सारंग साठय़े
आजकाल मोबाइलवर.. सॉरी, स्मार्टफोनवर असणं म्हणजे कामाची गरज आहे का? की ती सवय आहे. बरं काही काम आहे म्हणून वा र्अजट आहे म्हणून एखाद्याला कॉल लावण्यासाठी म्हणून मोबाइलचा वापर केला गेला तर समजू शकतो. पण काही जण मित्राने पाठवलेला ‘जोक’ वाचण्यासाठी आणि तो कदाचित वाचून झाल्यानंतर त्याविषयी कळविण्याविषयीची ‘चिंता’ लागून राहिलेले अनेक जण असतात. हे म्हणजे जरा अतीच झालं!
अति म्हणतोय यासाठी, की आजचं सायन्स सांगतंय की जास्तच मोबाइलला चिटकून बसलात तर ‘रेडिएशन’चा परिणाम शरीरावर होईल. बरं स्मार्टफोनमध्ये असं काय काय वाचायचं असतं. तर इकड-तिकडच्या घटना, त्यावरील कॉमेंट आणि पण म्हणून ते करणं आवश्यकच आहे का? fear of missing out अर्थात ‘फोमो.’ आपण काहीतरी चुकवतोय आणि म्हणूनच ते होता नये, यासाठीची अहोरात्र धडपड. आता हे सारं करणाऱ्यांना ‘पहिला मीच’ ‘पहिलं माझंच ऐका’ नावाचा रोग जडतो. पण घाबरण्याचं कारण नाही. त्याला मानसशास्त्रज्ञांनी काही साधे उपाय सुचवले आहेत. बरं मानसशास्त्रज्ञांकडे जर का कोणी कधी गेलाच तर त्यांना ते पहिला प्रश्न विचारतात, की तुम्ही मोबाइलचा वापर किती करता? अर्थात त्यांना असं सांगायचं असतं, की आता जरा कमी कर..
तर हा ‘फोमो’ आलाय कशातून? तर ‘सोशल स्टेट्स’ सांभाळण्यावरून. स्मार्टफोनवरील प्रत्येकाला काहीतरी ‘प्रूव्ह’ करून दाखवायचं असतं. आता इथे पुन्हा ‘एन्झायटी.’ एन्झायटी अर्थात चिंतेची दोन उगमस्थाने आहेत. एक स्वत:कडून आणि दोन दुसऱ्यांकडून. पहिली चिंता म्हणजे एखादा मित्र साधे आइसक्रीम खात असेल आणि त्याने त्याचा फोटो टाकला असेल, तर तो पाहून.. ‘अरेरे, आता मी तिथं असायला हवं होत’..म्हणजे तुझ्यासोबत या क्षणी मी काहीतरी ‘मिसिंग’ करतोय, ही ती भावना. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं. म्हणजे ‘ब्लू टिक’ ‘ग्रीन टिक’च्या चक्रात अडकणं. त्यातही मध्यरात्रीचा ‘लास्ट सीन’ समजा दोन वाजून ३० मिनिटांचा असेल तर पापच. काय तर तू एवढय़ा रात्री ‘ऑनलाइन’ म्हणजे जागा होतासच की! अशी वरून दटावणी असते ती वेगळीच!!
पण असं कसं असेल? असेल एखाद्याचा ‘लास्ट सीन’ पहाटेपर्यंतचा. म्हणून काय तो ‘व्हॉट्सअॅप’लाच कवटाळून बसला होता? एखाद्याची झोप असेल सहा तासांची किंवा तो अन्य काही कारणांसाठी जागा राहू शकतो. याचा अर्थ, तो ‘अव्हेलेबल’ आहे असा होत नाही.
मी किती पुढे आहे हे दाखविण्यासाठी काही जण याहूनही पुढे जातात. म्हणजे एखाद्या ‘ट्रेलर’च्या बाबतीत असं नेहमीच होतं. काही जण व्हिडीओ पाहात असताना तो अर्धामुर्धा पाहिल्याचं सांगून ‘लाइक’ही ठोकतात आणि त्यावर काही लिहितातही.
मग या साऱ्याचा एक झटका बसतो की, साहित्यिक भाषेत बोलायचं तर ‘क्रिस्ट फॉलन’ हा शब्द चपखल बसेल. म्हणजे इंटरनेटच्या या शिखरावर अगदी काही दिवसांत जाऊन उभं राहायचं आणि धपकन खाली पडायचं. म्हणजे पदरी अतीव निराशा. मग नको ते इंटरनेट, नको तो स्मार्टफोन असा संन्यासच घेतला जातो. पण हे असं सारं सोडून विजनवासात जाणंही ठीक नाही. या साऱ्या ‘नेट’मयी जगतात अशी ‘प्रूव्ह’ करायची प्रलोभनं टाळून ‘बॅलन्सिंग अॅक्ट’ करावी लागते.
शेवटी समाजमाध्यम वा इंटरनेटने साऱ्यांचं आयुष्य इतकं व्यापून टाकलंय की त्यातून आता सहजासहजी सुटका शक्य नाही. भविष्यातही या साऱ्या माध्यमांचाच दैनंदिन जीवनाशी संबंध राहणार आहे. काळजी नका करू. सारं काही ठीक होईल. बाबा येतील घरी वेळेत, असं आमचे आजोबा लहानपणी सांगायचे. म्हणजे पूर्वी तशी संपर्काची साधनं कमीच होती. टेलिफोनही सर्वाकडेच नसायचे. रोज ऑफिसवरून सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी येणारे बाबा रात्री आठ वाजेपर्यंतही नाही आले की आम्ही सारे काळजीत पडायचो. शेवटी आई देवघरातली पंचपळी माझ्या हातात द्यायची आणि ती दरवाजाच्या कडीत अडकवायला सांगायची. ती अडकवताना त्या पंचपळीत काहीतरी ‘निरोप’ ठेवायला आम्हाला सांगितलं जायचं. ते सारं खोटं खोटं असलं तरी पंचपळीत ‘निरोप’ ठेवल्यानंतर बाबा सुखरूप घरी येतील.. थोडक्यात मनातले चिंतेचे ढग दूर होऊन हलकं वाटायला लागायचं.
शब्दांकन : गोविंद डेगवेकर
viva@expressindia.com