|| वेदवती चिपळूणकर
‘आय.सी.डब्ल्यू.ए. इन कॉस्ट अकाऊंटिंग’ केल्यानंतर तिने नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी केली. आय.सी.डब्ल्यू.ए.ला शेवटच्या वर्षांला एका विषयात तिला गोल्ड मेडलही मिळालं. त्यानंतर पुढची नऊ वर्ष तिने फायनान्सच्या क्षेत्रात नोकरी केली. नोकरी करायला लागल्यावर तिने तिच्या सगळ्या सुट्टय़ा देशभर फिरण्यासाठी उपयोगात आणल्या. आपण पाहिलेला देश इतरांना दाखवावा आणि आयुष्यभर भटकंती करावी अशी इच्छा सगळ्या ‘भटक्यां’प्रमाणे तिचीही होती. याच उद्देशाने २०१६ या वर्षी ऑगस्टमध्ये ‘स्टार बाजार, टाटा’मधली नोकरी तिने सोडली. पण तिचा हा ‘प्रवास’ नोकरीत असल्यापासूनच सुरू झाला होता. स्वत: एकटीच्या जीवावर वर्षभरात २५०हून अधिक जणांना ठिकठिकाणी फिरवून आणणारी ही ‘ट्रॅव्हलर’ आहे श्वेता बंडबे.
‘फिरणं’ हा श्वेताच्या लाईफस्टाइलचा भाग आहे. कॉर्पोरेटमध्ये ‘हायली पेड’ नोकरी असूनही तिने ती नोकरी सोडली. या तिच्या कॉर्पोरेट आयुष्याबद्दल बोलताना श्वेता म्हणते, ‘आय.सी.डब्ल्यू.ए.ला एका विषयात राष्ट्रीय स्तरावरचं गोल्ड मेडल आणि मुंबई युनिव्हर्सिटीमधून एम.कॉम. केल्यानंतर कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणं ही गोष्ट खूप स्वाभाविक होती. मी नोकरी करत होते, पण प्रत्येक वीकएंडला मी कुठेतरी भटकायला गेलेले असायचे. घर मध्यमवर्गीय असल्याने आणि आई-बाबांना फिरण्याची विशेष आवडही नसल्याने मी लहानपणापासून फार कमी फिरले होते. पण कमवायला लागल्यावर मात्र मी माझी नोकरी आणि फिरणं दोन्ही सांभाळायला सुरुवात केली. छोटय़ा-छोटय़ा टूर्स आणि वीकएंड ट्रेक्स मी सतत करत असायचे. कधी मित्रमैत्रिणींसोबत, कधी कोणत्या अनोळखी ग्रुपसोबत तर कधी एकटीच अशी मी फिरायला जायचे. त्याच काळात मी एका छोटय़ाशा ग्रुपशी जोडली गेले. स्वयंसेवक म्हणून काम करणं, थोडीफार मदत करणं, कधी टूरसोबत मॅनेज करायला जाणं असं मी नोकरी सांभाळून करत होते. तेव्हा माझे मित्रमैत्रिणी मला नेहमी हा सल्ला द्यायचे की मी कॉपरेरेट सोडून ट्रॅव्हलिंग किंवा टुरिझमच्या क्षेत्रात काहीतरी करावं.’
शिक्षणावर खर्च केला आहे, एवढा चांगला अभ्यास केला आहे, चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे अशात मध्येच नोकरी सोडून द्यायची हा निर्णय खूप धाडसाचा होता. जे करायचा विचार आहे त्यात जम बसलाच नाही तर पुढे काय, हा प्रश्नसुद्धा समोर होता. आईबाबांनी श्वेताला विरोध केला नसला तरी त्यांनाही काळजी होतीच. त्यात एकटय़ा मुलीने ट्रॅव्हलिंगकडे बिझनेस म्हणून पाहायचं म्हणजे त्यांना जरा रिस्कही वाटत होती. नोकरी सोडल्यानंतरचा काळ श्वेतासाठी थोडा कठीण होता. त्याबद्दल ती म्हणते, ‘नोकरी तर सोडली होती. आधी ज्या ग्रुपसोबत काम करत होते ते सुरूच होतं. मात्र त्यातून संपूर्ण करिअर कसं घडणार आणि किती आर्थिक रिटर्न्स मिळणार याबद्दल शंका होतीच. त्यांच्यासोबत जाताना अनेक नवीन लोक भेटले, अनोळखी माणसांसोबत भटकले, त्यांच्यात मिसळले. प्रत्येक वेळी नवीन ओळखी झाल्या. त्यातून वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन कळत गेले. माझ्या स्वभावात पेशन्स आणि मॅच्युरिटी येत गेली’. त्यावेळी माझ्याबरोबर ट्रॅव्हल करणाऱ्या अनेकांनी माझ्यातलं मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी या बाबतीतलं पोटेन्शियल ओळखून मला स्वतंत्रपणे काम करण्याचा सल्ला दिला. पण ते काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. स्वत:ची ट्रॅव्हलिंग कंपनी ही गोष्ट ऐकायला खूप भारी वगैरे वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यामागे प्रचंड काम होतं आणि त्यात प्रचंड रिस्क होती. मी ती रिस्क घ्यावी की नाही याबद्दल माझा निर्णय होत नव्हता, असं श्वेता सांगते.
खूप काळ विचार केल्यानंतर आणि स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच बाबींचा सखोल विचार, अभ्यास करून श्वेताने स्वत:ची ‘ट्रीपर जर्नीज’ सुरू केली. या तिच्या कंपनीतली सगळी कामं ती एकटी हाताळते. हे सगळं आव्हान एकटीने पेलण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल ती सांगते, ‘२०१४ मध्ये मी आणि माझी एक मैत्रीण अशा दोघी मिळून एक ट्रॅव्हलिंग कंपनी सुरू करायचं ठरवलं होतं, पण अचानक तिच्या वैयक्तिक कारणांनी तिला ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्यावेळी तो विचार बाजूला राहिला. त्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी, २०१८ मध्ये, मी पुन्हा तोच धाडसी निर्णय घेतला. या बिझनेसला यश मिळतं की नाही हे समजायला कमीतकमी तीन वर्ष तरी लागतील हे मला माहीत होतं. पण त्यानंतरही यातून अपेक्षेप्रमाणे आऊटपूट मिळालं नाही तर पुढे काय, हा प्रश्न होताच. कॉर्पोरेटमध्ये परत जाणं तर शक्य नव्हतं. त्यामुळे वेळ येईल तेव्हा बघू, असा विचार करून मी जरतरचे विचार काढून टाकले आणि कामाला सुरुवात केली.’
एक कंपनी स्थापन करायची म्हणजे त्यात हजार तांत्रिक गोष्टी असतात. कंपनीचं व्यवस्थापन, शासकीय परवानग्या, लायसन्स, रजिस्ट्रेशन, कायद्याच्या अटी अशी सगळी किचकट वाटणारी कामं तर असतातच, पण आर्थिक बाजू सगळ्यात मोठी जबाबदारी असते. ‘सुदैवाने मी नोकरी करत असताना सेव्हिंग्ज आणि इनव्हेस्टमेंट या बाबतीत फार जागरूक होते’, असं श्वेता म्हणते. त्यामुळे मला सुरुवातीचा फायनान्स उभा करताना प्रचंड त्रास वगैरे झाला नाही. मात्र टेक्निकली मी ट्रॅव्हलिंगच्या क्षेत्रात बिझनेससाठी कोणत्याच प्रकारे क्वॉलिफाइड किंवा सर्टिफाईड नव्हते. त्यामुळे कोणतीही चूक माझ्याकडून होणं परवडणारं नव्हतं. सगळे नियम, लायसन्स, कायदेशीर चौकटी या खूप बारकाईने अभ्यासून पाळायच्या होत्या. मार्च २०१८ मध्ये मी ऑफिशियली ‘ट्रीपर जर्नीज’ सुरू केलं आणि अनाऊन्समेंटच्या दुसऱ्या दिवशीच मला पहिली विचारणा झाली. त्यामुळे कामाला लगेचच सुरुवात झाल्याचं श्वेताने सांगितलं.
वर्षभरात ‘ट्रीपर जर्नीज’ने अडीचशेहून अधिक लोकांच्या ट्रिप्स मॅनेज करून देणं, प्रत्यक्षात त्या टूर्ससोबत जाणं अशा सगळ्या बाबी यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. एक मुलगी या बिझनेसमध्ये आहे म्हणून असेल कदाचित पण यातल्या ९० टक्के क्लाएंट्स स्त्रिया होत्या, असं ती सांगते. सध्या एकटीनेच सांभाळत असलेल्या ‘ट्रीपर जर्नीज’चा आणखी विस्तार करण्याची श्वेताची इच्छा आहे. ग्रुप टूर्सबरोबर कस्टमाइज्ड टूर्स देणं हा तिचा सध्याचा नवीन प्रयत्न आहे. अनेक नवीन कल्पनांसह श्वेताने ‘ट्रीपर जर्नीज’चा पुढचा प्रवास सुरू केला आहे.
‘सगळ्या ट्रॅव्हल कंपन्या जिथे नेतात तिथे मला लोकांना न्यायचं नव्हतं. टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध नसलेली ऑफ-बीट ठिकाणं, जी मी बघितली आहेत, ती मला इतरांना दाखवायची होती. आपल्याला माहिती असलेली एखादी सुंदर जागा आपण दुसऱ्याला दाखवतो, त्यालाही तोच आनंद मिळतो तेव्हा होणारं समाधान अवर्णनीय आहे. ते समाधान मिळवताना मला थोडे कमी पैसे मिळाले तरी चालतील. माझ्या गरजा मी थोडय़ा कमी केल्या की कमी पैशांत माझं भागेल, पण ते समाधान अमूल्य आहे. ट्रॅव्हलिंग हे, माझ्या मते, माणसाला जगायला शिकवतं. मी आता इतकी फिरले आहे की कोणत्याही परिस्थितीत मी सव्र्हाइव् नक्की करू शकते. तेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.’ – श्वेता बंडबे