|| शेफ अदिती लिमये कामत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जून महिन्यात ‘शेफखान्या’ची खाद्यमैफल सजवायला एक स्पेशल शेफ सज्ज झाल्या आहेत. शेफ अदिती लिमये कामत हे त्यांचं नाव. अदितीचं नाव सध्या हॉटेलिंग क्षेत्रात चांगलंच गाजतंय. मुंबईत सर्वात पहिला बार सुरू करणारी महिला म्हणून अदिती ओळखली जाते. ‘कॅफे ओपन हाऊस दादर’ असं या पबचं नाव आहे. ‘द केक स्टुडिओ’, ‘होम शेफ’ दादर, बेलापूर आणि अंधेरी येथील ‘सिझल हाऊस’ आदी रेस्टॉरंट्सची सर्वेसर्वा शेफ अदितीच आहे. अदितीचे वडील शेफ राहुल लिमये हे गेले ४० वर्ष हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत, तर अदिती ख्यातनाम शेफ डॉ. विठ्ठल कामत यांची स्नुषा आहे. दोन्ही घरांत खाद्यमय वातावरण असल्याने त्यातच रमलेली अदिती शेफखान्यात खास वाचकांच्या आग्रहास्तव ट्रेंडिंग डाएटवर गपशप करणार आहे. सीरिजचा श्रीगणेशा ‘सॅलड ट्रेंड्स’ने होईल. अदितीसारख्या सळसळत्या उत्साहाच्या, सर्जनशील शेफबरोबर महिनाभर हेल्दी खाद्यपदार्थाची सफर आपल्याला घडणार आहे.
‘लोकसत्ता व्हिवा’च्या वाचक वर्गाला माझा नमस्कार! या अगोदरसुद्धा मी वेगवेगळ्या सीरिज, लेख यांच्या माध्यमातून तुम्हाला भेटत होते. आता मात्र पूर्ण महिनाभर तुमची-आमची भेट होणार आहे. भारतात डाएट, हेल्दी जीवन आदी संकल्पनेची मुळं घट्ट रुजू लागली आहेत. त्यामुळेच ट्रेंडिंग डाएट हा आगळावेगळा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा विचार केला.
मूळ लॅटिन शब्द ‘सॅल’ म्हणजे मीठ. या शब्दापासून उगम पावलेल्या ‘सॅलड’चा उपयोग आपल्या अन्नात मीठ आणि तेल लावलेली पालेभाजी या स्वरूपात झाला. फक्त आरोग्यासाठी उत्तम म्हणून नव्हे, तर सॅलडचे इतर खूप फायदे आहेत. एकाच पदार्थात भरपूर फळभाज्यांचा समावेश असणे, बनवण्यास सोपे, स्वस्त आणि चविष्टपणा ही सॅलडची वैशिष्टय़े. याव्यतिरिक्त फळभाज्यांत, विशेषत: कच्च्या फळभाज्यांत फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करणे, तसेच वजन कमी करणे यासाठी सॅलड गुणकारी ठरते. सॅलडमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे कर्करोगाच्या उपचारात आणि हृदयविकारासाठीही ते गुणकारी आहे. जेवणात याचा समावेश म्हणजे एकूण कॅलरीज कमी! म्हणून वजन कमी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
एकाच वेळी भरपूर फळभाज्या खायच्या म्हणजे सॅलडहून दुसरा चांगला पर्याय नाही. शक्य असेल तेवढी आपल्या सॅलड्समध्ये विविधता आणावी. म्हणजे भरपूर पोषक तत्त्वं आणि जीवनसत्त्वं मिळतात. सॅलडच्या प्रत्येक घटकाचे पोषक तत्त्व वेगवेगळे असते. त्यामुळे यामधल्या फळभाज्यांचे प्रकार वेळोवेळी बदलत राहणे चांगले. याने रुचिपालटसुद्धा होतो आणि सारखे सारखे तेच खाल्ल्यामुळे कंटाळा येत नाही.
ढोबळमानाने सॅलडचे तीन प्रकार असतात
ताजे (कच्चे) सॅलड : सॅलड म्हटले की बहुतेकांच्या मनात ताज्या कच्च्या भाज्यांचे मिश्रण हाच विचार डोकावतो. एक महत्त्वाचा घटक जो विसरला जातो तो म्हणजे कुरकुरीतपणा. तो त्यात आणण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, बदाम, काजू, सूर्यफुलाच्या बिया आणि कुरकुरीत भाज्या यांसारख्या घटकांचा वापर केला जातो.
ताजे सॅलड बनवायला सोपे जावे म्हणून खालील यादीतून तुम्हाला घटकांची निवड करता येईल.
१. बेस (खालचा) भाग : मिश्र पालेभाज्या.
२. मिश्र भाज्या : रंगीत सिमला मिरची, काकडी, मुळा, मटार, गाजर, बीट.
३. ऐवज भरण्यासाठी : काबुली चणे, मिश्र डाळी, रताळे, हातसडीचा तांदूळ, बीट.
४. टेक्श्चर (पोत) येण्यासाठी : चिरलेला बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया.
५. प्रोटीनसाठी : पनीर, उकडलेली अंडी, ग्रिल्ड चिकन.
६. टॉपिंग्ज : खारट – सुकवलेले टोमॅटो, ऑलिव्ह, चीज.
गोड – सफरचंदाच्या फोडी, द्राक्षे, डाळिंबाच्या बिया.
तिखट – लाल मिरची.
इतर : ताजा पुदिना, कोथिंबीर, तुळस (बेसिल), कांदा, पातीचा कांदा, काळी मिरी, जाडे मीठ.
७. ड्रेसिंगसाठी : शुद्ध ऑलिव्ह तेल. यात आंबटपणा आणण्याचे चांगले प्रमाण म्हणजे ३ भाग व्हिनेगरसाठी तेलाचे ३ भाग. हे एकजीव होईपर्यंत घुसळून घ्यावे.
शिजवलेले सॅलड : यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या भाजून किंवा वाफवून वरील टॉपिंग्जमध्ये दिलेल्या कोणत्याही पदार्थाबरोबर मिक्स करू शकता. यासाठी काही भाज्या म्हणजे वांगी, रंगीत सिमला मिरची, मशरूम, रताळी, ब्रोकोली आणि कोबी.
तयार सॅलड – हे आपल्या नजीकच्या रेस्टॉरंटमधील सॅलडसारखेच असते. याचा एक फायदा म्हणजे आठवडय़ाच्या सुरुवातीला एकदमच बनवून ठेवता येते आणि हवे तसे पालेभाज्या, हातसडीचा तांदूळ, किनोआ, चिरलेले बदाम त्यात घालून खाता येते.
भाजलेला बटाटा आणि चण्याचे सॅलड:
साहित्य: ९०० ग्रॅम बटाटे / रताळी (सोलून तुकडे केलेले), २ चमचे ऑलिव्ह तेल, १/२ चमचा मीठ, १/४ चमचा काळी मिरी पूड, २५० ग्रॅम शिजवलेले काबुली चणे, उभे पातळ चिरलेले ६ लाल कांदे, चिरलेली कोथिंबीर ७५ ग्रॅम.
विनिग्रेटसाठी: ३ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, १ चमचा डिजॉन मस्टर्ड, बारीक चिरलेली लसूण १ पाकळी, १/४ चमचा बारीक चिरलेले आले, १/४ चमचा जिरेपूड, १/४ चमचा मीठ, १/४ चमचा धन्याची पूड, १/४ चमचा लाल तिखट पावडर, ३/४ चमचा हळद, १/३ कप ऑलिव्ह तेल.
कृती: ओव्हन २२० डिग्री सेल्सियसपर्यंत गरम करून घ्या. बटाटे, मीठ, मिरपूड आणि ऑलिव्ह तेल मिसळून घ्या. अॅल्युमिनियम फॉइल लावलेल्या बेकिंग ट्रेवर बटाटे लावून सोनेरी रंगावर मऊ शिजेपर्यंत ओव्हनमध्ये भाजून घ्या. विनिग्रेटसाठी व्हिनेगर, मस्टर्ड, लसूण, आले, जिरे, मीठ, धन्याची पूड, लाल तिखट पावडर आणि हळद मिसळून घ्या. मग हळूहळू त्यात तेल घाला आणि एकजीव होईपर्यंत मिसळा. याचा अर्धा भाग बटाटय़ांबरोबर मिसळून घ्या आणि काबुली चणे, कांदा आणि कोथिंबीर घालून थोडे थंड होऊ द्या. उरलेले वीनिग्रेट मिसळून वाढा.
पाप्रिका चिकन/बीन सॅलड – लेमन योगर्ट ड्रेसिंगसह
साहित्य: ३ लहान गाजरे (सोलून, २ इंची तुकडे कापून), १ जुडी मुळा, (पाने काढून, अर्धे चिरून), ३ टोमॅटो तुकडे केलेले, १ लहान काकडी (तुकडे केलेली), ४ चमचे ऑलिव्ह तेल, १/२ चमचा मीठ, १ चमचा प्रत्येकी – पाप्रिका (सुक्या लाल मिरचीची भरड पूड), धने पूड, जिरेपूड, हळद, १/२ चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ चमचा प्रत्येकी बारीक चिरलेले लसूण आणि आले, २ तमालपत्र, २ वेलदोडे, २ दाणे काळी मिरी, १ पौंड चिकन ब्रेस्ट्स (हाडे आणि स्किन काढलेले) किंवा ७५० ग्रॅम मिश्र बीन्स, २०० ग्रॅम लेटय़ूस, ६० ग्रॅम डाळिंबाचे दाणे.
चटकदार लेमन योगर्ट ड्रेसिंग: ७५ मिली ग्रीक दही, २ चमचे ताजी साय (क्रीम फ्रेश), २ चमचे लिंबाचा रस, १ चमचा लिंबाची किसलेली साल, २ चमचे मध, १/४ चमचा सुक्या लाल मिरचीची भरड पूड, मीठ आणि मिरपूड चिमूटभर.
कृती: २ चमचे तेल आणि १/४ चमचा मिठासह गाजर, मुळा, टोमॅटो आणि काकडी मिसळून घ्या. ग्रीक दही, ताजी साय, लिंबाचा रस, लिंबाची किसलेली साल, सुक्या लाल मिरचीची भरड पूड, मीठ आणि मिरपूड एकजीव होईपर्यंत मिसळून घ्या. मीठ, पाप्रिका, हळद, धने पूड, जिरे पूड, आले, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र करून ते मिश्रण चिकनवर लावा किंवा बीन्समध्ये मिक्स करा. चिकनसाठी मोठय़ा नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र, वेलदोडे आणि काळी मिरी घालून त्यात चिकन मंद आचेवर शिजू द्या. ५ मिनिटे थंड करून मग त्याचे स्लाइस करून घ्या. ड्रेसिंगबरोबर लेटय़ुस मिक्स करून त्यात गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो आणि डाळिंबाच्या बिया घालून वरून मिश्र बीन्स किंवा चिकन घालून वाढा.
ब्लॅक बीन्स आणि कैरीचे सॅलड
साहित्य: ६० मिली ऑलिव्ह तेल, ६० ग्रॅम बारीक चिरलेला पांढरा कांदा, २ चमचे लिंबाचा रस, ४ चमचे सोया सॉस, १/२ चमचा बारीक किसलेले आले, १ घट्ट अर्धी कच्ची कैरी- सोलून लांबट बारीक तुकडे केलेली, २०० ग्रॅम ब्लॅक बीन्स, १२५ ग्रॅम प्रत्येकी लाल सिमला मिरची आणि लाल कांदा (उभा पातळ चिरलेला), २ ते ६ बारीक चिरलेल्या थाई बर्ड्स आय मिरच्या, प्रत्येकी ३ चमचे बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, ३ चमचे भाजलेले शेंगदाणे, पुदिना आणि कोथिंबिरीचे तुरे, उभी पातळ चिरलेली लाल मिरची.
कृती: मध्यम आचेवर तेल गरम करून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. लिंबाचा रस, सोया सॉस आणि आले मिक्स करून घ्या. कैरीचे तुकडे, ब्लॅक बीन्स, लाल सिमला मिरची आणि लाल कांदा आणि बर्ड्स आय मिरच्या त्यात एकजीव करून घाला. त्यात बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. तळलेले कांदे, शेंगदाणे, लाल मिरची, पुदिना आणि कोथिंबीर घालून वाढा.
पनीर आणि किनोआ सॅलड:
साहित्य: २ छोटे बीट, २ छोटी वांगी, २ चमचे ऑलिव्ह तेल, १/२ चमचा मीठ, चिमूटभर जिरे, २२५ ग्रॅम पनीर (काप काढलेले), ५०० मि.ली शिजवलेला किनोआ (१३२ ग्रॅम कच्च्या किनोआपासून तयार केलेले), ११५ ग्रॅम रॉकेट सॅलडची पाने, २ संत्री (सोलून फोडी केलेली).
मसालेदार बदामासाठी: ७५ ग्रॅम बदाम, १ चमचा मध, १/२ चमचा मिरची पावडर, १/४ चमचा मीठ, १ चिमूट मिरपूड.
ऑरेंज विनिग्रेटसाठी: १ चमचा मस्टर्ड, १ संत्र्याचा रस आणि किसलेली साल, ३ चमचे बल्सामिक व्हिनेगर, २ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, २ चमचे मध, १/४ चमचा ताजी मिरपूड, चिमूटभर मीठ, ६० मिली लिटर ऑलिव्ह तेल.
कृती: ओव्हन २२० डिग्री सेल्सियसपर्यंत गरम करून घ्या. बीट आणि वांगे अॅल्युमिनियम फॉइलमध्ये एक एक करून गुंडाळून त्यावर थोडेसे तेल आणि जिरे घालून घ्या. एक भांडय़ात चिमूटभर मीठ, तेल आणि थोडीशी बडीशेप मिसळून बीट आणि वांग्यांसह अॅल्युमिनियम फॉइल लावलेल्या बेकिंग शीटवर ३०-४५ मिनिटे बेक करून घ्या. दोन्ही बाजूंनी बीट आणि वांगी शिजवून घ्या. १०-१५ मिनिटे थंड झाल्यानंतर सोलून त्याचे जाडसर काप करून घ्या.
विनिग्रेटसाठी मस्टर्ड, संत्र्याचा रस आणि त्याच्या सालीचा कीस, बल्सामिक व्हिनेगर, लसूण, मध, मिरपूड आणि मीठ एकत्र करून मिसळून घ्या. त्यात हळूहळू तेल घालून एकजीव करून घ्या.
बदाम, मध, मिरची पावडर, मीठ आणि मिरपूड मिसळून घ्या. एका बेकिंग शीटवर १८० डिग्री सेल्सियस तापमानाच्या ओव्हनमध्ये १५ मिनिटांसाठी त्यावर ग्लेझ येईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर ते ग्रिल करून घ्या.
एका भांडय़ामध्ये शिजवलेला किनोआ, रॉकेटची पाने आणि विनिग्रेट मिसळून घ्या. सॅलडचे ४ भाग करून प्रत्येक भागावर पनीर, संत्र्याच्या फोडी व बीट आणि वांगी घालून, सजावटीसाठी वरून बदाम घालून सव्र्ह करा.
viva@expressindia.com