|| प्रियांका वाघुले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही गोष्टी आपण आयुष्यात नित्यनियमाने करत असतो. जेवण, झोप, काम या गोष्टी नित्यनियमाने होत असताना असाच नियमितपणा आपल्या व्यायामातही असलाच पाहिजे, असे सौरभ गोखले म्हणतो. कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहिलो तरच तिचा उपयोग आपल्याला होतो.

त्यामुळे फिटनेस राखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याचा मागोवा घ्यायला हवा, असे सौरभ म्हणतो. मनाचा आणि शरीराचा फिटनेस राखण्यासाठी आपण मोकळ्या हवेत जायला हवं, असे तो म्हणतो. शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी ही गोष्ट जरा अवघड असली तरी त्यासाठी पर्याय शोधणे आपले आपल्याला जमायला हवे, असे तो म्हणतो. त्यासाठी जिममध्ये कार्डिओ करण्याऐवजी सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत चालण्याला, धावण्याला तो प्राधान्य देत असल्याचे सांगतो. त्याचबरोबर जिममध्ये वेट ट्रेनिंग नियमितपणे करताना त्यात सातत्य न ठेवता दर दोन ते तीन आठवडय़ाने व्यायामक्रम बदलत असल्याचेही त्याने सांगितले. हिप थ्रस्ट, डेडलिफ्ट, शोल्डर प्रेस, स्प्लिट स्क्वॉटसारख्या व्यायाम प्रकारांचा त्याच्या दैनंदिन व्यायामात समावेश केला आहे.

कोणताही पदार्थ सारखा खाल्ला की त्याच्या चवीची जिभेला सवय लागते. अगदी तसंच आपला व्यायामाच्या फॉरमॅटची शरीराला काही काळाने सवय होते. त्यामुळे शरीराला अशी सवय होऊ  देण्यासाठी आणि शरीराने नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे. त्यासाठी व्यायामक्रम, व्यायाम प्रकार बदलले जात असल्याचे सौरभ सांगतो.

फिटनेस शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने आपल्या व्यायामात खंड पडू नये म्हणून सौरभ सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगतो. काहीही कारणास्तव बाहेरगावी असतानादेखील सौरभ त्या ठिकाणी जिमला त्या त्या दिवसापुरते जात असल्याचे सांगतो. मुळात घरात फिटनेस या गोष्टीला अतिशय महत्त्व असल्याने आपोआपच आपल्याला ही शिस्त लागल्याचे त्याने सांगितले. आजोबा, वडील, भाऊ  अशी पिढय़ांपासून चालत आलेली ही व्यायामाची शिस्त सौरभनेही अंगी बाणवून घेतली आहे. या शिस्तीचे फायदेच जास्त असल्याचे तो त्याच्या अनुभवांवरून सांगतो.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh gokhale