदत देऊन केळकर कुटुंबीयांवर सोपवले. अशा अनोख्या पद्धतीनेही संग्रहालयांची वाटचाल राज्यात सुरू राहिली.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कलेचा वारसा मिरवणारे एक सुंदर शहरवजा गाव म्हणजे औंध. देशविदेशात औंध ओळखलं जातं ते तिथल्या नितांतसुंदर संग्रहालयामुळे. औंध संस्थानातील श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे देशातील इतर संग्रहालयांपेक्षा थोडेसे वेगळे म्हणावे असे आहे. इथे संग्रहित आहेत आपल्या महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरातील अस्सल, परंतु दुर्मीळ चित्रकृती, शिल्पकृती आणि काही प्रसिद्ध चित्रे, शिल्पकृतींच्या प्रतिकृती. या कलाकृती साकारल्यात प्रत्यक्ष त्या त्या काळातील जगप्रसिद्ध कलाकारांनी. या कलाकृतींना इथे महाराष्ट्रात, औंधला कष्टपूर्वक, कलात्मकतेने, तितक्याच सौंदर्यदृष्टीने जमवलंय एका मराठी संस्थानिक राजाने. श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी हे औंध संस्थानचे राजे होते. हे राजे कलारसिक, कला-इतिहास अभ्यासक, कलासंग्राहक, छायाचित्रकार, कलाकारांचे आश्रयदाते आणि महत्त्वाचे म्हणजे स्वत: एक सिद्धहस्त चित्रकार होते.

के आर्ट कॉन्झर्वेशनची लॅब डिरेक्टर किर्ती सतीश जोशी या संग्रहालयाविषयी माहिती देताना सांगते, ‘या संग्रहालयात इतिहासाचे पाषाणरूपी साक्षीदार आहेत. अप्रतिम जैन, वैष्णव, गजलक्ष्मी इत्यादी मूर्तींचे अवशेष, प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या शिळा – ज्याला ‘वीरगळ’ म्हणतात, पतिनिधनानंतर सती गेलेल्या वीरांगनांच्या ‘सतीशिळा’, ‘शिलालेख’ आणि इतर अवशेष आहेत. इथली सर्व शिल्पे नैसर्गिक प्रकाशात उजळलेली असतात. इथल्या संग्रहात काही दिग्गज कलाकारांनी साकारलेली अस्सल शिल्पे, जागतिक कीर्तीच्या कलाकारांनी साकारलेल्या महान कलाकृतींच्या हुबेहूब प्रतिकृती, यातल्या काही प्रतिकृती तर थेट १५-१६व्या शतकातल्या अलौकिक ठरलेल्या ख्यातकीर्त कलाकारांच्या आहेत. भांडी, कापडावरील नक्षीकाम, गालिचे, शस्त्रास्त्रे, तिबेटी, चिनी, आफ्रिकन कलावस्तू अशा नानाविध दुर्मीळ ऐतिहासिक कलावस्तू पर्यटकांना इथे पाहायला मिळतात’. प्राचीन भारतीय चित्रकलेतील लघुचित्रांचा अर्थात ‘मिनिएचर पेंटिंग्ज’चा वेगळा असा खजिना इथल्या संग्रहालयात असून यात मुघल, पहाडी-कांग्रा, राजस्थानी, पंजाब आणि दख्खनी चित्रशैलीच्या विजापूर, मराठा चित्रशैलीतील चित्रांचा समावेश असल्याची माहितीही तिने दिली. ‘यात काही रागमालाचित्रे, देवी-देवतांची चित्रे तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर काव्य करणाऱ्या कविभूषणाचे चित्र, छत्रपती श्रीशाहूमहाराज, पेशवे आणि काही मराठेशाहीतील प्रमुख सरदार यांची दुर्मीळ व्यक्तिचित्रे आहेत, परंतु या चित्रसंग्रहात सर्वात महत्त्वाचा आणि अद्वितीय आहे तो ‘किरातार्जुनीय’ या महाकवी कवी भारविच्या संस्कृत महाकाव्यावर आधारित लघुचित्रांचा देखणा चित्रसंच. महाकवी भारवि हा सहाव्या शतकातील एक प्रतिभासंपन्न संस्कृत कवी होता. महाकवी भारविच्या ‘किरातार्जुनीय’चा जवळपास शंभर चित्रांचा रंगीत संच अठराव्या शतकातील पहाडी चित्रकारांनी चितारला आहे. याच संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजा रवी वर्मा यांची तीन मूळ चित्रं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर गोया आर्टिस्ट व हेन्री मूर याचे शिल्पही इथे पाहायला मिळते’ असे किर्तीने सांगितले.

‘संग्रहालय म्हणजे ‘ना नफा’ तत्त्वावर चालणारी, समाजाच्या सेवेत कार्यरत असणारी अशी संस्था जी सर्वसामान्यांसाठी खुली असते. आणि ती वस्तू किंवा संकल्पनांचा संग्रह करून त्यांचे जतन व संवर्धन, तसेच त्याबद्दल संशोधन करून त्यांचे प्रदर्शन, जनसंवाद घडवून आणते आणि यातून तयार होणारे ज्ञान शैक्षणिक व करमणुकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवते’ असे मत ‘एएमएस फाइन आर्ट कॉन्झर्वेशन’चे डिरेक्टर अनंत शेळके व्यक्त करतात. ‘प्रत्येक संग्रहालयाच्या निर्मितीमागे एक विशिष्ट उद्दिष्ट व कार्यकारणभाव असतो. जसे- बाहुल्यांच्या संग्रहालयात लहान मुलांचे भावनाविश्व व त्याच्याशी निगडित वस्तू असतात, परिवहनविषयक संग्रहालयात मानवी प्रवासाची साधने पाहायला मिळतात, एवढेच नाही तर मुंबईत ‘कुष्ठरोग’ या विषयाला वाहिलेले संग्रहालय त्यामागचा विशेष उद्देश अधोरेखित करताना दिसते.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी निर्माण झालेल्या बहुसंख्य संग्रहालयांचा उद्देश कलात्मक असणाऱ्या पुरावशेषांचे जतन हा होता. आज आधुनिक काळात कलामूल्यांबरोबरच मानवी इतिहासात तंत्रज्ञानाची प्रगती अधोरेखित करणाऱ्या अश्मयुगीन हत्यारे, साध्या मडक्याच्या भांड़यांचे तुकडे, विविध काळांतील शस्त्रे, अवजारे, यंत्रं, इतकेच नव्हे तर फॉसिल्सच्या स्वरूपात असणारे प्राण्यांच्या पायांचे ठसे किंवा विष्ठा अशा वस्तू वा घटक हेही संग्रहालयातील वस्तूविषय असतात’ असे त्यांनी नमूद केले.

आज संग्रहालये केवळ भूतकाळातील कलाकृती ठेवण्याचे आणि प्रदर्शित करण्याचे ठिकाण राहिलेले नाही; तर भविष्यातील पिढ़यांसाठी मानवजातीच्या इतिहासाचे ते भांडार असून, त्याविषयी माहिती देण्यासाठी संग्रहालय हे एक माध्यम आहे. संग्रहालये ही केवळ वस्तू ठेवायची ठिकाणे नाहीत तर ती ज्ञानप्राप्तीची केंद्रे असतात. तिथल्या वस्तूंना विशिष्ट संदर्भ असतात. आपल्याला इतिहासाशी तसंच वेगवेगळ्या विषयांशी जोडून घेणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे, त्यामुळे इथे सफरनामा करताना कायमच ज्ञानप्राप्ती होते व दिवस सत्कारणी लागतो.

viva@expressindia.com

Story img Loader