शुक्रवार, १२ जुलै २०२४

स्वानंद गांगल

या महिनाअखेरीपासून पॅरिसमध्ये ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. जागतिकदृष्ट्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आपला लाडका तिरंगा डौलाने फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू उत्साही आहेत. ही संधी चार वर्षांनी एकदाच चालून येते, त्यामुळे त्याचा जमेल तितका लाभ घेण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. या मेहनती खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांचे सादरीकरण अधिक चांगले होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकारी पातळीवरूनही प्रयत्न होत असतात. याचाच एक भाग म्हणून भारताच्या ऑलिंपिक चमूसोबत या वर्षी असणार आहेत ‘स्लीप अॅडव्हायझर्स’ अर्थात निद्रा सल्लागार. गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात निद्रा सल्लागारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अगदी ख्रिास्तिआनो रोनाल्डोसारखे दिग्गज खेळाडूही या निद्रा सल्लागारांचे ऐकून आपली झोपेची साखळी सुधारतात. ज्याचा फायदा अर्थात त्यांच्या सादरीकरणावर होतो.

एखाद्या स्पर्धेतले चांगले सादरीकरण आणि झोप यांचा थेट संबंध असतो. मन:शांती, एकाग्रता, योग्य निर्णयक्षमता या गोष्टींसाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. बहुधा याच गोष्टी विचारात घेऊन भारतीय खेळाडूंची झोपेची फार काळजी घेतली जाते आहे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे अभ्यास आणि काम याच्या प्रेशरमध्ये कमी झोप घेण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये वाढते आहे. यात बदललेल्या जीवनशैलीचाही मोठा वाटा आहे. कधी कधी तर काम नसले तरीही मोबाईल, टीव्ही, अथवा लॅपटॉपवर विरंगुळा करण्याच्या नादात पहिला बळी हा झोपेचाच दिला जातो. ही अपुरी झोप तात्पुरती फायद्याची वाटत असली तरीही दूरचा विचार केला तर धोकादायक आहे. अपुरी झोप ही माणसाच्या कामावर, क्रिएटिव्हिटीवर, प्रॉडक्टिव्हिटीवर विपरीत परिणाम करते. जो इतका भयानक असू शकतो की काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासांनुसार एखाद्या देशाचा जीडीपी हा दोन ते तीन टक्क्यांनी खाली आणण्याचे काम हे अपुऱ्या झोपेमुळे होते.

हेही वाचा >>> पूजा खेडकर यांची केंद्राकडून चौकशी; एकसदस्यीय समितीची स्थापना, राज्याकडूनही अहवाल पाठविण्याची तयारी

आपल्याकडे झोप या गोष्टीबद्दल फारच नकारात्मक दृष्टिकोन ठेवला जातो. अगदी आपल्या लहानपणापासूनच कळत नकळत विविध माध्यमातून तोच विचार आपल्यात रुजवला जातो. हे कोणी सुरू केलं? कुठून सुरू झालं? का सुरू झालं? माहिती नाही, पण वर्षानुवर्ष हे असंच सुरू आहे. लहानपणी ऐकलेल्या ससा- कासवाच्या शर्यतीत ससा पराभूत होण्यामागचं कारण झोप हेच असतं! तर आपल्या रोजच्या बोलण्यातही ‘झोपा काढणे’ सारखे वाक्प्रचार हे नकारात्मकतेनेच वापरले जातात, पण असं असलं तरीही प्रत्येक सजीवाला आवश्यक असलेल्या झोप नावाच्या गोष्टीचे महत्त्व कमी होत नाही.

निद्रायतं सुखं दु:खं, पुष्टि कार्श्यं बलाबलम्,

वृषता क्लीवता ज्ञानमज्ञानं जीवितं न च।

चरक संहितेतल्या या श्लोकानुसार, सुख असो अथवा दु:ख, पोषण किंवा कुपोषण, शक्ती किंवा अशक्तपणा, सामर्थ्य किंवा नपुंसकता आणि लैंगिक इच्छा, जीवन किंवा मृत्यू, सभोवतालची दशा, मेंदूची सक्रियता किंवा दिशाहीनता आणि आळशी संवेदना या सर्व गोष्टी झोपेवर अवलंबून असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य झोप घ्यावी.

माणसाच्या आयुष्यातले झोपेचे महत्व आणि आपल्या कामावर त्याची होणारी परिणामकारकता याविषयी बोलताना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधे कार्यरत असलेले सायकायट्रिस्ट डॉक्टर शौनक अजिंक्य म्हणतात, ‘उत्तम झोप हा प्रॉडक्टिव्हिटीचा आधारस्तंभ आहे. माणसाच्या शारीरिक आरोग्याला चालना देणे, संज्ञानात्मक क्षमता तीक्ष्ण करणे आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्याचे काम झोपेतून होते आणि या सर्वच गोष्टी माणसाच्या प्रॉडक्टिव्हिटीवर थेट परिणाम करणाऱ्या असतात. माणसाचे शरीर निद्रितावस्थेत असतानाच अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया शरीरामध्ये घडत असतात. ज्यामध्ये पेशींचे पुनरुत्पादन, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, हार्मोन्सचे नियमन करणे यांसारख्या महत्त्वाच्या क्रियांचा समावेश असतो. ज्यामुळे माणसाचे शारीरिक स्वास्थ्य नीट राहण्यास मदत होते. मानसिक स्वास्थ्याच्या अनुषंगाने बोलायचे तर उत्तम झोपेमुळे माणसाची बुद्धी आणि स्मरणशक्ती तल्लख होते. आपल्या मेंदूमध्ये रोज साठत जाणाऱ्या माहितीचे योग्य नियमन करण्याची क्षमता झोपेमुळे वाढते, त्यामुळे अधिक प्रभावी काम करण्यासाठी योग्य झोप गरजेची आहे.’

दुपारची झोप हा आणखी एक वादाचा विषय आहे, ज्यात दोन प्रवाह आहेत. पण ही झोप देखील शरीराला रिचार्ज करण्यासाठी आवश्यक असल्याचे काही संशोधनांतून समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी बेंगलोरमधल्या वेकफिट नावाच्या एका स्टार्टअपने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ३० मिनिटांचा ‘नॅप ब्रेक’ जाहीर केला होता. अर्थात, रोज दुपारी २ ते २.३० या वेळेत झोपण्यासाठीची अधिकृत सुट्टी! या निर्णयाची खूपच चर्चा झाली होती. आज गूगलसहित अनेक बड्या जागतिक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी नॅप पॉड्सची व्यवस्था केलेली असते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा ऊर्जावान करण्यासाठीची ही एक उत्तम सोय आहे. थोडक्यात, काय तर रोज दुपारी साडेसात मिनिटांची पॉवर नॅप घेणारा ‘थ्री इडियट्स’ मधला ‘व्हायरस’ हा खरा शहाणा होता!

झोप ही फक्त मानवाची गरज नसून तो आपला अधिकार देखील आहे आणि तोसुद्धा साधासुधा अधिकार नाही तर संविधानाने मान्य केलेला मूलभूत अधिकार! २०१२ साली दिलेल्या एका निकालात माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे अधोरेखित केले आहे की संविधानाच्या कलम २१ अंतर्गत येणाऱ्या जगण्याच्या अधिकारात राईट टू स्लीप अर्थात झोपेचा अधिकारही समाविष्ट आहे. याबाबत बोलताना मुंबई हायकोर्टाचे वकील अॅडवोकेट सौरभ गणपत्ये यांनी सांगितले की, ‘हा निकाल देताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. तपास यंत्रणा वाट्टेल त्यावेळी चौकशीसाठी बोलवणं धाडून व्यक्तीच्या झोपेचं नुकसान तुम्ही करू शकत नाहीत. साधारणपणे कामाच्या वेळेत जेव्हा व्यक्ती त्या परिस्थितीत असते तेव्हा स्टेटमेंट्स रेकॉर्ड व्हावीत. सामान्यत: माणूस जेव्हा पूर्ण भरात नसतो त्यावेळी स्टेटमेंट्स घेणं चूक आहे, अशा शब्दांत कोर्टाने फटकारण्याचं काम केलं आहे. यामध्ये कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा मांडलेला मुद्दा असा की झोप ही माणसाच्या शरीराला आणि मेंदूला अत्यंत महत्त्वाची आहे. मानसिक आणि तत्सम तोल सांभाळण्यासाठी झोपेची प्रचंड आवश्यकता असते. त्यामुळे पुरेशी झोप हा माणसाचा मूलभूत हक्क म्हटला जायला हवा. अत्यंत मूलगामी असा हा निर्णय आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोच, शिवाय शरीराची चयापचय क्रियाही बिघडते. ऊर्जेचा क्षय होणे, शारीरिक क्षमतांवर आणि हृदयाच्या क्षमतांवर परिणाम या गोष्टी होतात. बाबा रामदेवांनी दिल्लीत आयोजित केलेल्या मोर्चावर मध्यरात्री पोलिसांनी हल्ला चढवला होता. त्याहीवेळी हा मुद्दा चर्चेत आला होता. झोपेत हल्ला चढवला गेल्यानंतर माणसाचा कोणत्याही अंगाने तोल जाऊ शकतो. एकतर मानसिक इजा होऊ शकतेच किंवा मग त्या अवस्थेत मानसिक तोल ढळून माणूस अपराधही करू शकतो. कित्येकदा परीक्षा देताना मुलं झोपत नाहीत, त्याचा मेंदूच्या कार्यांवर परिणाम होतो. शरीराच्या अनेक भावनांचा उगम मेंदूतून होतच असतो उदाहरणार्थ, जळजळ किंवा मळमळ आणि तत्सम भावना. किंवा मग वेगवेगळे रस मेंदूतून वाहतात, रक्तप्रवाह आणि मेंदू कार्य यांचा एकमेकांशी अनन्यसाधारण संबंध आहे. झोप ही त्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. कायद्याच्या राज्यात कायद्याचा विवेकाने वापरच अपेक्षित आहे.’

थोडक्यात काय तर विज्ञान, अर्थ, कायदा, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांमध्ये झोपेचे महत्त्व आहे आणि ते वेळोवेळी अधोरेखित झालेले आहे. झोपेचा नाश करून त्याबदल्यात कामाचे तास वाढवता येतील, पण कामाचा दर्जा वाढवता येणार नाही. तो वाढवायचा असेल तर त्यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे उत्तम झोप!

viva@expressindia.com