मराठी संस्कृती, परंपरा आणि शुभकार्यात महत्त्वाचा मानला जाणारा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळे दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरं केलं जातं. गुढीपाडवा म्हणजे फक्त शुभ मुहूर्तच नाही, तर मराठी कालगणनेचं नूतन वर्ष. या नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण राज्यभर मंगलमय वातावरणात घरी गुढी उभारून केलं जातं. गेली दोन दशकं मुंबई आणि उपनगरांसह राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा हे आणखी एक वैशिष्ट्य ठरलं आहे. या शोभायात्रांमध्ये तरुण पिढी मोठ्या संख्येने सहभागी होते. आयोजनापासून ते सादरीकरणापर्यंत सगळीकडे युवा पिढीचा उत्साह ओसंडून वाहात असतो.
राज्यभरातील ठिकठिकाणच्या शोभायात्रा वैविध्यपूर्ण असतात. यानिमित्ताने, त्या त्या शहरातील विविध सांस्कृतिक मंडळे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. यात तरुण स्वयंसेवकांची संख्या अधिक दिसते. आयोजन, सहभाग, सादरीकरण जे जे काही शक्य असेल तिथे सगळीकडे तरुणांची मांदियाळी असते. मुंबईत स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे गिरगाव शोभायात्रेचं आयोजन प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं जातं. ढोल ताशा पथक, ध्वज पथक यांची जुगलबंदी इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर नऊवारी साडी आणि मराठमोळा साजश्रुंगार करून आलेल्या महिलांची बाईक रॅली, मल्लखांब खेळ, लोकनृत्य सादरीकरण अशा असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च अशी ही शोभायात्रा पाहणं हा अनोखा अनुभव असतो. यंदा या शोभायात्रेचं २३वं वर्ष आहे.
शहराच्या विविध भागातील मुंबईकर येथे एकत्र येतात आणि पारंपरिक रीतिरिवाजांद्वारे नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करतात. फॅशनमध्ये कुठेही मागे न राहणारा तरुण वर्ग शोभायात्रेत मात्र संस्कृतीशी जोडलेली नाळ जपत सुंदर वेशभूषेतच पाहायला मिळतो. तरुणही धोती-कुर्ता, फेटा असे पारंपरिक देखणे पोशाख परिधान करून शोभायात्रेत सहभागी होतात. गेल्या काही वर्षांपासून, गिरगाव शोभायात्रेत वर्षाच्या थीमशी संबंधित मूर्ती आणि झांकी समाविष्ट केल्या जात आहेत. या वर्षी यात्रेची संकल्पना आहे ‘मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात’, या संकल्पनेशी निगडित सगळ्या गोष्टी शोभायात्रेत असणार आहेत. गिरगाव हे गुढीपाडव्याच्या उत्सवाचा केंद्रबिंदू आहे, मिरवणुकीव्यतिरिक्तही येथे उत्सवी खाद्यापदार्थांचे स्टॉल, रस्तेभर रांगोळ्या, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये सजावट पाहायला मिळते. इथल्या वर्षानुवर्षे स्थायिक असलेल्या चाळींच्या खिडक्यांमध्ये आणि बाल्कन्यांमध्ये सजवलेल्या गुढीसुद्धा अतिशय आकर्षक दिसतात. गुढीपाडव्याचं चैतन्य कुठे अनुभवायचं असेल तर ते दादरच्या फुलमार्केटमध्ये… या दिवशी फूल मंडईतली फुलं आणि फुलांची सजावट पाहूनच नवीन वर्षाचं चैतन्य आपसूकच आपल्याही मनात भिनल्याशिवाय राहात नाही.
मुंबईसह डोंबिवली-ठाण्यातही गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतो. ठाण्यात तरुण स्वयंसेवकांच्या मदतीने विविध संस्था गायनाचे कार्यक्रम, प्रदर्शनांचं आयोजन करतात. असे कार्यक्रम साधारण आठवडाभर सुरू असतात. डोंबिवली पूर्वेकडे असणारं श्री गणपती मंदिर गुढीपाडव्याला अखंड फुलांनी आणि वेगवेगळ्या सजावटींनी सजवलं जातं. तिथे रांगोळ्या, मंडप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गेली वीस वर्षं गुढीपाडव्याला बदलापूरची शोभायात्राही प्रचंड जल्लोषात आयोजित केली जाते. श्री हनुमान मंदिर देवस्थान व नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे ही शोभायात्रा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. यंदा त्यांचंही २३वं वर्ष आहे. रंगीबेरंगी रांगोळ्या, युवक-युवतींचा पारंपरिक वेशातील गुढी पाठकांचा सहभाग, विविध शाळांचं लेझीम पथक, देवगड येथील श्री जुगाई देवी ढोल पथकाचं सादरीकरण, भव्य चित्ररथांचा सहभाग अशा अगणित गोष्टींनी बदलापूरची शोभायात्रा नटलेली असते. विविध सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रात्री फटाक्यांची आतिषबाजी हेही यात समाविष्ट असतं. ही शोभायात्रा सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपरिक विविधतेच्या कल्पनांसह आयोजित केली जाते आणि या सजर्नशीलतेमध्ये सगळ्यात जास्त तरुणांचा सहभाग असतो. इथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात तरुणांच्या ‘युवा कट्टा’ या संस्थेकडून पुढाकार घेतला जातो.
मराठी संस्कृती जतन करण्याच्या हेतूने सगळ्यात पहिले डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिरापासून शोभायात्रा आयोजनाची सुरुवात झाली ती १९९९ साली. तिथून मग गिरगाव, दादर, परळ, विलेपार्ले या भागातही शोभायात्रेचं आयोजन होऊ लागलं. पुढच्या काही वर्षात ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरापासून देवीचे वेश परिधान करून तरुण मंडळी शोभायात्रा करू लागली. ढोल-ताशे मिरवणूक काढली जाऊ लागली. हळूहळू दरवर्षी नवनव्या गोष्टींचा अंतर्भाव शोभायात्रेत होत गेला. यामध्येच बालशिवाजी आणि त्यांचे मावळे, चित्ररथ असे प्रकार उदयास आले. आता महिलांची नऊवारी साड्या, फेटे आणि गॉगल अशी आधुनिक आणि पारंपरिकतेचा संगम असलेली बुलेटस्वारी भलतीच सुपरहिट झाली आहे. प्रतिवर्षी परंपरेचा बाज सारखाच असला तरीही अशा गोष्टींमधून समाज प्रबोधन होत असते. शोभायात्रा हे याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. सगळीच शहरं आपापल्या सामाजिक गरजांनुसार विविध प्रश्नांची मांडणी करून समाज प्रबोधन करताना दिसतात.
साधारण प्रत्येक ठिकाणी २-३ दिवसांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे अर्थातच याची आखणी डिसेंबर महिन्यापासूनच सुरू होते. फक्त सादरीकरण आणि स्वयंसेवा नाहीतर व्यवस्थापन, अर्थकारण, बैठक हे सगळंच या एका कार्यक्रमातून युवा वर्गाला शिकायला मिळतं. अनेक व्यवस्थापकीय मूल्यांचा अंतर्भाव यात दिसून येतो. एका दिवसाच्या या सोहळ्यामागची पूर्वतयारी ही किती चोख लागते हे बहुतांश वेळी प्रथमदर्शनी जाणवत नाही. संपूर्ण मिरवणुकीची धुरा ही तरुणाईकडे असते. अनेक ठिकाणी आयोजन समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी ही जबाबदारी तरुणांवर टाकलेली दिसते. विविध रथांची ट्रॉली ओढण्यापासून ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यापर्यंत सर्व बाबींची पूर्तता युवा फळी करते. यात्रेसाठी दरवर्षी नवीन टीम तयार केली जाते. काही मंडळांनी प्रामुख्याने संपूर्ण व्यवस्थापन विविध खात्यांमध्ये विभागलेले आहे आणि प्रत्येक खात्याला एक प्रमुख आणि एक उपप्रमुख नेमण्यात आले आहेत. या व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षीचा प्रमुख हा या वर्षीचा उपप्रमुख होतो आणि नव्याने प्रमुख झालेल्या माणसाला योग्य मार्गदर्शन करतो. अशाप्रकारे अधिकाधिक नवीन मंडळींनी संधी मिळते आणि त्याचसोबत व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडेदेखील मिळतात.
शोभायात्रा या संकल्पनेची सुरुवात फार पूर्वी राजकीय दृष्टिकोनातून झाली, परंतु आता गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा बाज अधिक दिमाखदार आणि तरुण झाला आहे. गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे जसं समीकरण आहे, तसं शोभायात्रा आणि फेटा हेसुद्धा अविभाज्य समीकरण आहे. पारंपरिक वेशभूषेत या फेट्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फॅशन जगतात स्वत:चा वेगळा इतिहास असणारा हा फेटा यंदाच्या शोभायात्रांमध्येही वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. फेट्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिकांनीदेखील आता त्यावर नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. पारंपरिक नाळ कुठेही तुटणार नाही, अशा पद्धतीने तरुणाई गुढीपाडव्याच्या फॅशनमध्येही मागे राहात नाही.
असाच जल्लोष परदेशातील मराठी मंडळांकडूनही केला जातो. आता अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणसाची आणि त्याच्या सण साजरे करायच्या उत्साहाची कमी नाही. त्यामुळे गुढीपाडव्याचे असेच जल्लोषाचे चित्र परदेशातही पाहायला मिळते. मराठी नूतन वर्ष, परंपरा, संस्कृती हे सगळंच तरुणाईच्या मनात रुजलेलं आहे ही बाब सुखावणारी आहे. पुढच्या अनेक पिढ्यांमध्येही ते रुजेल आणि फुलेल यात शंका नाही.
गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!
viva@expressindia.com