विनय जोशी
साधारण १०० वर्षांपूर्वीची गोष्ट. देश पारतंत्र्यात होता, पण जगात प्रगत राष्ट्रात होणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीच्या वार्ता देशात पोहोचू लागल्या होत्या. विज्ञानाची गंगा आपल्या देशातदेखील प्रवाहित होत देशाची प्रगती व्हावी असे अनेक विचारवंतांना वाटत होते. याच काळात मुंबईच्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या गोऱ्या लोकांसाठी राखीव असलेल्या महाविद्यालयाचे भारतीय प्राध्यापक प्रा. गो. रा. परांजपे जर्मनीमध्ये गेले होते. जर्मनीतील वैज्ञानिक प्रगती, समाजाचे पुढारलेपण पाहून ते भलतेच प्रभावित झाले. जर्मन लोकातील विज्ञानप्रेम आणि वैज्ञानिकवृत्ती हे याचे कारण असल्याचे त्यांना कळून आले. त्यांना आढळले की या सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता जर्मन भाषेतून मिळणाऱ्या विज्ञान शिक्षणाचा, जर्मन भाषेतून मोठ्या प्रमाणात प्रकाशित होणाऱ्या वैज्ञानिक मासिकांचा. शालेय स्तरावर मातृभाषेत विज्ञान शिकल्याने त्यांच्या मूलभूत कल्पना बळकट होत्या आणि जगातील विज्ञानाचे ज्ञान, नवी वैज्ञानिक प्रगती हे जर्मन मंडळींना मातृभाषेत अगदी सहज उपलब्ध होत होतं.
यावरून प्रेरित होत गो. रा. परांजपे यांनी महाराष्ट्रात विज्ञानाची पाळेमुळे मराठीतून रुजवावी या उद्देशाने जानेवारी १९२८ सालापासून ‘सृष्टिज्ञान’ हे मासिक सुरू केले. मायमराठीतून विज्ञानाचा जागर सुरू झाला. गेल्या आठवड्यात २ महत्त्वाचे दिवस लागोपाठ पार पाडले. २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषेचा सन्मान करण्याचा हा दिवस. तर २८ फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. रोजच्या जीवनात आपण सहज वापरत असणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व समजावे, वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागावी हा या दिवसाचा उद्देश. या पार्श्वभूमीवर मराठीतून होणारे विज्ञानाचा प्रसार आणि प्रचाराचे प्रयत्न अधोरेखित करण्याची गरज भासते.
प्रा. गो. रा. परांजपे यांनी सुरू केलेल्या ‘सृष्टिज्ञान’ मासिकाचे नाव यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. हे मराठीतील जुन्या वैज्ञानिक मासिकांपैकी एक तर आहेच, पण गेली ९७ वर्षे नियमित प्रकाशित होणारे आणि फक्त विज्ञानासाठी वाहून घेतलेले एकमेव नियतकालिकदेखील ठरले आहे. डॉ. वि. वा. नारळीकर, डॉ. भालचंद्र उदगावकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मो. रा. चिपळूणकर, डॉ. वि. ना. गोखले, डॉ. निरंजन घाटे अशा अनेक दिग्गज मान्यवरांनी या मासिकाचे संपादन केले आहे.
लक्ष्मीनारायण मुद्रणालय, आर्यभूषण मुद्रणालय, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय अशा अनेक संस्थांकडून हे मासिक अखंडित प्रकाशित होण्याचे व्रत पाळले गेले. मार्च २०२३ पासून ‘विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र’द्वारा हे मासिक प्रकाशित होते आहे. १०० वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या मासिकाने मराठीतून विज्ञान लेखन करणाऱ्या अनेक लेखकांना घडवले आहे, अनेक शास्त्रज्ञांना लिहिते केले. आणि जनसामान्यांना विज्ञानासारख्या क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाबाबत वाचते केले आहे. नव्या पिढीतून विज्ञान लेखक घडावे या साठीही सृष्टिज्ञान प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान लेखन कार्यशाळा, विज्ञान कथालेखन स्पर्धा, विज्ञान वाचन कट्टा असे अनेक उपक्रम घेण्यात येणार आहेत.
मराठी आणि विज्ञान हे दोन शब्द एकत्र म्हणताच ‘मराठी विज्ञान परिषद’ हे नाव आपसूकच डोळ्यासमोर येते. १९६६ साली मुंबईत स्थापना झालेली मराठी विज्ञान परिषद ही मराठीतून विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात काम करणारी अग्रणी संस्था म्हणता येईल. मराठी विज्ञान परिषदेचे दिलीप हेर्लेकर यांनी सांगितले की मराठीतून विज्ञानाचा प्रसार करणे, यासाठी आवश्यक ते पारिभाषिक शब्द निर्माण करत मराठी भाषा समृद्ध करणे, दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व वाढवणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून परिषदेचे कार्य गेली ५९ वर्षे सुरू आहे. हे उद्देश पूर्ण करण्यासाठी परिषद व्याख्याने, अभ्यास शिबिरे, अभ्यासक्रम, संमेलन, प्रदर्शन, विज्ञान मासिक, पुस्तके असे अनेकविध उपक्रम दरवर्षी राबवीत असते. यासाठी मविपचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत मिळून साठापेक्षा अधिक ठिकाणी, तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, पेडणे, निप्पाणी व बेळगाव या पाच ठिकाणी विभाग आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान खेळणी बनवणे, होमी भाभा स्पर्धा-परीक्षेच्या तयारीसाठी बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा, दहावी प्रयोग सराव वर्ग असे उपक्रम राबवले जातात. तर महाराष्ट्रातल्या अनेक शाळांत परिषदेतर्फे ‘विज्ञान मंडळ’ चालविले जाते. १९९५ पासून दर तीन वर्षांनी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन आयोजित करण्यात येते. यात विद्यार्थी स्वत: केलेले प्रकल्प सादर करतात. १९६६ सालापासून परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी विज्ञान अधिवेशन घेण्यात येते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. अनिल काकोडकर अशा अनेक शास्त्रज्ञांनी याचे अध्यक्षस्थान भूषवले आहे.
१८३० ते १९५० या १३० वर्षांच्या कालखंडात मराठीतून प्रकाशित झालेल्या विज्ञानविषयक लेखातील निवडक २०० लेखांचा संग्रह ‘मराठीतील विज्ञानविषयक लेखन’ या ग्रंथातून परिषदेने प्रकाशित केला आहे. यातून मराठीतील वैज्ञानिक लेखांचे जतन आणि दस्तावेजीकरण झाले आहे. या शिवाय विज्ञान संकल्पना कोश, विज्ञान तंत्रज्ञान कोश असे कोश प्रकाशित करून परिषदेने भाषेला वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. याशिवाय, अनेक पुस्तकेदेखील प्रकाशित करण्यात आली आहेत. परिषदेकडून १९६८ पासून मविप पत्रिका हे विज्ञानविषयक मासिक प्रकाशित होते आहे. याच्या सुमारे ६००० प्रती वितरित होतात.
विज्ञानाची सगळ्यात लोकप्रिय शाखा म्हणजे खगोलशास्त्र असे म्हणता येईल. चांदोबाला भागलास का? असं विचारणाऱ्या चिमुरड्यांपासून तर सहस्राचंद्रदर्शन पूर्ण करणाऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आकाशाचे आकर्षण असते. मराठीतून खगोलशास्त्राचा प्रचार करण्यातदेखील अनेक संस्था अग्रेसर आहेत. ‘ज्योतिर्विद्या परिसंस्था’ ही फक्त मराठीतील नाही, तर भारतातील सर्वात जुनी हौशी खगोल अभ्यासकांची संघटना आहे. जनसामान्यांत खगोलशास्त्राचा प्रसार व्हावा या उद्देशाने न. चिं. केळकर, ‘केसरी’चे तेव्हाचे संपादक ज. स. करंदीकर अशा पुण्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी २२ ऑगस्ट १९४४ रोजी संस्थेची स्थापना पुण्यात केली. ही अशा प्रकारची पहिली संघटना होती. आकाश निरीक्षणे, व्याख्याने, खगोलशास्त्राचे विविध अभ्यासक्रम, प्रदर्शने अशा विविध उपक्रमांतून परिसंस्था कार्यरत आहे. ८१ वर्ष पूर्ण करत या संस्थेने जणू सहस्राचंद्रदर्शन केले आहे.
१९८६ साली ७६ वर्षांनी दर्शन देणारा हॅलेचा धूमकेतू दिसणार होता. या निमित्त या धूमकेतूची माहिती करून देण्यासाठी मुंबईतील काही खगोलप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ‘खगोल मंडळ’. १९८५ साली स्थापन झालेल्या मंडळाने चार दशकांच्या कारकीर्दीत मराठीतून खगोलशास्त्राच्या प्रचाराचे कार्य अविरत केले आहे. मराठीतून रात्रभराचे आकाश निरीक्षण, साप्ताहिक व्याख्याने, खगोलीय सहली, अनियतकालिके, अभ्यासवर्ग अशा विविध माध्यमांतून मंडळाकडून खगोलशास्त्राचा जागर होतो आहे. या विषयी अधिक माहिती सांगताना मंडळाचे सहसंस्थापक दिलीप जोशी म्हणतात, ‘खगोलशास्त्राविषयी इंग्रजीमधून मुबलक माहिती उपलब्ध आहे. मराठीतून ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मंडळाचे ध्येय आहे. यासाठी विविध ग्रहणांच्या वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाणी, पथनाट्ये या माध्यमातून जनजागृती केली आहे. तारकासमूहांची सविस्तर माहिती देण्यासाठी ‘तारांगण’ आणि इतर काही पुस्तके मंडळाने प्रकाशित केली आहेत. विविध उपक्रमांतून फक्त शहरातील नागरिकच नाही तर ग्रामीण भागातील नागरिक, शेतमजूर, बांधकाम मजूर, आदिवासी पाडे यांच्यापर्यंत मराठीतून खगोलशास्त्राचे ज्ञान पोहोचवले आहे.
ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ‘आकाश मित्रमंडळ’ – कल्याण, ‘एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र’ – संभाजी नगर, ‘आकाशगंगा खगोलशास्त्र केंद्र’ – बदलापूर अशा अनेक संस्थांद्वारे मराठीतून खगोलशास्त्राचा प्रचार होतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट होण्यासाठी शालेय पातळीवरच विज्ञानाची गोडी लागणे आवश्यक आहे. प्रयोग आणि निरीक्षणे ही तर विज्ञानाची मूलभूत तत्त्वे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत जाऊन स्वत: प्रयोग करणे, निरीक्षणे नोंदवणे, निष्कर्ष काढणे यातून त्यांना एखादा शास्त्रीय सिद्धांत नीट कळू शकतो. पण काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल शाळांमध्ये प्रयोगशाळा आणि इतर वैज्ञानिक साधनांची कमतरता असते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा उपलब्ध करून देणाऱ्या काही संस्था सामाजिक भान जपत विज्ञानाचा पाया बळकट करत असतात.
नाशिकच्या आनंद निकेतन शाळेतील ‘कमला सोहनी विज्ञान केंद्र’ हे यापैकी एक. या केंद्राद्वारे नाशिक परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरातील काही अशा शाळांची मुलं इथे येऊन प्रयोग करतात. तसेच, या केंद्राचे प्रशिक्षक काही शाळांत जाऊन मुलांकडून प्रयोग करून घेतात. केंद्राच्या ‘कुतूहल’ या उपक्रमातून अल्प खर्चीक साहित्यातून विविध प्रयोग, वैज्ञानिक खेळणी बनवली जातात. समाजाच्या सर्व घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना कळेल अशा सोप्या मराठीतून वैज्ञानिक तत्त्वे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे या केंद्राचे अमित टिल्लू नमूद करतात.
विज्ञान प्रसाराची गंगा दुर्गम भागात नेण्यातदेखील अनेक संस्था भगीरथ प्रयत्न करत आहेत. ‘फिरती प्रयोगशाळा’ हा सेवाभारतीचा गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असणारा उपक्रम हे याचे प्रमुख उदाहरण म्हणता येईल. सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक इथल्या १८ जिल्ह्यांतील ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रांत हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत स्थानिक तरुण प्रशिक्षित केले जातात. असे प्रशिक्षक रोज परिसरातील विविध शाळांत वैज्ञानिक साहित्याची पेटी घेऊन जातात. आणि त्याद्वारे मुलांना विज्ञान शिकवतात. पण फक्त शालेय अभ्यासक्रमातील विषयापुरते मर्यादित न राहता वैज्ञानिक सहली, प्रश्नमंजूषा, प्रकल्प सादरीकरण, वैज्ञानिक रांगोळ्या, विज्ञानकथा वाचन अशा विविध उपक्रमांतून विज्ञानाचा प्रसार होतो आहे. या उपक्रमाचे प्रवर्तक श्रीरंग पिंपळीकर म्हणतात, या उपक्रमातून राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाचे बीज पेरले जाते आहे. आणि यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढे विज्ञान शाखा निवडत याच विषयात करियर केले आहे. या निमित्ताने मराठीच्या विविध बोलींमधून होणारा हा विज्ञानाचा प्रसार कौतुकास्पद आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांची ओळख करून देण्यासाठी कुडाळ इथले वसुंधरा विज्ञान केंद्रदेखील प्रयत्नरत आहे. इथे विविध वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी ‘युरेका हॉल’ आहे. तसेच डॉ. होमी भाभा सायन्स पार्क, फुलपाखरांचे उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, फिरती प्रयोगशाळा असे उपक्रम ‘वसुंधरा’तर्फे राबवले जात आहेत. विज्ञानाची तत्त्वे समजायला दरवेळी शालेय अभ्याक्रमातील प्रयोग हवेत असेही नाही. मुंबईच्या श्वेता नखाते यांची कुतूहल ही संस्था सोप्या साहित्यातून वैज्ञानिक खेळणी बनवायला शिकवते. या माध्यमातून विविध शाळांत, आश्रमशाळांत सोप्या भाषेत शास्त्रीय तत्त्वे पोहोचवली जात आहेत.
शाळेतला एक विषय इतकाच विज्ञानाचा मर्यादित अर्थ नाही. अणूंच्या अंतर्गत मूलकणांतील क्रियांपासून तर आकाशगंगेपलीकडील प्रचंड दीर्घिकांच्या विस्तारापर्यंत असंख्य विषयांचा अभ्यास विज्ञानात होतो. हे ज्ञान मराठीत आणणे, मराठीतून समजावून सांगणे, लोकांपर्यंत पोहोचवणे अगत्याचे ठरते. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे हे निश्चित. मराठीला लिपीबद्ध करणाऱ्या मुळाक्षरातील शेवटचे अक्षर ज्ञ. हा ज्ञ ज्ञानाचा होण्यासाठी मराठीलाही विज्ञान भाषा करण्याची गरज आहे. अमृतालाही पैजेत जिंकणाऱ्या मायमराठीला शास्त्रीयदृष्ट्या समृद्ध करणारे असे प्रयत्न या दृष्टीने मोलाचे ठरतात. viva@expressindia.com