स्मृती वैती, शिकागो, यूएसए
‘शिकागो निओक्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक थॉट’ विषयी ऐकून होते. शिकागोतील अर्थशास्त्राचे सर्व प्राध्यापक आणि अर्थशास्त्रज्ञ त्याचे खंदे पुरस्कर्ते. त्यामुळे त्यांचा तिथल्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विचारसरणी किंचित वेगळी, जगद्मान्य अर्थगुरू केन्सच्या थोडीशी विरुद्धच.
जवळजवळ अर्धा तास मिशिगन लेकवर गोलगोल घिरटय़ा घालत असलेलं एअर इंडियाचं विमान सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ओहेर विमानतळावर उतरलं. अमेरिकेचा हा माझा पहिलावहिला प्रवास. शिकागोत मी उतरले ते तीन भल्या मोठय़ा सुटकेस, एम.ए. इकॉनॉमिक्सची पदवी आणि अप्लाइड इकॉनॉमिक्सची दुसरी उच्च पदवी मिळवण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर. सोबत आईचा प्रेमळ आशीर्वाद होताच. दोन वर्षांच्या कालावधीनंतर मी मास्टर्स पूर्ण केले आहे. मला अर्थशास्त्राची प्रचंड आवड. डॉ. मनमोहन सिंग, डॉ. अमर्त्य सेन, डॉ. नरेंद्र जाधव यांची टीव्हीवरील व्याख्यानं, चर्चासत्रं बघता बघता नकळत मी या क्षेत्राकडे कधी वळले ते कळलंच नाही. मग अर्थशास्त्र हा माझा लाडका विषय माझ्या करिअरचा जणू दिशादर्शक ठरला. पुण्याच्या ‘गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’मध्ये एम. ए. केल्यानंतर वाटलं की, अर्थशास्त्रातील व्यावहारिक ज्ञान घ्यावं आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा. त्यासाठी निवडलं ते अमेरिकेचं विद्यापीठ आणि मग शिकागोतच येऊन पोहोचले.
शेवटी संपूर्ण जगावर आर्थिक सत्ता गाजवणारी ग्रेट अमेरिकाच ती. त्यामुळे जगातील या सगळ्यात मोठय़ा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळणार म्हणून मी भलतीच खूश होते. मी ‘शिकागो निओक्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक थॉट’ विषयी ऐकून होते. शिकागोतील अर्थशास्त्राचे सर्व प्राध्यापक आणि अर्थशास्त्रज्ञ त्याचे खंदे पुरस्कर्ते. त्यामुळे त्यांचा तिथल्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विचारसरणी किंचित वेगळी, जगद्मान्य अर्थगुरू केन्सच्या थोडीशी विरुद्धच. २०१७ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड थेलर हे यांपैकीच एक. तिथल्या वास्तव्यात मला शिकागोतले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पैलू न्याहाळायला मिळाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकन स्टेट गव्हर्मेटच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली.
‘शिकागो’ ही अमेरिकेच्या मध्य पश्चिमेकडे असणाऱ्या ‘इलिनॉय’ या राज्याची फसवी राजधानी. ‘फसवी’ हा शब्द अशासाठी वापरला कारण बऱ्याच लोकांना ‘शिकागो’ ही या राज्याची राजधानी वाटते, पण प्रत्यक्षात ‘स्प्रिंगफिल्ड’ ही खरी राजधानी असून ‘शिकागो’ हे या राज्यातील सर्वात मोठं शहर आहे. शिकागोचा हिवाळा म्हणजे अत्यंत थंड व कोरडा तर उन्हाळा अतिशय उबदार व दमट, अगदी मुंबईची आठवण करून देणारा. ऋतू आणि हवामान कसेही असले तरी इथली माणसं मात्र अतिशय प्रेमळ, धीट, उत्साही आणि फॅशनेबल आहेत. इथल्या लोकांना फॅशनची प्रचंड आवड आहे. मग ती गुलाबी रंगाचे केस रंगवण्यापासून ते अगदी गडद काळ्या रंगाची लिपस्टिक लावण्यापर्यंत कशीही असली तरी हरकत नाही. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य असलं तरी त्याच्या मर्यादेचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी सर्वजण घेतात.
शिकागोला पडलेलं ‘विंडी सिटी’ हे नाव मिशिगन लेकवरून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे नसून त्याचीही वेगळीच पाश्र्वभूमी आहे. एका प्रसिद्ध आणि ऐकिवातल्या सिद्धांतानुसार चार्ल्स डॅना नावाच्या ‘द न्यूयॉर्क सन’ या वृत्तपत्राच्या एका संपादकाने १८९०च्या सुमारास शिकागोचा उल्लेख ‘विंडी सिटी फुल ऑफ हॉट एअर पॉलिटिक्स’ म्हणजेच ‘शिकागोचे पोकळ राजकारणी आणि बढाई मारणारे रहिवासी’ असा केला होता. पण काय गंमत आहे बघा, शिकागोचे टोपणनाव सार्थ करण्यासाठी तिथे थंड वारे वाहतातच की! शिकागोविषयी बोलताना ‘पिझ्झा’चा उल्लेख व्हायलाच हवा. शिकागो स्टाइल पिझ्झा, डिपडीश् पिझ्झा, थीन क्रस्ट पिझ्झा वगैरेवगैरे कुठल्याही प्रकारचा पिझ्झा खा आणि कुठल्याही रेस्तरॉमध्ये खा, शिकागोचा पिझ्झा टेस्टी लागतो, यात तिळमात्र शंका नाही. त्यातही जिओरडॅनोज पिझेरिया, लू मालनतीज पिझ्झा आणि ऑरेलिओस् पिझ्झा या प्रसिद्ध रेस्तरॉमधला पिझ्झा जरूर टेस्ट करा. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे इथल्या आखीवरेखीव आणि टोलेजंग इमारती. गगनाला भिडणाऱ्या या इमारती सूर्यास्तानंतरच्या रोषणाईत अगदी तेजस्वी व आकर्षक वाटतात. प्रत्येकीचा आकार, रंगरूप व रचना वेगवेगळी. पण त्यांच्यात एकोपा इतका की, दुरून पाहणाऱ्यास ‘आम्ही तशीच वेळ आली तर संघटित होऊन एकत्र लढण्यास सज्ज आहोत’, असं भासवतात. विलीस टॉवर, जॉन हँकॉक सेंटर, व्रिंग्ले बिल्डिंग, ट्रिब्युन टॉवर, लंडन हाऊ स, ट्रम्प टॉवर या तिथल्या काही प्रसिद्ध इमारती आहेत.
शिकागो हे खवय्यांचं आणि खिलवणाऱ्यांचं शहर. विविध संस्कृतींचं घट्ट मिश्रण असलेल्या या शहरात विविध प्रकारच्या खाण्याची रेलचेल असते. तिथे स्वस्त किमतीच्या पदार्थापासून ते महाग किमतीच्या पदार्थापर्यंत सर्व काही मिळतं. कुठलंतरी निमित्त काढून वेगवेगळी क्युझिन्स ट्राय करणाऱ्या तरुणाईची संख्या तिथे जास्त आहे. म्हणूनच कदाचित मेक्सिकन, इटालियन, इंडियन, क्युबन, चायनीज, नेपालिज, जमैकन अशी विविध रेस्तराँ आहेत. शिकागोचं बार कल्चरही प्रसिद्ध आहे. बिअर हे तिथल्या लोकांचं आवडतं पेय तर पिझ्झा नि बिअर हे फेव्हरेट कॉम्बिनेशन. तिथे फूड ट्रकची संकल्पनाही खूप प्रचलित आहे. स्वस्त आणि मस्त फूड विकणारे हे फूड ट्रक्स शिकागोत जागोजागी दिसतात. ऑफिसमध्ये काम करणारे आणि बराचसा विद्यर्थीवर्ग हा पर्याय निवडतो. तिथल्या लोकांना भारतीय पदार्थाची प्रचंड आवड. अगदी भारतीयांच्या तोडीने तिखट खाणारे इथले हे अमेरिकन्स. माझ्या परिचयातील काहीजणांना ‘हाऊ यू डिफाइन अ स्पायसी फूड?’, हा प्रश्न विचारल्यावर मला एकाने सांगितलं की, ‘तुमची पडजीभ तिखटाने भाजली तरच तो पदार्थ खऱ्या अर्थाने तिखट असतो’. तर दुसरा म्हणाला, ‘एखादा पदार्थ खाल्ल्याने तुमचा चेहरा घामाने थबथबला तर ते खरं तिखट जेवण म्हणायचं’! तिथल्या वास्तव्यात मला फिरण्याचा छंद लागला. थोडेसे पैसे आणि रजा जमवून वर्षांतून एकदा किंवा दोनदा एखादं ठिकाण फिरून येण्याची भारतीयांची मानसिकता आहे. पण अमेरिकन लोकांना मात्र फिरण्याचं खूप वेड आहे. किंबहुना त्यांच्या लँाग वीकएंड्स, थँक्स गिव्हिंग आणि ख्रिसमसच्या सुट्टीत फिरण्याचं नियोजन आधीच झालेलं असतं. म्हणून कधी व्यवस्थित नियोजन करून किंवा कधी अचानक बेत आखून भरपूर फिरण्याची, वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करण्याची आवड आणि सवय मला लागली.
शिकागो शहराच्या कडेला वसलेला चिमुकला भारत म्हणजे डिवॉन. सगळीकडे अरुंद रस्ते, गर्दीगोंधळ, झगमगाट आणि थोडीशी अस्वच्छताही. अमेरिकेत राहण्याच्या प्रबळ इच्छेने काही मध्यमवर्गीय भारतीय आणि पाकिस्तानी लोकांनी काही किरकोळ व्यवसाय सुरू केले आहेत. ते स्वस्ताईची हमी आणि भारताची आठवण करून देतात. तिथे भारतीय कपडय़ांची, साडय़ांची, दागिन्यांची दुकानं, स्वस्त पार्लर्स, भारतीय ग्रोसरी शॉप्स नि भारतीय रेस्तराँ आहेत. इतकंच काय तर पाणीपुरीच्या ठेल्यापासून ते बनारसी पानवाल्याच्या टपरीपर्यंत सगळं काही तिथे पाहायला मिळतं. तिथल्या मंदिरात गणपतीचं दर्शन घेता येतं. गुरुद्वारातल्या लंगरचा आस्वाद घेता येतो. डिवॉनला भारतीय पर्यटकांपेक्षा गोऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. शिकागोत जगातील जवळजवळ सगळ्या संस्कृतींचे लोक राहात असल्याने सर्व प्रकारचे सण साजरे केले जातात. पण सगळ्यात मोठय़ा प्रमाणात आणि अधिक उत्साहाने साजरा केला जाणारा इथला प्रसिद्ध सण म्हणजे ‘सेंट पॅट्रिक्स डे’. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात येणारा हा ‘सेंट पॅट्रिक्स डे’ साजरा करताना फक्त आयरिशच नाही तर समस्त शिकागो शहर खूपच उत्साहात असते. हा प्रामुख्याने आर्यलड देशाचा सण आणि हिरवा रंग हे त्या देशाचं प्रतीक. म्हणून त्या दिवशी संपूर्ण शिकागो स्वत:वर जणू काही हिरवे गालिचे ओढून घेतं. त्या दिवशी सकाळी नऊ वाजता शिकागो नदीत हिरवा रंग मिसळून तिला संपूर्ण हिरवी करतात. त्यानंतर निघते ती शिकागो – डाऊ नटाऊ न परेड. त्या दिवशी समस्त तरुणाई हिरवा पेहराव, हिरवे दागिने आणि हिरवा मेकअप करून सकाळीच हजेरी लावते. बऱ्याच ठिकाणी मोफत बीअरही मिळते. या दिवशी भलतंच जल्लोषाचं वातावरण असतं. मग ही सगळी मंडळी या परेडमध्ये धुंद होऊ न हसतात, गातात, नाचतात आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या ‘ग्रीन डे’ची वाट पाहातात.
शिकागोविषयी किती लिहू आणि किती नाही, असं वाटतं आहे. कारण इथला प्रत्येक दिवस हा नवीन अनुभव आणि नवीन उत्सुकता घेऊ न येणारा असतो. म्हणून शेवटी म्हणावंसं वाटतं की, ‘ती एक सुंदर तरुणी, अगदी धनवंत लक्ष्मीच. भव्यदिव्य असा तिचा पसारा. बोल्ड-फॅशनेबल असा तिचा डोलारा. कोणाला सुरुवातीला भासे, किती ही अहंकारी आणि शिष्ट. पण जसजसे तिच्याजवळ जावे, तिच्याशी मैत्री करावी, तशी तिने अगदी ऊबदार मिठी मारावी. खूपखूप माया करावी आणि गोड स्मृतींचा खजिना आपल्यापुढे ओतावा, अशी आहे माझी शिकागो नगरी’.
संकलन : राधिका कुंटे
viva@expressindia.com