सारंग साठय़े
मी कॉलेजमध्ये असताना ऑनलाइन एक लेख वाचला होता. ‘मून लँडिंग अ हॉक्स’ तो वाचल्यावर त्यातील खातरजमा न करता मी ठरवलं की कॉलेजमध्ये त्यावर आधारित ‘बिझनेस कम्युनिकेशन’च्या तासाला एक ‘प्रेझेन्टेशन’ द्यायचं. अर्थात हे तितकं सोपं नव्हतं. कारण मला सभाधीटपणा नसल्याने म्हणजेच ‘स्टेज फिअर’मुळे त्या वेळी ते ‘प्रेझेन्टेशन’ देता आलं नाही.
माझ्यासमोर प्रश्न होता. आता हा सभाधीटपणा स्वत:त बाणवायचा कसा? उत्तर मिळालं, की अभिनयाची कार्यशाळा गाठायची. ठरलं. यापुढे अभिनय शिकायचा आणि मी जायलाही लागलो. पण हे सारं करताना डोक्यात दुसरा विचारही होता की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता काही करायला जायचं नाही. म्हणजे जी ऑनलाइन कथा वाचली, ती किती खरी होती, हे मला ठाऊक नव्हते. कुठल्या तरी ‘उथळ थिअरी’वर मी आंधळेपणाने विश्वास ठेवला होता. कारण मला त्या कथेतील ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ समजावून घ्यायची होती, तर मग अभ्यास गरजेचा होता.
इंटरनेटवरच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची माझी सवय सुरुवातीला काही केल्या जात नव्हती. असे अनेकदा झाले होते, की ती माहिती खोटी होती, तरीही ती मी खरी मानून चाललो होतो. कारण इंटरनेटवर येणारी भरमसाट माहिती ही खात्रीची असेलच असे नाही. त्यातून काही जण स्वत:चा प्रचारही करीत असतात. यासाठी दुसऱ्याविरुद्ध ओढूनताणून खोटं सांगायचं हे त्यातील अगदी सहज लक्षात येऊ शकणार नाही, असं सूत्र असतं. अर्थात प्रसिद्धी ही दुधारी असते. ती मिळायला लागली की बरं वाटतं, पण एकदा तिने तुमच्या खासगी आयुष्यात प्रवेश केला, की ती न मिळेल तर बरं, असं वाटू लागतं. इंटरनेट हेसुद्धा या अशाच प्रसिद्धीचं भावंड आहे. त्यातही इंटरनेट खूप मोकाट आहे. त्यावर कुणाचा अद्याप तरी वचक नाही. त्यावर विशिष्ट अशी बंधने नाहीत. त्यामुळे अति इंटरनेटचा धोका वाढतो.
नियम नसतील तर प्रत्येक जण बेबंदच वागणार. अगदी आपल्या समाजाच्या सुरुवातीचा काळ आठवा. बरं त्याला समाज तरी का म्हणायचं? कारण त्या निव्वळ टोळ्या होत्या. रानटी टोळ्या. आत्मसंरक्षणासाठी एकटय़ा दुकटय़ाने नव्हे तर साऱ्यांनी मिळून समोरच्यावर तुटून पडायचं. हे या टोळ्यांचं लक्षण होतं. पण हळूहळू त्यांना हे जड जाऊ लागलं. कारण त्यात त्यांचं स्वत:चं अतोनात नुकसान व्हायचं. मग कळालं की नाही, असं बेबंद वागून चालणार नाही. त्यासाठी त्यांनी स्वत:चे काही अलिखित नियम बनवले. मग या नियमांना बांधील राहून टोळ्या समाज म्हणून वावरू लागल्या. मग हाच समाज नीतिमत्ता बाळगू लागला. त्यातून मग चांगलं की वाईट, खरे की खोटे याची जाणीव त्यांना होऊ लागली.
सध्या म्हणजे इंटरनेटच्या काळात आपण असेच टोळ्यांच्या संस्कृतीत म्हणजे संक्रमणावस्थेत वावरत आहोत. अगदी दुसऱ्या भाषेत सांगायचं तर ‘ट्रान्झिशनल फेज’मध्ये आहोत. रोज सकाळी उठलो की आपलं ‘व्हॉट्सअॅप’ फेकन्यूज, अर्थात बनावट बातम्यांच्या, छायाचित्रांनी भरलेलं असतं. याला मी एक प्रकारचा कचराच म्हणेन. बरं हा मोबाइलमध्ये दिवसेंदिवस साठत जाणारा कचरा आपण कचरा आहे, हे जाणून घ्यायलाही तयार नसतो. तो स्वत:च्या सोयीने पुढे पाठवतो. अग्रेषित करतो, म्हणजे ‘फॉरवर्ड’ करतो. पण त्याही आधी त्यावर मनातील उद्रेक व्यक्त केला जातो. पण हे सारं करताना आपल्याला ठाऊक नसतं की आपण समाजात कारण नसताना एक उद्रेक पेरत असतो. आपलं तेच खरं आणि जे आपल्या सोयीचं नाही किंवा आपल्या ‘इंटरेस्ट’च्या जे आड येणार ते खोटं, असं ठामपणे मानून प्रचार करणाऱ्या पक्षीय टोळ्या जागोजागी बसलेल्या असतात. या टोळ्या आपल्या सारासार विचार न करण्याच्या सवयीचा इतका फायदा घेतात, की ते आपल्या मनात न कळत द्वेष पसरवत असतात.
इंटरनेटचं जाळं मला वाटतं प्रत्येक गावात पोहोचलं आहे. पण त्याचा जबाबदार वापर केला जातोय का, हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा तितकाच गंभीर आहे, हे मी आज पुराव्यांनिशी सांगू शकतो आणि मला हेही सांगावंसं वाटतं की ज्यांच्या हाती इंटरनेट नावाचा राक्षस पडला आहे, तो पुढे जाऊन कधीतरी कोणाचा तरी घात करणार आहे. एवढंच कशाला देशाच्या काही ठिकाणी याआधी इंटरनेटवरील चुकीच्या, राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या प्रचारामुळे काहींचा बळीही घेतला आहे. मग त्यातून लहान मुलांचे अपहरण होत असल्याच्या गोष्टी रंगवल्या गेल्या आहेत.
नुकत्याच ‘भाडिपा’च्या लोकमंच या कार्यक्रमात फेकन्यूजचा गैरवापर का केला जातोय, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर ते असं म्हणाले, की समाजमाध्यमांचा प्रसार लवकरच झाला, पण त्याच्याविषयीची मूल्यं तितक्या वेगानं तयार झाली नाहीत. त्यामुळे त्यातून निर्माण होणारी गोंधळाची स्थिती आणि त्याचा गैरवापर ही स्वाभाविक गोष्ट आहे.
शेवटी ज्यांना इंटरनेटमधलं अधिक काही कळत नाही त्यांनी ते आधी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर ज्यांनी त्याचा अभ्यासच केलेला नाही त्यांना लोक उद्या जसं ‘माकडाच्या हाती कोलीत’ तसं ‘माकडाच्या हाती इंटरनेट’ असं म्हटल्यावाचून राहणार नाहीत.
शब्दांकन : गोविंद डेगवेकर
viva@expressindia.com