कितीही वेस्टर्न कल्चर फॉलो केलं तरी लग्नकार्यात चापूनचोपून साडी नेसण्याची जी मजा आहे, जो आनंद आहे तो इतर कशातच नाही. फक्त आणि फक्त साडी नेसल्यावर मिळणारा हा आनंद, कौतुक काही वेगळंच असतं. रोजची कामाची घाईगडबड, लांबचा प्रवास यामुळे साडी आवडत असली तरी ती रोज नेसता येत नाही. अशा वेळी लग्नसराई वा सणासमारंभात साडी नेसायची आणि त्यावर साजेसे असे दागिने घालण्याची हौस भागवता येते. साडी आणि दागिने वा आभूषणं हे एकमेकांपासून वेगळं न करता येणारं समीकरण आहे. त्यामुळे साडी नेसून मिरवायचा विचार असेल तर त्यावर दागिने काय असावेत याची निवड आधी करायला हवी…
दररोज साडी नेसण्याचं प्रमाण सध्या कमी होत चाललं आहे. कदाचित त्यामुळेच लग्नसराईत किंवा सणाच्या निमित्ताने साडी नेसायची असेल तर आपल्याला अजूनच हुरूप येतो. स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसण्यासाठी या साडीबरोबर सुंदर दागिन्यांची जोड मिळाली तर स्त्रीचं सौंदर्य अधिकच फुलून दिसतं. त्यामुळे साडीत सुंदर दिसायचं तर साडीचा पोत, रंग याला साजेसे दागिने निवडणं हेसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. तुम्ही साडी नेसताय की साडीचा ड्रेस, काठापदराची साडी असो वा अगदी कॉटनच्या प्लेन साडीपर्यंत प्रत्येक साडीवर वेगवेगळे दागिने घालून आपल्याला साडीचा आणि आपला लुक अजून ग्रेसफुल करता येतो.
साडी आणि एथनिक ड्रेसेसवर पारंपरिक आणि विशेषत: सोन्याच्या वा मोत्याच्या दागिन्यांना आजही पसंती मिळत असली तरी बदलत्या काळानुसार दागिन्यांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात वैविध्य दिसू लागले आहे. सोन्याचे दागिने वापरण्याचं प्रमाण तुलनेनं कमी झालं आहे, त्याऐवजी मार्केटमध्ये आलेल्या इमिटेशन ज्वेलरीला अधिक प्राधान्य मिळू लागले आहे. त्यामागची कारणं अगदी सोन्याचे दागिने सांभाळून ठेवावे लागतात इथपासून काहीही असली तरी इमिटेशन वा एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्येही सुरेख दागिने उपलब्ध असल्याने ते दागिने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. लग्नकार्यात साडीवर तुम्ही सोन्याचे दागिने घालू इच्छित असाल किंवा सोनेरी रंगाचे पण खोटे दागिने घालू पाहत असाल तर त्यात मंगळसूत्र, चपला हार, लक्ष्मी हार, झुमकी हार, कोल्हापुरी हार अशा पारंपरिक प्रकारच्या दागिन्यांचा विचार करता येईल. सोबतच हातात पाटल्या, कुंडल बांगड्या घालता येतील. त्यात तुमच्या साडीच्या रंगाच्या काचेच्या बांगड्याही मध्ये मध्ये पेअर करून एक वेगळाच सेट बनवता येईल किंवा हातात अगदी एकच कडंसुद्धा उठून दिसतं.
कानात झुमके, बुंदा बाली, कोल्हापुरी कुंडल असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. साडी जर खूप गडद रंगाची, भरीव नक्षी वा जरीकाम असेल तर त्यावर अगदी एक-दोनच सुंदर नाजूक दागिने घातले तर तुमचा लुक अधिक उठून दिसेल. तसंच साडीचा काठ ज्या रंगाचा आहे त्या रंगाच्या रेशीमधाग्यांनी बनलेले वा त्याच रंगांचे मोती-खडे यांनी सजलेल्या दागिन्यांनीही तुमचा लुक उठावदार दिसेल. सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांबरोबरच चांदीचे दागिनेही सध्या लोकप्रिय आहेत.
चांदीच्या दागिन्यांमध्ये चंदेरी पैंजण, ब्रेसलेट, अंगठी घालू शकता. बाजारात पैंजणसुद्धा खूप वेगवेगळ्या साइजमध्ये आणि डिझाइनमध्ये पाहायला मिळतात. नाण्याचे पैंजण, झालीर पैंजण, धनधान्य पैंजण, साधे पैंजण असे कित्येक पद्धतींचे पैंजण असतात. साडी जर चंदेरी असेल तर चांदीची अंगठी, कानातले घालू शकता. परंतु, चांदीच्या दागिन्यांची अधिक काळजी घावी लागते. चांदीचे दागिने काळे पडू नयेत म्हणून सतत स्वच्छ करावे लागतात. याला उत्तम पर्याय म्हणून तसेच ट्रेंड म्हणून सध्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कमी खर्चात, सांभाळायला सोपे म्हणून तर हा पर्याय उत्तम आहेच, पण सोबतच स्टाइल करण्यासाठी, क्लासी दिसण्यासाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हा उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही गळ्यात लांब हार, चोकर, साखळी, पेंडंट हार यापैकी काहीही घालू शकता.
बंद गळ्याच्या ब्लाउजवर अफगाणी नेकलेस घालू शकता. लांब साखळीमध्ये पेंडंट असलेला हा नेकलेस सध्या ट्रेंडी आहे. ज्यामुळे ब्लाउजवर ही नजर जाते आणि दागिन्यावरही… आणि दोन्ही वेगळे लक्षात येतात. रुंद गळ्याचा ब्लाउज असेल तर त्यावर चोकर घालू शकता. तुमच्या आवडीनुसार नाजूक चोकर किंवा अगदी गळा भरून दिसेल असा मोठ्ठा चोकर घालू शकता. सोबतच कानातले घालता येतील किंवा गळा मोकळा ठेवून फक्त कानातलेसुद्धा घालू शकता. ऑक्सिडाइज्ड कानातले तर खूप सुंदर दिसतात आणि बाजारात असंख्य डिझाइनचे हे कानातले अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. सोबतच ऑनलाइनसुद्धा खूप छान कानातल्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. साडीवर जर मोराची नक्षी असेल तर मोराचे कानातले वापरू शकता आणि ते सहज उपलब्ध होतात. बोटात नाण्याइतक्या मोठ्या अंगठ्या स्टाइल करू शकता किंवा एकापेक्षा अधिक लहान, नाजूक अंगठ्या घालू शकता.
बाजारात सध्या हरतऱ्हेचे, हरप्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. आपली साडी वा ड्रेसचा प्रकार, त्याच्यावरचे डिझाइन या सगळ्याचा थोडा विचार करून त्यानुसार दागिने स्टाइल केले तर लग्नसराईत तुमचा लुक उठून दिसणार यात शंकाच नाही.
viva@expressindia.com