मी तुमचं सदर नियमित वाचतो. मागच्या एका सदरात तुम्ही म्हटलं होतं की, मुलांच्या बुटांवरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. मी माझ्या दिसण्यावर याआधी कधीच जास्त लक्ष दिलं नव्हतं. आजकाल व्यक्तिमत्त्वाचा परिणाम लोकांवर लगेच आणि जास्त पडतो, पण बुटांबद्दल मला जास्त माहिती नाही. तर यासंबंधी थोडं अजून सांगाल का?  – एक मित्र
नमस्कार,
माझं सदर इतक्या बारकाईने वाचण्याबद्दल धन्यवाद. मी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारणे मला फार आवडते. त्यामुळे एका नव्या बाजूने विचार करायला संधी मिळते. आजकाल लोक एखाद्याबद्दल लगेच मतं बनवतात आणि कपडे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांच्या आणि मुलींच्या कपडय़ांबाबत काही ठरावीक गोष्टींकडे सर्वप्रथम लक्ष जातं. मुलं आणि त्यांची पादत्राणं यावर याआधीही खूप अभ्यास झाला आहे. मुली सर्वप्रथम मुलांच्या बुटांकडे पाहून तो सभ्य आहे की नाही याचा निर्णय घेतात, असं या अभ्यासातून दिसतं. मुलगा खरंच वरवर दिसणाऱ्या गोष्टींना महत्त्व देतो की, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देतो हे तो सुटावर चांगले बूट घालतो की स्वस्तातले साधे यावरून कळतं.
योग्य पेहरावाबरोबर योग्य शूज घालणं मुलांसाठी आणि मुलींसाठी फार महत्त्वाचं असतं, कारण त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, वागणुकीचा अंदाज घेतला जातो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूजची स्वच्छता. आपल्या शूजकडे कोण किती लक्ष देणार? हा विचार करून मुलं खूपदा बुटांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष देत नाहीत, पण हे चुकीचं आहे. ज्या मुलांचे बूट स्वच्छ नसतात ती मुलं मुलींच्या मनातून उतरतात.
यासंबंधी मी दोन उदाहरणं देते. एका व्यक्तिमत्त्व विकास शिबिरामध्ये एका मुलाखतीचा प्रसंग विद्यार्थ्यांना दिला होता. एक मुलगा छान नीट शर्ट-पँट घालून आला होता. त्याने केसांपासून ते नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले होते, पण बूट पॉलिश करायला मात्र विसरला होता. जेव्हा त्याची मुलाखत देण्याची वेळ आली, तेव्हा त्याच्या आधीच्या मुलाने त्याला बूट साफ करायला सांगितलं. त्याने पटकन पँटच्या मागच्या बाजूला बूट पुसले आणि खोलीत गेला. त्याची मुलाखत उत्तम झाली. मुलाखतकाराने त्याला बाहेर थांबायला सांगितलं. जसा तो मुलगा मागे वळला तसे त्याच्या पँटवरील बूट पुसल्याचे डाग दिसून आले आणि त्या क्षणी तो नापास ठरला.
दुसरं उदाहरण ‘श्री-४२०’ या चित्रपटातील आहे. यात राज कपूर नर्गिसला आकर्षित करण्यासाठी त्याच्या लाँड्रीतील ग्राहकाचा सूट घालून जातो, पण खाली साधे फाटलेले शूज घातलेले असतात. त्याचा सूट पाहून खूश झालेली नर्गिस ते शूज पाहून हसू लागते. अर्थात यावरून सांगायचा मुद्दा एकच की, मुलांकडे उत्तम शूज असणे गरजेचे आहे.

तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com