गणपती बाप्पा, मोरया.., मंगलमूर्ती मोरया.., उंदीर मामा की जय.., या युवासेनेच्या घोषणांनी अवघे रवींद्र नाटय़मंदिर दणाणून गेले होते.. तरुणाईच्या ओतप्रोत भरलेल्या नाटय़गृहात चहुबाजूंना चैतन्य पसरलेलं होतं.. तिसरी घंटा झाल्यावर होणारा एकच कल्ला.. पण पडदा उघडल्यावर पसरलेली निरव शांतता.. विनोदाच्या वेळी हशा-टाळ्या.. तर गंभीर क्षणांच्या वेळी स्मशानशांतता.., प्रत्येक एकांकिकेला त्याच्या विषयानुसार, संवादानुसार मिळणाऱ्या रिअॅक्शन .., त्यामध्ये ही एकांकिका गडबड करून पाडायची किंवा कोणताच रिस्पॉन्स द्यायचा नाही, हे घडताना दिसलं नाही.., हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की, रंगमंचावर ‘किलिंग स्पिरिट’ दाखवणारी ही युवा पिढी तिथून बाहेर पडल्यावर मात्र ‘स्पोर्टिग स्पिरिट’ दाखवताना दिसली आणि हाच मोठा बदल यंदाच्या युवा पिढीमध्ये सवाई एकांकिकेच्या माध्यमातून समोर आला.
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणाऱ्या या एकांकिका स्पर्धेचं हे सत्तावीसावं वर्ष होतं. मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेकडे राज्यभरातल्या तरुणाईचं लक्ष लागलेलं असतं. काही वर्षांपूर्वी प्रतिस्पर्धी म्हणजे कायमचा दुश्मन ही एक भावना असायची. त्यामुळे रंगमंचावर एकमेकांना मागे पाडायची ईर्षां असायचीच, तर दुसरीकडे एकांकिकेनंतरही ‘राडा’ पाहायला मिळायचा. पण सध्याचे चित्र फार बदललेले नक्कीच आहे. सारेच स्पर्धक निकालाच्या वेळी एकमेकांना ‘चीअर अप’ करत होते. आपण जिंकलो नसलो तरी आपल्यापेक्षा सरस कामगिरी करणारा स्पर्धक जिंकला आणि त्याचे कौतुक करायलाच हवे, ही भावना त्यांच्यामध्ये होती. एकांकिका करण्या वेळीही प्रतिस्पध्र्याला नेपथ्यामध्ये मदत करायला काही स्पर्धक विसरले नाहीत. आवर्जुन त्यांच्याकडून जी काही मागणी असेल ती त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, एकदम सारं कसं, ‘हॅप्पी गो लक्की’सारखं.
युवा पिढी म्हणजे जोश, सर्जनशीलता, नावीन्य, प्रयोगशीलता, अचाट/पुचाट तत्त्वज्ञान, हे सारं ‘सवाई’च्या वेळी अनुभवता येत होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिकिटं संपलेली. उरलेल्या १५ तिकिटांसाठी पन्नास-साठ जणं रांगेत होती. तिकिटं नसल्याने शेकडो मुलं-मुली नाटय़गृहाबाहेरील रस्त्यावर उभी होती. पण कुठलाही गोंधळ नव्हता, मारामाऱ्या नव्हत्या किंवा राडेबाजी नव्हती. ग्रुपमधील काही जणं तिकिटं शेअर करत आलटून पालटून एकांकिका बघत होते.
एकामागून एक दमदार एकांकिका सादर होत असताना नवीन विचार समोर येत होते. काही एकांकिकांचे लेखन चांगले होते, तर काहींचे दिग्दर्शन, तर काहींचा अभिनय, तर काहींची तांत्रिक बाजू, त्यामुळे एका वेगळ्याच भेळेचा आनंद, या वेळी घेता येत होता. काही जणांनी वाजवून परफॉर्मन्स दिले, तर काहींचे ठीकठाक झाले. यामध्ये पहिली ठरलेली ‘क’ ला काना ‘का’? (एमआयटी, पुणे) आणि प्रेक्षक पसंतीसह दुसरी ठरलेली ‘उळागड्डी’ (भारती विद्यापीठ, पुणे) यांनी साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा