रसिका शिंदे-पॉल
तरुणींचा वा मुळातच स्त्रियांच्या जिव्हाळय़ाचा विषय म्हणजे खरेदी.. आणि त्यातही ती खरेदी हॅन्डबॅग किंवा अन्य कोणत्याही बॅगची असेल तर खरेदीला उधाण आल्याशिवाय राहात नाही. अनेक तरुणी बदलत्या ऋतूनुसार बॅगची निवड करतात. कॉलेजला जाण्यासाठी, कार्यालयीन उद्देशाने किंवा अगदी फिरायला जायचं असेल तर नेमकं कुठल्या ठिकाणी भटकंती करणार आहोत हे लक्षात घेऊन हॅण्डबॅग कोणत्या प्रकारची आणि आकाराची निवडायची याचा विचार केला जातो. सध्या अनेक ई-कॉमर्स साईट्सवर खास बॅग्जचा सेल सुरू आहे. अनेक आकार-प्रकारातील या बॅग्जमधून तुमच्या खांद्यावरची बॅग कोणती? हे निवडण्यासाठी सध्या ट्रेण्डमध्ये असलेल्या बॅग्जच्या प्रकारांविषयी जाणून घेऊया..
प्रत्येक आऊटफिटवर शोभेल अशी बॅग आपल्या वॉडरोबमध्ये हवी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असतेच. यातही बऱ्यापैकी डिस्काऊंटमध्ये चांगली, टिकाऊ आणि ब्रॅन्डेड बॅग असावी असंही प्रत्येकीला वाटतंच. अशावेळी ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या माध्यमातून अक्षरश: जगभरात ट्रेण्डी असलेल्या पॉप्युलर, क्लासिक अशा विविध प्रकारातील असंख्य बॅग्जचे प्रकार घरबसल्या स्त्रियांना पाहायला मिळतात. आणि चटकन भुरळ घालणाऱ्या या बॅग्जमधून आपल्यासाठी कोणती निवडावी याचा खल सुरू होतो. कपडे, दागिने, बॅग्ज अशा नानाविध गोष्टींचा ट्रेण्ड काळानुरूप बदलत असतो. आणि ट्रेण्डनुसार अपटुडेट राहण्यासाठी कॉलेजपासून ऑफिसपर्यंत आणि शॉपिंगपासून ते ट्रॅव्हिलगपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचं जर काही असेल तर ती हॅण्डबॅग. हॅण्डबॅगशिवाय कोणताही लूक पूर्ण होत नाही हेच खरं.. म्हणजे लग्नात मिरवतानाही शोल्डर किंवा हॅण्डबॅग्जपेक्षाही हल्ली पोटली किंवा क्लचला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे बॅग ही फक्त सामान ठेवण्यासाठी गरज इतकं ते मर्यादित राहिलेलं नाही. तर ही बॅग तितकीच स्टायलिश, ब्रॅण्डेड आणि आपल्या ड्रेस, लूकला शोभेल अशी हवी असते. बरं.. ऋतूंच्या अनुसारही हा बॅग्जचा ट्रेण्डही बदलत असतोच. त्यामुळे अजून न सरलेला उन्हाळा आणि पावसाची चाहूल या दोन्हींचा विचार करत बॅगची खरेदी करावी लागणार आहे.
टोट बॅगबॅग म्हटलं की त्यात असंख्य गोष्टी राहतील याच बाबीचा विचार पहिल्यांदा येतो. बॅग किती मोठी आहे, कप्पे किती आहे आदी गोष्टी पहिल्यांदा डोक्यात घोळू लागतात. बॅगमधली स्पेस हा निकष महत्त्वाचा असेल तर पहिली पसंती मिळते ती टोट बॅग्जना. बॅगमध्ये भरपूर जागा, कप्पे असावेत आणि ती स्टायलिशही हवी या सगळय़ा बाबींची पूर्ती करणारा बॅगचा प्रकार म्हणजे टोट बॅग्ज. सध्या टोट बॅग्जमध्येही प्रिटेंड, फ्लोरल पिंड्रेट, हाताने विणकाम केलेल्या, कापडाच्या अशा अनेक प्रकारच्या टोट बॅग्ज बाजारात उपलब्ध आहेत. रंगांचा विचार करता ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया अनेकदा पिंट्रेंड बॅग्जऐवजी काळा, ऑलिव्ह ग्रीन, कॉफी अशा रंगसंगतीच्या बॅग्जना जास्त पसंती देतात हे लक्षात घेऊन मोठय़ा आकाराच्या आणि ठरावीक रंगसंगती असलेल्या टोट बॅग्ज मोठय़ा प्रमाणावर ई कॉमर्स साईटवर उपलब्ध आहेत. लाव्ही, लीगल ब्राईबसारख्या अनेक ब्रॅण्ड्सच्या टोट बॅग्ज ई कॉमर्स साईटवर पाहायला मिळतात.
स्मॉल शोल्डर बॅग
बहुधा कोणत्याही खास समारंभाला जाताना ठरावीक सामान ठेवण्यासाठी मुलींना अथवा स्त्रियांना वनसाईड पर्स घेण्याची सवय असते. अलीकडे शालेय आणि कॉलेजवयीन तरुणी अशा बॅग्जना जास्त पसंती देताना दिसतात. परंतु या वनसाईड बॅग्जचा मोठा पट्टा त्यांना नकोसा वाटतो. त्यामुळे सध्या शोल्डर बॅग ट्रेण्डमध्ये आल्या आहेत. यात नायलॉन, लेदर, सिन्थेटिक लेदर, विनटेज टेक्श्चर असणाऱ्या स्मॉल शोल्डर बॅगला तरुणींची खास पसंती मिळते आहे. याशिवाय, मल्टिकलर शोल्डर बॅग्जदेखील आवडीने खरेदी केल्या जात आहेत. या बॅग्सच्या पट्टय़ांमध्येदेखील विविधता आढळते.
फॅनी बॅग
खांद्यावर किंवा हातात बॅग बाळगायचा कंटाळा येत असेल तर सध्या ट्रेण्डमध्ये असलेल्या फॅनी बॅग्ज तुम्हाला कम्फर्ट आणि स्टायलिश लूक या दोन्हीसाठी उपयुक्त ठरू शकतात. या फॅनी बॅग्जमध्ये बेल्ट बॅग, मुन बॅग, बेली बॅग, वेस्ट बॅग असे विविध प्रकारही सध्या मोठय़ा प्रमाणात पसंत केले जात आहेत. मुळात म्हणजे कोणत्याही वयोगटातील स्त्री असली तरी या फॅनी बॅग्स तिच्या आऊटफिटला शोभून दिसतात. या फॅनी बॅग्ज पावसाळय़ात फार उपयुक्त ठरतात. या बॅग प्रामुख्याने नायलॉन आणि पॉलिस्टर या कपडय़ांपासून तयार केल्या जातात. याशिवाय जर कोणत्या पार्टीला जायचे असेल तर निऑन रंगाच्या पारदर्शक आकर्षक बॅग्जही वापरता येतात.
स्लिंग आणि क्रॉस बॅग
हाताने विणलेल्या स्लिंग आणि क्रॉस बॅगदेखील सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. यात खण, पैठणी, इरकल या साडय़ांच्या कपडय़ापासून तयार केलेल्या बॅग किंवा विविध धाग्यांपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बॅग लग्नसमारंभात महिला आवडीने वापरताना दिसत आहेत. याशिवाय, ऑफिससाठी म्हणूनही थोडय़ा मोठया आकाराच्या स्लिंग बॅगही उपलब्ध आहेत.
लक्झरी बॅग
स्त्रिया अनेक वेळा त्यांच्या आवडीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करताना विचार करत नाहीत. अशा वेळी अगदी महागडी हॅन्डबॅग असेल तर त्या खरेदीसाठी मागेपुढे पाहात नाहीत. अलीकडे लक्झरी किंवा ब्रॅन्डडेड बॅग्ज वापरण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे; परंतु दरवेळी तो खिशाला परवडेलच असे नाही. अशा वेळी शनेल, लावी, बॅगिट, प्रादा, गुची, लुई व्हिटन असे मोठमोठे ब्रॅण्ड उन्हाळी-पावसाळी सेल ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू करतात. जेणेकरुन सामान्य व्यक्तींना देखील ब्रॅण्डेड बॅग्ज तुलनेने कमी दरात विकत घेता येतील. मग यात डफल, बकेट, फ्लॅप, मिनी हॅन्डबॅग अशा विविध प्रकारच्या हॅन्डबॅग्ज उपलब्ध केल्या जातात आणि सध्या या ब्रॅण्डेड बॅग्जच्या प्रकारांनाही स्त्रियांची अधिक पसंती आहे. अनेकदा त्यांचे आवडते ब्रॅण्डही ठरलेले असतात.
viva@expressindia.com