|| आसिफ बागवान

जगातील सर्वात वेगवान फोन कोणता?, या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहितीही नसेल. किंबहुना सामान्य ग्राहकांसाठी हा मुद्दा गौण ठरतो. ‘माझ्याकडे असलेला स्मार्टफोन दिलेल्या सूचनांचे त्वरेने पालन करतो ना, मग बस झालं’, असा विचार बहुतांश ग्राहक करत असतात. तरीही स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांमध्ये मात्र, वेगवान फोन निर्माण करण्याची स्पर्धा होऊ लागली आहे. खरंच वेगवान फोन हा ग्राहकासाठी कळीचा मुद्दा असू शकतो?

आपण जेव्हा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या डोक्यात काय मुद्दे असतात? फोनची कार्यक्षमता, कॅमेरा, स्क्रीन, आकार, स्पीकरचा आवाज, मेमरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंमत. अलीकडे बाजारात जाऊन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतांशी ग्राहक ई कॉमर्स संकेतस्थळांवरूनच मोबाइल खरेदी करत असतात. त्याचे एक कारण म्हणजे, तुम्हाला एकाच वेळी असंख्य फोनची वैशिष्टय़े एकमेकांशी पडताळून पाहता येतात आणि दुसरं म्हणजे ई कॉमर्स संकेतस्थळांवर हे फोन आकर्षक सवलतींमध्ये मिळत असतात. ग्राहक फोनची खरेदी करताना काय विचार करतात, याचा प्रतिसाद मोबाइल निर्मात्या कंपन्यांनाही लगेच मिळत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना अपेक्षित असलेल्या वैशिष्टय़ांचा अंतर्भाव करून बनवण्यात आलेले स्मार्टफोन बाजारात आणले जातात. हा कल गेल्या काही वर्षांत प्रकर्षांने दिसू लागला आहे.

पाचेक वर्षांपूर्वी स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहकांसाठी फोनचा आकार हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे मोठमोठय़ा आकाराचे स्क्रीन असलेले स्मार्टफोन बाजारात आणण्याकडे कंपन्यांचा ओढा होता. त्यातही एचडी डिस्प्ले, गोर्रिला ग्लास, कव्‍‌र्हड डिस्प्ले अशा विविध वैशिष्टय़ांचा समावेश करून आपल्या कंपनीच्या फोनकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांची चढाओढ लागत असे. त्यानंतरच्या काळात मेमरी आणि अंतर्गत स्टोअरेज या गोष्टींना ग्राहक महत्त्व देऊ लागले. लगोलग कंपन्यांनीही दोन, तीन, चार असे करत करत सहा-सहा जीबी रॅमचे फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली. मध्यंतरी सेल्फी फोटोग्राफीचे पेव फुटले तेव्हा कंपन्या जास्तीत जास्त मेगापिक्सेलचे फंट्र कॅमेरे असलेले स्मार्टफोन पुरवू लागल्या. अनेकदा तर मागील कॅमेऱ्यापेक्षाही पुढच्या बाजूस असलेल्या कॅमेऱ्याचा दर्जा अधिक चांगला ठेवण्यावर कंपन्यांचा भर दिसू लागला. अगदी प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोनपासून पाच-दहा हजार रुपयांत मिळणाऱ्या स्मार्टफोनमध्येही कॅमेरा हा कळीचा मुद्दा ठरू लागला.  ग्राहकाच्या कलेने स्मार्टफोनच्या वैशिष्टय़ांमध्ये सुधारणा करण्याच्या या स्पर्धेमध्ये आता नवीन भर पडली आहे ती फोनच्या वेगाची.

‘वन प्लस’ आणि ‘शाओमि’ या दोन कंपन्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ या वेगाच्या स्पर्धेचे ताजे उदाहरण आहे. ‘वन प्लस’ ही चिनी कंपनी गेल्या दोनेक वर्षांपासून भारतासह जगभरात नावाजली जात आहे. नामांकित कंपन्यांच्या ‘फ्लॅगशिप’  अर्थात उच्च श्रेणीच्या स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या वैशिष्टय़ांसारखी वैशिष्टय़े असलेले कमी किमतीतील स्मार्टफोन निर्माण करण्यात ‘वन प्लस’चा हातखंडा आहे. त्यामुळे वन प्लसच्या फोनची तुलना थेट सॅमसंगसारख्या तगडय़ा कंपनीच्या स्मार्टफोनशी होते. तर, घडले असे की, गेल्याच महिन्यात या कंपनीने ‘वन प्लस ७ प्रो’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला. हा स्मार्टफोन जगातील सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आणि त्यासाठी फोनच्या वेगाची चाचणी करणाऱ्या ‘अ‍ॅन्टूटू’ या अ‍ॅपने नोंदवलेले आकडेही जाहीर केले. ‘अ‍ॅन्टूटू’ हे एक चिनी कंपनीचे अ‍ॅप असून हे अ‍ॅप कोणत्याही फोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांची एकत्रित क्षमता चाचणी करून त्या फोनला गुणांक देते. ‘अ‍ॅन्टूटू’ने ‘वन प्लस ७’ला ३,६९,८७३ इतके गुणांक दिले. हे गुणांक कोणत्याही फोनपेक्षा जास्त असल्याने ‘वन प्लस ७’ हा सर्वात वेगवान फोन असल्याचा दावा कंपनीने केला. या दाव्याला महिना लोटतो न तोच ‘शाओमि’ या चिनी कंपनीने ‘वन प्लस’ला थेट आव्हान उभे केले आहे. ‘शाओमि’च्या ‘के२० प्रो’ला अ‍ॅन्टूटूने ३,८८,८०३ इतके गुणांक दिल्याने हा फोन आता जगातील सर्वाधिक वेगवान स्मार्टफोन ठरला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने या दोन्ही कंपन्यांमध्ये एकमेकांची खिल्ली उडवणाऱ्या जाहिरातीही प्रदर्शित झाल्या.

आता मुद्दा हा आहे की, कोणता फोन अधिक वेगवान हे ठरवणारे गुणांक खरोखरच दखल घेण्यासारखे आहेत का? किंवा खरंच फोन सर्वाधिक वेगवान असणं हा आवश्यक घटक आहे का? तसं तर फोनचा वेग किंवा दुसऱ्या अर्थाने त्याची कार्यक्षमता हा सुरुवातीपासूनच ग्राहकांच्या लेखी महत्त्वाचा निकष आहे. फोन खरेदी करण्यापूर्वी तो वेगाने काम करतो का, याची चाचपणी ग्राहक करून पाहतातच. कारण फोनची अन्य वैशिष्टय़े कितीही दमदार असली तरी, त्याचा वेग किंवा कार्यक्षमताच अपुरी असेल तर त्या वैशिष्टय़ांचा काहीच उपयोग नाही.

स्मार्टफोनची कार्यक्षमता कोणा एका घटकावर अवलंबून नसते. स्मार्टफोनमधील प्रोसेसर हा निश्चितच कार्यक्षमतेच्या केंद्रस्थानी असतो. स्मार्टफोनचा प्रोसेसर म्हणजे, त्याचा मेंदू असतो. एक अतिशय छोटी संगणकीय चिप स्मार्टफोनची खरी ताकद असते. या चिपमध्ये बसवलेले प्रोसेसर फोनमधील विविध क्रिया तत्परतेने आणि एकाच वेळी घडवून आणण्यासाठी मदत करत असतात. प्रोसेसर जितका चांगला तितक्या अधिक तत्परतेने या क्रिया दर्शनी आणि अंतर्गत यंत्रणेत घडत असतात. परंतु, फक्त प्रोसेसर दमदार असून फायदा नाही. या प्रोसेसरला सर्व क्रिया जलदगतीने पार पाडता याव्यात यासाठी आवश्यक डाटा आणि प्रक्रियेकरिता आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे काम ‘रॅम’ करतात. त्यामुळे स्मार्टफोन कार्यक्षम असावा, असे वाटत असेल तर रॅमही चांगल्या दर्जाच्या आणि ताकदीच्या असणे आवश्यक आहे. हे दोन्ही घटक व्यवस्थित कार्यान्वित रहावेत, यासाठी त्यांना आवश्यक असलेली ऊर्जा मिळवून देणारी बॅटरीही यातील महत्त्वाचा घटक आहे. बॅटरी कमी क्षमतेची असेल तर फोनचे अन्य घटक कितीही चांगले असले तरी, त्यांचा पुरेपूर वापर होणारच नाही. थोडक्यात कोणताही एक घटक फोनला वेगवान ठरवूच शकत नाही.

आता राहिला प्रश्न आपल्या गरजेचा. आपला फोन अधिक तत्परतेने काम करावा, असे वाटणे स्वाभाविकच आहे. आपण एखादे अ‍ॅप सुरू करतो किंवा फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू करतो किंवा गेम खेळतो, तेव्हा आपला फोन या प्रमुख क्रिया करत असतानाच पडद्यामागे अन्य क्रियाही करतच असतो. या सर्व क्रिया व्यवस्थित घडत असतील तर, आपला फोन सर्वात वेगवान आहे की नाही हा मुद्दा गौण ठरतो. कॅमेरा असो की प्रोसेसर असो, स्मार्टफोनच्या बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कंपन्या तीच तीच वैशिष्टय़े अधिक आकर्षक स्वरूपात ग्राहकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. ‘सर्वाधिक वेगवान फोन’ हा देखील या प्रसिद्धीचाच एक भाग आहे. कंपन्यांना स्मार्टफोनच्या वेगाची शर्यत खेळायची असेल तर खुशाल खेळू द्या. आपण आपल्या वेगाला साजेसा फोनच बाळगलेला बरा!

viva@expressindia.com