विद्याधर कुलकर्णी

प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनात संगीत हे सामावलेले असतेच. पण, तरीही प्रत्येकजण कलाकार होऊ शकत नाही. संगीताचा सूर प्रत्येकाला आकर्षित करतो. त्यामुळे तानसेन होऊ न शकणारे कानसेन होतात. प्रत्येक रसिक हा ‘मूक गायक’ असतो, या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या विधानाची प्रचिती ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये आली. पॉप, रॉक, जॅझ अशा पाश्चात्त्य संगीतामध्ये रममाण होणाऱ्या  युवा पिढीचा अभिजात शास्त्रीय संगीताशी संबंध नाही हा गैरसमज या महोत्सवाला हजेरी लावलेल्या तरुणाईने फोल ठरविला. ‘निरागस सूर घेऊन येणारे अभिजात संगीत हेच चिरंतन आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत युवा पिढीच्या रसिकांनी शास्त्रीय संगीतावर विश्वास प्रकट केला. अभिजात संगीत हेच शाश्वत सत्य आहे, अशी भावना युवकांनी व्यक्त केली.

अभिजात संगीत ऐकायला येणाऱ्या किती रसिकांना संगीत समजते हा मुद्दा उपस्थित केला जातो. पण, संगीत समजले नाही तरी कानाला गोड वाटते आणि मनाला आनंद देते या भावनेपोटी येणाऱ्या असंख्य रसिकांनी अभिजात संगीताप्रती आपले उत्तरदायित्व निभावले आहे, याकडे तरुणाईने लक्ष वेधले आहे.

वाद्यसंगीताची गोडी – रिचा चरवड

गेली काही वर्षे मी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहते आहे. लहानपणापासून मला साहित्य आणि संगीताची आवड आहे. ‘कला माणसाला का जगायचे ते शिकविते’ हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे वाक्य मी आचरणात आणते. रश्मी सोमण यांच्याकडे मी व्हायोलिन शिकते आहे. शास्त्रीय गायन मैफिलीपेक्षाही वाद्यसंगीताच्या ओढीने मी महोत्सवाला उपस्थित राहते. मी सध्या विधी महाविद्यालयामध्ये दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेते आहे.

अभिजात संगीत सनातन – मधुरा हसबनीस

अभिजात शास्त्रीय संगीत सनातन आहे. नित्यनूतन आणि प्रवाही म्हणजे सनातन अशी या शब्दाची उकल मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केली आहे. त्याची प्रचिती या महोत्सवाच्या स्वरमंचावरून सादर होणाऱ्या कलाविष्कारातून येत असते. आजी-आजोबा यांच्याकडून या महोत्सवाविषयी खूप काही ऐकले आहे. त्यामुळे मी गेली काही वर्षे महोत्सवामध्ये रसिक म्हणून येते. भेंडीबाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांच्याकडे मी गायन शिकत होते. मात्र, डेक्कन कॉलेज येथे संस्कृत विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असल्याने सध्या गायन शिकण्यामध्ये खंड पडला आहे. ती कसर मी या महोत्सवामध्ये भरून काढते.

मी केवळ रसिकाच्या भूमिकेत – सोहम साठे

मला संगीतातील काही कळत नाही. पण, कानाला गोड वाटणारे आणि मनाला आनंद देणारे संगीत ऐकले पाहिजे अशी माझी भावना आहे. मी मूळचा वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे राहणारा आहे. सध्या नूमवि प्रशाला येथे विज्ञान शाखेत बारावीत शिकत असल्याने येथे आत्याकडे वास्तव्यास आहे. माझा दादा सिद्धार्थ काळे गाणं शिकलेला नसला तरी तो उत्तम गातो. घरी संगीताचे वातावरण असल्याने मी महोत्सवाला हजेरी लावली.

रसिक म्हणून माझी जबाबदारी  – सुयश थोरात

या महोत्सवाला हजेरी लावणे ही रसिक म्हणून मला माझी जबाबदारी वाटते.  एका वर्षांत संगीत ऐकणारे किती श्रोते आपल्यातून जात असतील. मग त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर येते. अभिजात संगीत टिकविणे ही कलाकारांबरोबच आपल्यासारख्या रसिकांची जबाबदारी आहे. चार वर्षे इंग्लंडमध्ये असताना मी गिटार, ड्रम्सवादन करायचो. तेथे माझा बँडदेखील होता. पण, आपल्या शास्त्रीय संगीताची जादू मला या महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी खेचून आणते. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे प्रत्यक्ष गायन ऐकू शकलो नाही याची खंत आहे. पण, संगीतमरतड पं. जसराज आणि सतारवादक नीलाद्री कुमार अशा कलाकारांना पाहता आणि ऐकता आले हे माझे भाग्य आहे.

संगीत समजून घेण्यासाठी – रविशा कुलकर्णी

वास्तुशास्त्र आणि संगीत यांचा जवळचा संबंध आहे. मी स्वत: आर्किटेक्चरचे शिक्षण घेते आहे. एखादी वास्तू उभारण्यासाठी वास्तुविशारद ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने कोणताही गायक किंवा वादक कलाकार स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करताना रागाची बांधणी करतो. आलाप, ताना आणि सरगम या माध्यमातून रागाचा विस्तार करतो हा माझ्यासाठी अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. मला संगीत समजत नसले तरी आवडते म्हणून महोत्सवामध्ये आवर्जून येते. आपापल्या विषयानुसार प्रत्येकाने संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित केला तर अभिजात संगीत सर्वानाच समजेल आणि आवडेल.

परिपूर्ण गायकी जाणून घेण्याचा प्रयत्न – श्वेता हर्डीकर

या महोत्सवा’च्या स्वरमंचावरून सादर होणाऱ्या कलाविष्कारातून परिपूर्ण गायकी समजून घेण्याचा प्रयत्न मी करते. माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये काम करत असले तरी गायनाची आवड असल्याने जयपूर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेते आहे. गायक कलाकार रागाचा विस्तार  कसा करतात, आलापी आणि तानांचा वापर कसा केला जातो हे समजून घेण्याची उत्सुकता मला महोत्सवाच्या कालखंडात स्वस्थ बसू देत नाही. विविध वयोगटातील रसिकांच्या उपस्थितीवरून अभिजात संगीत सर्वानाच भावते याची प्रचिती येते.

उदयोन्मुख कलाकारांना संधी  – प्रा. अनुराग गिरीधर

गेल्या काही वर्षांपासून मी महोत्सवाला येत असून ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चे स्वरूप मला आवडते. या स्वरमंचावरून बुजुर्ग कलाकारांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांनाही सादरीकरणाची संधी मिळते. त्यामुळे अनेक कलाकार नावारूपाला आले आहेत. मला संगीत समजत नसले तरी ऐकायला आवडते. पुण्यामध्ये हा महत्त्वाचा महोत्सव होत असताना त्याला हजेरी लावणे हे मला माझे कर्तव्य आहे असे वाटते.

अभिजात संगीत ही भारतीय संस्कृती – अबोली देशपांडे

अभिजात संगीत ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचे संवर्धन करण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर असल्याने ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला मी हजेरी लावते. मी मूळची हैदराबादची असून सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र येथे अनुराधा कुबेर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेते आहे. माझी आई जयंती देशपांडे ही किराणा घराण्याची गायकी शिकली आहे. घरामध्ये संगीताचे वातावरण असल्याने मला संगीत शिकावे असे वाटले. आपली युवा पिढी पाश्चात्त्य संगीताकडे आकर्षित होत असताना पाश्चात्त्य युवक भारतीय संगीत आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्यवसायाबरोबरच संगीत आवडीचे – उमेश नांदगावकर

संगीत हे माझे पहिले प्रेम असल्याने मी दरवर्षी पाच दिवस सर्व कामे बाजूला ठेवून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला येत असतो. मी अभियंता असून लष्कराच्या दारूगोळा कारखान्याला उत्पादन पुरवठा करण्याचा माझा व्यवसाय आहे. गेल्या १५ वर्षांपासून मी रश्मी सोमण यांच्याकडे व्हायोलिनवादनाचे धडे घेत असून संगीत विशारद उत्तीर्ण झालो आहे. आता आवड म्हणून व्हायोलिनवादन शिकविण्याचेही काम करतो.

संगीत माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग – मुग्धा देशपांडे

संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याची मी आतुरतेने वाट पहात असते. माझ्या वडिलांना संगीताची आवड आहे. त्यामुळे मलाही संगीत ऐकायला आवडते. मी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महत्त्वाचा महोत्सव पुण्यामध्ये होत असताना मी त्यापासून अलिप्त कशी राहू शकते, असा प्रश्न मला पडतो आणि म्हणून मी महोत्सवात आवर्जून उपस्थित असते.