यंदाच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून संगीतातली नवी पिढी घडवणाऱ्या गानगुरुंना व्हिवा लाउंजमध्ये आम्ही आमंत्रित केलंय. जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर-काटकर व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून येत्या सोमवारी  वाचकांच्या भेटीला येत आहेत. या घराण्याची पेचदार लयकारी नजाकतीनं पेश करणाऱ्या श्रुतीताईंचं ख्याल या गानप्रकारावर प्रभूत्व आहे. त्यांनी ठुमरी, टप्पा, नाटय़संगीत आदी उपशास्त्रीय प्रकारांतही स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.
या चतुरस्र गायकीची दखल घेत २०११मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, स्वित्र्झलड आदी देशांतही त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. शास्त्रीय संगीतातील पुढची पिढी घडविण्यासाठी लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थेच्या कुलगुरूपदाची जबाबदारीही त्या पार पाडत आहेत. म्हणूनच यंदाच्या गुरुपौर्णिमेला या संगीत गुरुंशी बातचीत करण्याची संधी सगळ्यांना मिळणार आहे.
लाऊंजच्या माध्यमातून आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटता येणार आहे. कोल्हापूरच्या संगीतप्रेमी सुरेल घरात जन्म झाल्यानं श्रुतीताईंना संगीताचे धडे घरापासूनच मिळाले होते. त्यांचा गायन क्षेत्रातला हा प्रवास, त्यांची कारकीर्द, कुलगुरू म्हणून काम करतानाचे अनुभव अशा अनेक विषयांवर आपण गप्पा मारणार आहोत.  
तारीख : सोमवार, २२ जुलै
वेळ : दुपारी ३.३०
स्थळ : पु.ल. देशपांडे
मिनी थिएटर,
प्रभादेवी

Story img Loader