वस्त्रान्वेषी
विनय नारकर
मराठी वस्त्रांच्या रंगविश्वामध्ये रंगांच्या महत्त्वानुसार काळा, पिवळा, तांबडा, हिरवा या रंगांबद्दल आपण जाणून घेतले. अर्थात, इतरही रंग वस्त्रांमध्ये असायचेच. याही रंगांची मोहक नावं जुन्या मराठी साहित्यात दिसून येतात. मराठी वस्त्रांच्या रंगविश्वाचे एक वैशिष्टय़ म्हणजे ही रंगांची नावं फक्त वस्त्रांसाठीच आहेत. इतर ठिकाणी या रंगांच्या नावाचा उपयोग केला जात नाही.
पांढरी वस्त्रे कित्येक शतकांपासून लोकप्रिय आहेत. साहित्यात पांढऱ्या रंगांचा उल्लेख येतो तेव्हा सफेत, धवळे किंवा ढवळें आणि क्षीरोदक असे शब्द वापरले जातात. पांढऱ्या रंगाच्या रेशमी वस्त्रास क्षीरोदक असे म्हटले जाते.
महानुभाव पंथाच्या, पंडित दामोदर कृत ‘वच्छहरण’ या ग्रंथात या ओळी येतात, ‘क्षीरोदका पासवडेयां वरी : पहुडतसे राऊ मुरारी’ तसेच भास्करभट्ट विरचित ‘शिशुपाल वध’ मध्येही क्षीरोदकाचा उल्लेख येतो.
‘पद्मरागाचेया रंगावरी : घातली क्षीरोदकु चाउरी’
म्हणजेच मराठी भाषेत साहित्य बनू लागले त्या आधीपासूनच क्षीरोदक हा शब्द प्रचलित होता. महाभारतात रुक्मिणीबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली गेली आहे. रुक्मिणीस श्वेत वस्त्रेच आवडायची, तिचे वर्णन ‘श्वेतकौषेयवसिनी’ असे आले आहे. रुक्मिणी ही विदर्भ राजा भीष्मकाची कन्या, त्या अर्थाने आपण ती मराठी असल्याचा बादरायण संबंध जोडायला हरकत नाही.
कवी मुक्तेश्वर (सोळावे शतक) यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वर्णिताना म्हटले आहे की, दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्र फेडले आणि पाहतो तो काय, आंत क्षीरोदक ! ‘रागे फेडिले ते अंशुक । तंव माझारी देखे क्षीरोदक’ शाहीर गोविंद साळी यांच्या एका लावणीत ‘ढवळी पैठणी’ नेसलेल्या विधवेची व्यथा मांडली आहे.
‘नेसून जरतार पैठणी ढवळी.. कंचुकीस..’
पांढरा रंग हा त्याग, विरक्तीचे किंवा विरहाचे प्रतीक आहे, त्यामुळे हे संयुक्तिकच आहे. पण लावणीमध्येही पांढऱ्या रंगाच्या साज श्रुंगाराचे उदाहरण सापडते. ‘साज रंगेल करवा’ या वीरक्षेत्री लावणीच्या पहिल्याच कडव्यात शुभ्र रंगाच्या साजाचे वर्णन आले आहे.
सखया चार दिवस मज नित्य नवा साज रंगेल करवा
पहिलें दिवशीं सफेतिच कर सारी आण पातळ चंदेरी
दागिने मोत्याचे नखसीखवरी..
शय्या सुमनाचि शुभ्रची ठरवा साज रंगेल करवा
या लावणीमध्ये विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, शुभ्र रंगाचा श्रुंगार करताना, नायिका ‘चंदेरी’ पातळाची मागणी करते. कारण चंदेरी साडय़ांचे सौंदर्य हे शुभ्र रंगात विशेष खुलून येते. त्यामुळे चंदेरीच्या शुभ्र साडय़ा जास्त प्रसिद्ध आहेत. शाहिरांच्या या सौंदर्यदृष्टीला दाद दिलीच पाहिजे!
इथेच एका लोकगीताचा उल्लेख करणे महत्त्वाचे वाटते. हे लोकगीत सरोजिनी बाबर यांनी ‘भांगतुरा’ पुस्तकात दिले आहे. त्यातल्या दोन ओळी आहेत, ‘इंदूरची ती नाजूक काळी भिवंडीची शुभ्र पांढरी’ सहसा उल्लेख न येणारी भिवंडीची साडी, पांढऱ्या रंगासाठी प्रसिद्ध होती.
‘साज रंगेल करवा’ या लावणीशिवाय तुकनगिरीची एकच लावणी जी उपलब्ध आहे, त्यातही पांढऱ्या रंगाच्या श्रृंगाराचे वर्णन आहे. शाहिरांचे कलगीवाले आणि तुरेवाले हे जे प्रकार आहेत, त्यांच्यापैकी तुरेवाल्यांच्या निशाणाचा रंग पांढरा असतो. हे तुरेवाले वैष्णव असतात आणि वैष्णव संन्याशांच्या वस्त्राचा रंग पांढरा असतो. अशी तर्कसंगती म. वा. धोंड यांनी दिली आहे. या निशाण्याच्या रंगाचा संबंध, लावणीतील श्रृंगाराच्या रंगाशी असू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. हे जर खरे असेल तर श्रृंगाराचा रंग पांढरा कसा असू शकतो याचे स्पष्टीकरण मिळू शकते. तरीही संत एकनाथांनी सोळाव्या शतकात लिहिलेल्या श्रृंगार रंगाच्या गौळणीतही, पहिली गौळण पांढऱ्या रंगाचा श्रृंगार करून येते.
आल्या पांच गौळणी पांच रंगाचे श्रृंगार करूनी
पहिली गौळण रंग सफेत जशी चंद्राची जोत पांढऱ्या रंगाला आणखीही नावे साहित्यातून आली आहेत. होनाजी बाळा यांनी एका लावणीमध्ये ‘कंबुवर्ण’ म्हणजे शंखाच्या रंगाचे पांढरे वस्त्र वर्णिले आहे. ‘कंबुवर्ण पटवस्त्र प्रकाशी’ , अशीही ओळ आहे. पण या आधीही म्हणजे सोळाव्या शतकात कवी मुक्तेश्वराने हाच शब्द वापरला आहे. ‘कंबुवर्ण रजतहंस’ या ओळीतही पांढऱ्या वस्त्राचे वर्णन आहे. वामन पंडितांनी वस्त्रे निरनिराळय़ा रंगांची असली तरी, ती तंतूंनीच बनलेली असतात, या अर्थाचा श्लोक लिहिला आहे. यात पांढऱ्या व काळय़ा रंगांना सित व असित अशी नावे आली आहेत.
‘तरूस्कंधीवस्त्रे, सित, हरित, आरक्त, असिते
अनेका रंगांची परि सकळ तंतूंचि असिते’
पांढऱ्या रंगावर तशी पुरुषांची मक्तेदारी. पागोटे, पगडी किंवा इतर शिरोभूषणे व धोतर कोणत्याही रंगात का असेना, अंगरखा शुभ्र असणे हाही एक संकेत होता. माधवराव पेशव्यांचे वर्णन एका पोवाडय़ातून असे येते,
‘सफेत पोशाख घालून अंगावर गहिना हा जडित दंडी पाच रत्नांच्या पेटय़ा सोन्याची कडी हातात’ तसेच एका पोवाडय़ातून नाना फडणवीसांचे वर्णन असे येते, ‘पागोटे शेला सुंदर अंगरखा शुभ्र भरदार’ शाहीर सगनभाऊंनी एका लावणीत ऐपतदार पुरुषाचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘समजूत माझी झाली शुभ्र पोशाख करी जरीचा सिरपेंच तुरा कंठी चौकडा झोंक भिक बाळीचा’ केवळ अंगरखाच नाही तर, सुती धोतरेही शुभ्रच असत.
मराठी रंगविश्वाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्टय आहे. ते म्हणजे रंगांच्या मिश्रणाने तयार होणाऱ्या निरनिराळय़ा रंगछटा, आणि त्या रंगछटांना असणारी मोहक नावं. या रंगछटा आधुनिक नाहीत. काही शतकांपासून या मनाला भुरळ घालत आहेत. या रंगछटांपैकी ‘कुसुंबी’ ही खास रसिकमोहिनी छटा. वसंत ऋतूचे लावण्य प्रतििबबित करणारी कुसुंबी. एका कवीने मराठी वस्त्रांच्या असंख्य प्रकारांची नावे देताना म्हटले आहे, चंद्रकळा शेलारी कुसुंबी बसंतिरंगी बहू पर्वत पडले गणती नाही मुखी कुठवर गाऊ वस्त्रालंकारांचे सौंदर्य नेमकेपणाने टिपणाऱ्या लावण्यकवींनी कुसुंबी रंग श्रृंगार कसा खुलवू शकतो हे जाणले.
लाल चोळी कुसुंबी ग लाल
तुझ्या ठुशीला देतो ढाळ
कवी अमृतराय यांच्या कवितेत अशी ओळ येते, आपण जरी कुसुंबा शेला नेसुनि कडिये घे हेरंबा कुसुंबी हे एक प्रकारचे फूल असते. करडई या रोपाला ही फुले येतात. पिवळसर, नारिंगी व लालसर छटा असलेले हे फूल असते. या फुलात केशरासारखे तंतू असतात. हे तंतू वाळवून त्याच्यापासून कुसुंबी रंग बनवला जातो. मराठी वस्त्रांमध्ये येणारी कुसुंबी फुलांची रंगछटा ही केशरी आणि गडद गुलाबी आणि लालसर या रंगांच्या मिलनाने बनलेली असते.
मीरेच्या काव्यामध्येही कुसुंबी किंवा कुसुमल या रंगाचे महत्व आहे. कुसुंबी, कुसुंभ, कुसुमल याशिवाय यास कुसुमरंगी अशी नावेही आहेत. प्रसिद्ध चित्रकार शुभा गोखले सांगतात की मीरेच्या अभिव्यक्तीमध्ये असणारे त्याग व प्रीती हे केशरी व गुलाबी रंगांच्या प्रतीकाने, म्हणजेच कुसुंबी रंगाच्या रूपाने येतात.
मोरोपंतांनी कुसुंबी वस्त्र श्रीकृष्णास प्रिय असल्याचे सांगून, या मीरेच्या संदर्भास आणखी एक पैलू दिला आहे. ते म्हणतात, ‘केसररंजित रुचते किंवा कौसुंभ वस्त्रयुग वामे’ . कुसुंबी रंग हा खास करून श्रावण महिन्याशी संबंधित मानला जातो. श्रावणात कुसुंबी रंगाची वस्त्रे नेसावीत असा संकेतही रूढ होता. उत्तर भारतातील एका लोकगीतात असे वर्णन आले आहे, ‘सखी, सावन की रूत आयी सख्या हिंडोले झुले पहने कुसुमरंग सारी झुले राधिका प्यारी’ शुक्ल आणि कुसंबी या मीरेला प्रिय असणाऱ्या दोन्ही रंगांबद्दच्या लेखाचा समारोप कवी मुक्तेश्वराच्या काव्यातील अशा दोन ओळींतील करूया, ज्यात हे दोन्ही रंग आले आहेत.
‘तेंही आसुडता वेगीं ।
देखे डाळिंबी कुसुमरंगी ॥
तया आतुनि झगमगी ।
शुद्धरजत पाटाऊं ॥’
– viva@expressindia.com