वैष्णवी वैद्या मराठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी अगदी यथोचित अर्थाने म्हटले आहे, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’. अशाच काहीशा ऐटीत श्रावण मास येतो ; संपूर्ण सृष्टीला सौंदर्याचे आणि नवचैतन्याचे देणे देतो. याच श्रावण महिन्यांत विविध सणांच्या निमित्ताने स्त्रियांना आपली साडी हौस भागवता येते. यंदाच्या श्रावणात साड्यांचे कोणकोणते ट्रेण्ड आहेत ते बघूया…

हॅन्ड-पेंटेड साडी : सध्या हा साड्यांच्या फॅशनमधला सगळ्यात प्रचलित ट्रेण्ड आहे. पारंपरिक, काठापदराच्या, जरीच्या साड्यांपेक्षा हॅन्ड पेंटेड साड्या तरुण मुलींना जास्त आवडीच्या आहेत. याचे कारण त्या दिसायला क्लासी आणि आकर्षक असतात. नेसायला अगदी सोप्या आणि हलक्या असतात. याशिवाय अगदी लग्नकार्यापासून ते ऑफिसच्या फॉर्मल मीटिंग किंवा गेट-टुगेदरसाठीही त्या नेसता येतात.

कलात्मकता आणि कस्टमाइझेशन या दोन्हीच्या समीकरणाने या साड्या अधिक लोकप्रिय होत आहेत. नावाप्रमाणे या साड्या हाताने पेंट केलेल्या असतात. तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये, डिझाइनमध्ये, आणि थीमप्रमाणे या साड्या बनवून घेता येतात.

सध्या हॅन्ड-पेंटेड साड्यांमध्ये फ्लोरल प्रिंट लोकप्रिय आहे. कॉटन, लिनन किंवा सिल्कमध्येही या साड्या बनवल्या जातात. मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात सध्या या साड्यांचा ट्रेण्ड बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतो. श्रावणात थोडा मरून किंवा हिरवा असा डार्क रंग आणि त्यावर पिवळे फ्लोरल हॅन्ड-पेंटेड डिझाइन हे कॉम्बिनेशन सुंदर दिसेल. हॅन्ड-पेंटेड साड्यांमध्ये ऑर्गेंझा फॅब्रिकही ट्रेण्डिंग आहे. यात पेस्टल आणि इंग्लिश कलर्स अधिक ट्रेण्डी असल्याने गुलाबी, पांढरा, आकाशी अशा रंगाच्या साड्या सेलेब्रिटींमध्ये जास्त पाहायला मिळतात. मनोरंजनच नव्हे तर राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय स्तरावरही या साड्यांची आवड बघायला मिळते.

हेही वाचा >>> सफरनामा : भटकंतीतील बचावकार्य…

शिफॉन आणि जॉर्जेट साडी :

भारतीय संस्कृतीतली साडी हा प्रकार अष्टपैलू आहे. तुम्ही नेसाल तशी नेसता येते, आणि कुठल्याही पद्धतीने नेसली तरी तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. आधी खरेतर शिफॉन आणि जॉर्जेटचे ड्रेस/कुर्ते जास्त प्रचलित झाले. पुढे फॅशन क्षेत्रातील कलाकारांना त्याच्या साड्यांमध्ये प्रयोग करून बघावेसे वाटले आणि ते यशस्वी झाले. या दोन फॅब्रिकमधला बेसिक फरक म्हणजे- जॉर्जेट हे अर्ध-पारदर्शक, हलके फॅब्रिक आहे तर शिफॉन हे जरासे हलके, पातळ फॅब्रिक आहे. विविध फॅशन शो आणि हिंदी-मराठी चित्रपटांच्या माध्यमातून या साड्यांचा ट्रेण्ड वाढला. या साड्या कुठल्याही छोट्या-मोठ्या निमित्ताने नेसू शकता. राखी पौर्णिमेसाठी काही थीमचा विचार करत असाल तर या साड्यांचा पर्याय चांगला आहे. या साड्यांवर ब्लाउज मात्र साडीतल्या कापडाचे न वापरता कॉन्ट्रास्ट घातले तर साडी अधिक खुलून दिसेल. या साड्या थोड्या हलक्या आणि प्लेन असल्याने थोडे भरजरी ब्लाउज घातले तर तुमचा पोशाख उठावदार दिसतो.

टसर सिल्क साडी : टसर सिल्क साड्या इतर सिल्कच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केल्या जातात. या साड्या शुद्ध तुतीच्या रेशमी साड्यांपेक्षा परवडणाऱ्या आणि व्यावहारिक किमतीत मिळतात. भारतातील बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील जंगली रेशीम कीटकांच्या कोकूनपासून उत्पादित, हे टसर रेशीम वेगळे आहे. यात नैसर्गिक चमक असल्याने साडीला मोहक स्वरूप येते. घरगुती पूजा, हळदी-कुंकू किंवा इतर पारंपरिक कार्यक्रमांसाठी जर तुम्हाला काठपदर प्रकार नको असतील तर टसर सिल्क हा बेस्ट चॉइस आहे. या दिसायला भरजरी दिसत असल्या तरी अतिशय हलक्या आणि सुटसुटीत असतात. तसेच टिकायला देखील भारी असतात. या रेश्मामधेच सोनेरी रंगाची छटा असल्याने या साड्या भरजरी दिसतात. जॉमेट्रिक आणि फ्लोरल प्रिंट या साड्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. या साड्यांवर मिनिमलिस्टिक अशी ज्वेलरी आणि स्लिव्हलेस कॉन्ट्रास्ट ब्लाउज बेस्ट दिसेल.

या साड्यांमध्ये एक विशिष्ट प्रकार आहे तो म्हणजे मधुबनी टसर सिल्क साडी. मधुबनी साड्या पूर्ण प्लेन, एकाच रंगाच्या असतात फक्त त्याचा पदर कॉन्ट्रास्ट भरजरी प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरीचा असतो. हे कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय सुरेख आणि ग्रेसफुल दिसते. दुसरे म्हणजे कधी कधी अखंड साडीवर अगदी छोटी कसलीतरी बुट्टी आणि काठाला भरजरी डिझाइन असेही छान वाटते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातला प्रकार शोधू शकता. सणावाराला म्हणून सध्या या साड्या बाजारात भरपूर मिळतील तसेच विशिष्ट ऑफरमध्येही मिळतील. या साड्यांमध्येही पदरावर काश्मिरी एम्ब्रॉयडरीसुद्धा मिळते; तुम्हाला तुमचा लूक इतरांपेक्षा वेगळा करायचा असेल तर हा प्रकार नक्की एक्सप्लोर करा.

बोहो प्रिंट साडी : साड्यांच्या फॅशनमधला अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भौगोलिक ऋतूंप्रमाणे साड्यांची निर्मिती किंवा त्याप्रमाणे साड्यांचे प्रतिनिधित्व करणे. हे ऋतू फक्त भारतापुरते सीमित नाहीत, तर जगभरातले ऋतू असतात. इतर देशात पावसाळा हा काही वेगळा ऋतू नसल्याने सध्या जगभरातच वसंत ऋतू थोड्याफार प्रमाणात सुरू असतो. या ऋतूचे प्रतिनिधित्व करणारी फॅशन म्हणजे बोहो स्टाइल. ही स्टाइल आधी ट्रेण्डी आणि वेस्टर्न कपड्यांमध्ये आली आणि आता तरुणाईच्या आवडीमुळे ती साड्यांमध्येही आली आहे. बोहो फॅशन ही प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरीची फॅशन आहे त्यामुळे कुठल्याही कापडाच्या साडीवर ही करता येऊ शकते. पण बहुतेक वेळा लिनन, कॉटन/सॉफ्ट कॉटन साड्यांवर बोहो प्रिंट जास्त पाहायला मिळते. ही स्टाइल जरा समकालीन असल्याने शक्यतो हलक्या आणि दैनंदिन आयुष्यात रोज वापरल्या जाणाऱ्या कापडावरच हे प्रयोग केले जातात. तुम्हाला जर सणावाराला पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचे कॉम्बिनेशन हवे असेल तर ते बोहो फॅशन साडीमध्ये मिळू शकते. बोहो फॅशन सस्टेनेबल फॅशनचे प्रतीक मानले जाते, कारण त्या बऱ्याचदा रिसायकल होणाऱ्या मटेरिअलच्या बनलेल्या असतात; तसेच यात नैसर्गिक किंवा सेंद्रिय रंग वापरले जातात ज्यामुळे पर्यावरणाला किंवा आपल्यालाही वापरताना कुठलाही धोका होणार नाही.

ज्यूट-ऑर्गेंझा साडी : हा साडीचा वेगळाच प्रकार सध्या फॅशनमध्ये आहे. ज्यूट ऑर्गेन्झा साड्या हे ज्यूट आणि ऑर्गेन्झा फॅब्रिक्सचे एक विशिष्ट मिश्रण आहे. ज्यूटच्या नैसर्गिक, किंचित उग्र पोत आणि ऑर्गेन्झाच्या निखळ, चकचकीत फिनिशिंगचे बेस्ट फ्यूजन आहे. ताग किंवा ज्यूट ज्याला आपण म्हणतो हा जैवविघटनशील फायबर असल्यामुळे त्यांचा पर्यावरणपूरक स्वभाव, सस्टेनेबल फॅशनच्या वाढत्या मागणीसाठी कारणीभूत आहे. सिल्क साड्यांच्या तुलनेत अगदी रेखीव आणि बारीक कलाकुसर हा त्यांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या साड्या सगळ्यात जास्त टिकाऊ असतात. यांच्यावरचे डिझाइन तुम्हाला हव्या त्या पद्धतीचे करू शकता, परंतु सध्या ट्रेण्डमध्ये असणारे डिझाइन म्हणजे सिम्पल उभे आडवे लायनिंग आणि प्लेन पदर. श्रावणात ऑफिसमध्ये पूजा असेल किंवा कोणाच्या घरी पटकन पूजेला जाऊन यायचे असेल तर ही साडी अगदीच योग्य आहे. यामध्ये सुद्धा नैसर्गिक सोनेरी चमक असते जेणेकरून साडी प्लेन असली तरी अगदी साधी वाटत नाही. या साड्या अगदी नैसर्गिक कापडापासून बनतात त्यामुळे त्याची अगदी वाजवी किंमत असते. यात शक्यतो डार्क रंग परिधान केलेत तर ते जास्त उठून दिसतात. या साडीवरसुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला आणि इंडो-वेस्टर्न ज्वेलरीचे कॉम्बिनेशन करून लूक पूर्ण करा.

आधी म्हटल्याप्रमाणे तरुण पिढीला साडी तर खूप आवडते, परंतु कायमच काठ-पदरात अडकून राहायचे नाहीये. पैठणी, नारायण पेठ, नऊवारी, शालू यात आपली समृद्ध परंपरा, संस्कृती आणि प्रत्येक पिढीतला सोनेरी ठेवा आहे. नवीन पिढीला जुन्याची कास धरायचीच आहे, पण नावीन्याची साथही हवी आहे. सध्या फॅशन क्षेत्र विशेषत: साडीसारखी समकालीन फॅशन मनोरंजन क्षेत्रामुळे, सेलेब्रिटीजमुळे, जगभरात होणाऱ्या फॅशन शोजमुळे अतिशय प्रभावित आहे. अगदी अश्म युगापासून ते आतापर्यंत सगळ्यात जास्त बदल ज्या पोशाखात झाले असतील तर ते साडीमध्ये आहेत. साडी नेसायची, आत्मसाद करायची आणि कॅरी करायची पद्धत बदलली पण त्यातून दिसणारी स्त्रीच्या स्त्रीत्वाची ओळख कायम निरंतर आहे. साडी हे वस्त्र वैज्ञानिक दृष्ट्या पण फायद्याचे मानले जाते. साडी नेसल्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. स्त्रीची शरीरयष्टी कशीही असली तरी साडी हे एकमेव वस्त्र आहेत जे तिला खुलून दिसते. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही साडी परिधान करू शकता. साडीचे महत्त्व भारतीय परंपरेतच आहे याचा अजून एक पुरावा म्हणजे कुठल्याही राष्ट्रीय, सरकारी पातळीवरच्या कार्यक्रमांसाठी आजही साडी हा पोशाख जगन्मान्य असतो; किंबहुना आपल्या परंपरेने तो जगाला मान्य करायला लावला आहे. आज इतर देशातल्या, संस्कृतीतल्या स्त्रिया अगदी कौतुकाने भारतात साड्या नेसून येतात. त्यामुळे तुमच्या आवडीची साडी नेसून हा मनभावन श्रावण साजरा करायला सज्ज व्हा.

साडी हा एकमेव असा पोशाख आहे जो पारंपरिक आणि ट्रेंडी दोन्ही पद्धतीने खुलून दिसू शकतो. तरुण पिढीने साडीतील लोभसपणा टिकवून त्यात नावीन्याची सांगड घातली हे चित्र सुखावणारे आहे. आजही श्रावण मासात अगदी जुन्या परंपरे सारखीच प्रसन्नता आणि लगबग पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीची हीच खरी गम्मत आहे… काळाच्या वेगाप्रमाणे पद्धती नक्कीच बदलतात पण त्यातली परंपरा अभिजात राहते. एव्हाना सगळ्या घरांमध्ये प्रत्येक सणाच्या साड्या तयार असतील, त्यावरचे दागिने बाहेर आले असतील! येणाऱ्या श्रावण मासाच्या सगळ्यांना शुभेच्छा. viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarees trends in this shravan month sarees wearing during shravan saree designs for sawan zws