हल्ली आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रीनसमोरच असतो.. टीव्ही, कॉम्प, मोबाइल, टॅब.. मित्राशी बोलायचंय, आईला उशिरा येणार असा निरोप द्यायचाय, अभ्यास करायचाय, खेळायचंय सगळं स्क्रीन आडूनच. तेच सोपं पडतंय, की सोयीचं झालंय की अंगवळणी पडलंय ? या स्क्रीन जनरेशनच्या पडद्यामागच्या हालचाली टिपण्याचा हा प्रयत्न.
टेक १
नुकतीच परीक्षा संपलेली. निखिल, इशिका, श्रवण आणि रचना सगळे सेलिब्रेट करायला गेले होते. रेस्टॉरन्टमध्ये बसल्यावर आपसूकच सगळ्यांनी आपापले मोबाइल फोन काढले. मेसेजेस्, रिंगटोन्स, अपलोड केलेले गेम्स यांची देवाण-घेवाण सुरू राहिली. घरी आल्यावर आई सहज म्हणाली की, इशिताचा नवा हेअरकट तिला छान दिसतोय. रचनाला एकदम जाणवलं, आपलं लक्षच नव्हतं तिकडे! इन फॅक्ट, आपण मोबाइल सोडून इकडं तिकडं फारसं पाहिलंच नाही. आपल्या खूप विचार करून घातलेल्या मस्त ड्रेसवरही कुणी कमेंट केली नाही म्हणजे त्यांचंही आपल्याकडे लक्ष गेलं नसणार..
टेक २
रात्री एकची वेळ. सगळं घर शांतपणे झोपलेलं. सोहम मात्र त्याच्या आभासी जगात बुडालाय. फेसबुकवर चॅटिंग, इयरफोन्सवर गाणी, मधूनमधून नेटसर्फिग- एकदम ‘मल्टीटािस्कग’ चाललेलं. समोरच्या चकाकत्या, हलत्या पडद्यानं त्याच्या मेंदूचा ताबा घेतलाय. स्थळकाळाचं, दिवस-रात्रीचं भान विसरलेला मेंदू, त्याला आता झोपही लागत नाहीये.
टेक ३
सिया सोफ्यावर मोबाइलमध्ये डोळे घालून बसलीय. सियाच्या नजरेसमोर कायम कुठला ना कुठला स्क्रीन असतोच. थोडा वेळ मोबाइल, मग टीव्ही, मग नेटवर मुक्काम. आताशा तिला आपल्या बोअरिंग, काळ्या-कुरळ्या केसांचा वीट आलाय. त्या अॅडमध्ये दीपिकाचे कसले सरळ, मुलायम, सुळसुळीत केस असतात. आता स्ट्रेटनिंगच करून घ्यायचं. थोडा ‘इमोशनल’ टाकला आईला की म्हणेल हो.
टेक ४
रोहनचं घर.. रेसमध्ये जिंकणं, खूप सारी प्रॉपर्टी गोळा करणं, मारामारी करून ढिगभर शत्रूंना मारणं, हे सगळं रोहन लीलया करतोय; फक्त कॉम्प्युटर गेम्समध्ये. नेम धरून शूट करणं तर त्याच्या डाव्या हाताचा मळ! परवा शाळेत फिटनेस टेस्ट झाली. रोहन दोन मिनिटांतच दमला. ग्राफमध्ये त्याचं वजन वरच्या लिमिटच्याही वर गेलंय. म्हणून डॉक्टरांनी त्याला खेळायला सांगितलं. ‘पण मी तर दिवसभर खेळतच असतो’- इति रोहन.
टेक ५
चिराग आपल्या खोलीत कॉप्युटरवर काहीतरी बघण्यात तल्लीन आहे. त्याच्या खोलीत त्याचा स्वतंत्र कॉम्प्युटर आहे. एकदा एका प्रोजेक्टसाठी माहिती शोधता शोधता त्याच्यासमोर भलतंच पान उघडलं. पोर्नोग्राफीचं पान होतं ते. ‘बघू तरी काय असतं’ म्हणत तो ते बघत राहिला. हळूहळू त्याला रहावेचना त्या साइटवर गेल्याशिवाय. एके दिवशी बाबांनी कशासाठी तरी त्याचा कॉम्प्युटर वापरला आणि मोठंच रामायण घडलं.
टेक ६
समीराच्या आई-बाबांनी तिच्यासमोर हात टेकलेत. तिनं हट्ट करून घेतलेला स्मार्टफोन आता तिच्या शरीराचाच एक भाग झालाय जणू. या सहामाहीत दोन विषयांमध्ये ती नापास झाली. इंटरनेटवरून डाऊनलोड केलेलं एक डाएट ती सध्या फॉलो करतेय. तेव्हापासून खूप बारीक आणि अशक्त झालीये. घरात कुणाशीही फारसं न बोलता ती सतत आपल्या खोलीत असते. कुणा मैत्रिणींशी ती कधी बोलत नाही. इतकं कमी झालेलं वजन पाहून आई-बाबांनी शेवटी तिला डॉक्टरकडे नेलं. त्यांनी काही तपासण्या करून काही औषधं दिली आणि तिला त्यांच्या एका मित्राकडे पाठवलं.
हा मित्र वयात येणाऱ्या मुलांसाठी काम करतो. त्यांच्याशी काही वेळा बोलल्यावर समीरानं काही गोष्टींचा नव्यानं विचार केला- ‘क्षणभर थांबून मग वळून काय चाललंय याचा आढावा घ्यायला हवाय का? आणि थोडा पुढचा, भविष्याचा कानोसाही घ्यायला हवा. आपण शेवटचे टेकडीवर कधी गेलो होतो? पुस्तक कधी वाचलं होतं? आपल्या शेजारी कुणी तरी नवीन लोक राहायला आलेत, आपल्या लक्षातच नाही आलं. आपलं लाडकं विम्बल्डन या वेळी कोण जिंकलं कोण जाणे आणि आपली आर्किटेक्चरच्या एंट्रन्सची तयारी? अभ्यास, मैत्रिणी, गप्पा, व्यायाम, मस्त झोप.. सगळंच विसरून गेलोय आपण.’ इतक्यात तिचा स्मार्टफोन वाजलाच. काय करावं, उचलावा की नको?
हे सगळे सहा प्रसंग अगदी कुठेही कधीही नजरेस येणारे. निखिल आणि त्याचे मित्र-मैत्रिणी, सोहम, सिया, रोहन, चिराग, समीरा.. ओळखीचे वाटतायत? सगळे साधारण पंधरा ते पंचवीस वयोगटातले. सतत मोबाइल, कॉम्प्युटर आणि टीव्हीसमोर असणारे, आजूबाजूच्या जगापासून अलिप्त, काल्पनिक जगात वावरणारे आणि हळूहळू तेच खरं मानू लागणारे, जास्तीत जास्त (गेम्समधल्या) लोकांना मारण्यात धन्यता मानणारे, मैदानी खेळ विसरलेले, स्वत:च्या सो-कॉल्ड बेढब शरीराचा दु:स्वास करणारे.
टेक्नॉलॉजीला बायपास करता येणार नाहीये आपल्याला. तिच्याशी शत्रुत्वही घेऊन चालणार नाहीये. नव्या युगाचा अविभाज्य भाग आहे ती! पण प्रश्न हा आहे की आपण तिला काबूत ठेऊन तिचा वापर करून घ्यायचा की तिला आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ द्यायचा?
कुणी तरी म्हटलं आहे- वी हॅव टू लिव्ह इन धिस वर्ल्ड अॅज इट इज अँड नॉट अॅज इट शूड बी !
स्क्रीन जनरेशन
हल्ली आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रीनसमोरच असतो.. टीव्ही, कॉम्प, मोबाइल, टॅब...
First published on: 20-09-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Screen generation