नवनवीन गोष्टी समजून घेऊन आपल्या मेंदूरूपी पोतडीत भर टाकणे ही टेक्नोसॅव्ही काळाची गरज. विचारांचं क्षितिज व्यापलं की कृतीतही विशालता येते. इंटलेक्च्युअल वाटू लागलं ना- घाबरू नका. ‘बॅचलर ऑफ सुविचार स्टडीज’ असा कोणताही विद्यापीठीय कोर्स आम्ही जॉइन केलेला नाही. नुकत्याच दाखल झालेल्या एका मराठी सिनेमाच्या निमित्ताने अनेक जुन्या गोष्टी नव्याने उमगल्या. व्हायरल होणे म्हणजेच सैरावैरा विहरणे. अशाच एका सैरा(ट)वैरा झालेल्या कहाणीतून घेतलेला बोध.
* सैराट, झिंगाट, याड लागलं असे शब्द आंग्ल मेट्रो सिटीजमध्ये आम्ही उच्चारले, तर चेहऱ्यावर ‘सो रबीश’ असा भाव आणि ‘दीज फेलोज यक्स’ असं आम्हाला ऐकायला मिळालं असतं; पण आता हेच शब्द ऱ्हिदमिक आणि ग्लॅमरस झालेत. ‘फीलिंग सैराट विथ अमुकतमुक अॅट अबक मल्टिप्लेक्स’ असं फेसबुकी स्टेटस टाकणं म्हणजे ‘इट्स काइंडाकूल मॅन’ ठरू लागलंय. आपल्या बोलीभाषेची, लहेजाची, हेलाची लाज वाटू न देता त्यांना ग्लोबल अपील देणं हे आपल्याच हाती आहे.
* आयुष्यात कोणत्या टप्प्यावर काय गोष्टी कराव्यात आणि उगाच सैराट होऊ नये अशा स्वरूपाची काव्यं आणि गद्यही तुमच्यासमोर येऊ शकतं. पूर्ण वाचून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करावा. चित्रपटाच्या निमित्ताने एवढा विचार करून त्यांना सुचलं आणि त्यांनी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं ही स्तुत्य गोष्ट लक्षात घ्यावी.
* चित्रपट तयार करणं कठीण गोष्ट नाही. चित्रपटाचं प्रमोशन करणं ही त्याहून अवघड गोष्ट आहे. न्यूजपेपर, न्यूज चॅनेल्स, वेबसाइट्सच्या कचेऱ्यांचे उंबरे झिजवल्याशिवाय, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर अशा सोशल मीडियावर टिझर, ट्रेलर, प्रोमो सातत्याने दिल्याशिवाय, तसंच कॉलेज गॅदरिंग, शोभायात्रा, मिरवणुका, हळदीकुंकू, कट्टे, परिसंवाद इथे जाऊन घसा खरडावून सांगितल्याशिवाय आणि एकुणातच चहूबाजूंनी सामाजिक दबाव अर्थात पीअर प्रेशर आणल्याशिवाय मराठी माणूस पिक्चरला थिएटरात जात नाही.
* चित्रपट आवडणं, नावडणं सापेक्ष आहे. समजा तुम्हाला सैराट आवडला नाही. हे सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी विचार करा. तुमचे आडनाव, कौटुंबिक पाश्र्वभूमी, सामाजिक स्तर, अनुभवविश्व यावरून तुम्हाला सोशल मीडिया अॅब्यूजला सामोरे जायला लागू शकते. वास्तव जगाचे टक्केटोणपे झेललेल्या नागराजदादांचीही पिक्चरला चांगलंच म्हणा अशी सक्ती नाही. मतमतांतरांसाठी ते ओपन आहेत, पण चित्रपटाचे अघोषित ठेकेदार तुमचा उद्धार करू शकतात. सुखवस्तू कुटुंबातील व्यक्तींसाठी आम्ही विशेष अलर्ट जारी करत आहोत. पुढच्या वेळी पिक्चर काढताना दिग्दर्शक-नागराज एवढंच लिहावं अशी आम्ही पत्राद्वारे विनंती करणार आहोत दादांना.
* चित्रपट पाहण्याआधी आणि पाहल्यानंतर – ‘चित्रपट रसास्वाद आणि अभ्यास’ या विषयावरची अगणित पुस्तकं वाचावीत. किंडलवर वाचलीत तर बेस्टच. सोशल मीडियावर इंटलेक्च्युअल चर्चा करताना पुस्तकातले इनपूट उपयोगी पडतात. कमर्शिअल सिनेमा, आर्ट अँड पॅरलल सिनेमा, फेस्टिव्हलसाठीचा सिनेमा या व्याख्या अगदी बायहार्ट कराव्यात.
* असंख्य धार्मिक उत्सव, लग्नसोहळ्यात डीजेवर वाजवता येईल असं संगीत चित्रपटातून आपल्याला मिळतं. चित्रपटाच्या तिकिटाव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम न देता हे आपल्याला मिळालंय यासाठी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावी.
* चित्रपटाची कथा, पात्रं काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तव जगाशी संबंध नाही याची उजळणी करण्यापेक्षा नॉस्टॅल्जिक व्हावे. इमोशनली कनेक्ट होत संबंध जोडणं तुमच्या हाती आहे. पडद्यावरच्या गोष्टीने सुन्न होणं ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे; पण आपण सुन्न झालो हे तात्काळ तमाम नेटिझन्सना सांगणे आपले आद्यकर्तव्य आहे हे विसरू नका.
* निसर्गरम्य लोकेशन्ससाठी बॉलीवूड चित्रपटांनी पार स्वित्र्झलडपासून मॉरिशसपर्यंत धाव घेतली. अनेक मराठी चित्रपटांनीही देशाची वेस ओलांडली. त्या आटपाट नगरांच्या तुलनेत आपलं गाव, शहर कसं बॅकवर्ड असा किंतू मनात साचतो. आपली गावंही सुरेख आहेत आणि ती छान दिसू शकतात यासाठी ७० एमएमचा पडदा आणि दोन तास पन्नास मिनिटांची कथा गुंफावी लागते. घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावणाऱ्या मेट्रो सिटीजमध्ये ‘करमाळा’ अशी एसटीची पाटी तुम्हाला क्षणिक किक देऊ शकते.
* अभिनयाचे धडे देणाऱ्या संस्था राज्यात आणि देशभरात कार्यरत आहेत. या संस्थांमधून प्रशिक्षित असंख्य गुणी कलाकार सक्षमपणे काम करत आहेत. परंतु चंदेरी दुनियेपासून कोसो दूर असणाऱ्या अनेकांना या चमचमत्या जगाचे आकर्षण असते. कथानकाची गरज असेल तर आपापल्या व्यापात गढलेल्या तुमच्यातूनही अभिनेता/ अभिनेत्री घडू शकतो/शकते. अर्थात सर्वस्वी नव्या विश्वाला भिडण्याची तयारी आणि आत्मविश्वास हवा. ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ असा नखरेलपणा उपयोगाचा नाही.
ता.क : सदरहू लिखाण चित्रपट पाहिलेल्या नेटिझन्सच्या पोस्ट्स, कमेंट्स, लेख, निबंध, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ या व्हायरल झालेल्या गोष्टींच्या आधारे करण्यात आले आहे. तुमच्या मताशी साधम्र्य आढळल्यास ‘सहमतीची एकी’ सेगमेंटनुसार आनंद आणि समाधान व्यक्त करावे!