एरवी गजबजलेल्या कॅम्पसच्या कट्टय़ांचा सध्या नूरच पालटलेला आहे. परीक्षेच्या काळातील कॅम्पस आणि एरवीचे कॅम्पस यातील बदल जाणून घ्यायचा असेल तर कॅम्पसला भेट द्यायलाच हवी. बंक करून कट्टय़ावर बसणारे चेहरे आता एकमेकांकडे नोट्स मागताना दिसत आहेत. एरवी लाऊड वाटणारे हे कॅम्पसचे कट्टे आता म्यूट झाले आहेत.
कॉलेज आणि कट्टा हे अगदी न तुटणारं समीकरण. खरं तर याच कट्टय़ावर अनेक विषय रंगतात, अनेक विषय चर्चिले जातात. नाक्यावरच्या एखाद्या मुलापासून ते बॉलीवूडच्या सेलिब्रिटीपर्यंत अनेक गप्पा या कॅम्पसमध्ये खुलत असतात. कुणाचा नवीन हॅण्डसेट, तर कुणाची नवीन कार अशा अनेक गोष्टी कट्टेकऱ्यांसाठी चर्चेच्या असतात. या सर्व वातावरणात वर्षांतील काही दिवस मात्र या कॅम्पसला एक वेगळीच अवकळा येते. हो हो, याला अवकळाच म्हणायला हवं.. एरवी ब्लूटूथने एकमेकांकडून नवीन साँग्ज शेअर करणारे चेहरे एकमेकांकडे केविलवाण्या पद्धतीने नोट्स मागू लागतात. या नोट्स मागणाऱ्यांमध्ये आघाडीवर असतात अस्सल कट्टेकरी. वर्गात बसणाऱ्या मुलीला काकूबाई म्हणून हिणवणारे हे चेहरे आता याच काकूबाईच्या मागे ‘अगं नोट्स देशील का?’ असे विचारत असतात. आता एरवी काकूबाईच्या नाकावरची माशी हलणार नाही, पण परीक्षेच्या काळात तिचा वधारलेला भाव मात्र तिच्या चेहऱ्यावर पटकन दिसून येतो. अशाच कट्टेकऱ्यांना थोडा धडा शिकवण्याची संधीही तिला अगदी आयतीच चालून येते.
नोट्स तर मिळाल्या, पण त्या लग्गेचच आणून दे असं सांगितल्याने पुन्हा झेरॉक्स वाल्याला मस्का लावून, अरे यार लवकर दे रे.. त्याच्या डोक्यावर बसून तब्बल दीडशे पानांचं झेरॉक्स करून घेतल्यावर खऱ्या अर्थाने झोप येते. पण आता अभ्यास तर करणं आलंच ना..
मग कुणाच्या घरी जाऊन अभ्यास करायचा.. की लायब्ररीमध्येच बसायचं, अशा एक ना अनेक शंका उपस्थित असतात. एरवीचे हे थोडे शायनिंग मारणारे कट्टेकरी आता मात्र परीक्षांच्या हंगामात थोडे नव्र्हस दिसू लागतात. वर्ष फुकट जाईल याची भीती यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. सतत मोबाइलवर गाणी लावून दुसऱ्यांना ऐकवणारे अनेक जणांचे फोनचं प्रोफाइल आता चक्क सायलेंटवर गेलेलं असतं. येऊ दे कुणाचा यायचा तो फोन.. जाऊ दे उडत, असा अॅटिटय़ूड पाहिल्यावर कॅम्पसमध्ये परीक्षांचा माहोल सुरू झालाय याची जाणीव होते. एरवी लायब्ररीच्या मजल्यावर न फिरकणारी ही गँग लायब्ररीच्या दर्शनाला वर्षांतून केवळ एकदाच जाते. त्यांच्यासाठी लायब्ररीमध्ये जाणं म्हणजे जणू काही पापच.
सध्या सर्व कॅम्पसमध्ये हे असंच वातावरण दिसू लागलेलं आहे. एरवीचा लाऊड कॅम्पस आता म्यूट झालेला आहे. परीक्षा झाल्यावर काय सेलिब्रेशन करायचं याचं प्लॅनिंगही अजून गुलदस्त्यातच आहे.
सायलेन्स प्लीज..
एरवी गजबजलेल्या कॅम्पसच्या कट्टय़ांचा सध्या नूरच पालटलेला आहे. परीक्षेच्या काळातील कॅम्पस आणि एरवीचे कॅम्पस यातील बदल जाणून घ्यायचा असेल तर कॅम्पसला भेट द्यायलाच हवी. बंक करून कट्टय़ावर बसणारे चेहरे आता एकमेकांकडे नोट्स मागताना दिसत आहेत. एरवी लाऊड वाटणारे हे कॅम्पसचे कट्टे आता म्यूट झाले आहेत.
First published on: 15-03-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silence please