राधिका कुंटे – viva@expressindia.com

आपल्याला जखम होते. ती अनेकदा बरी होते किंवा क्वचित तिचा व्रण राहतो. ती बरी झाल्यावर आपण ती गोष्ट विसरूनही जातो. अगदीच जखमेत संसर्ग वगैरे झाला तर डॉक्टरी सल्ला घेऊन उपचार करतो. पण या जखमांच्या जगात बऱ्याच घडामोडी झालेल्या असतात या कालावधीत. त्यातल्या काही मुद्दय़ांवर स्नेहल कदम संशोधन करते आहे.

स्नेहल कदमला लहानपणापासून विज्ञानाची आवड असली तरी त्यातील करिअरविषयीचा निर्णय पक्का ठरला नव्हता. अकरावी—बारावीच्या वर्षांत तिने आयआयटीचा क्लास लावला होता. तिथे गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास व्हायचा. बाकी विषयांचं स्वयंअध्ययन व्हायचं. सगळ्या विषयांमध्ये जीवशास्त्र अगदी आवडीचा विषय. दरम्यान, एका नातलगाकडून तिला आयसरबद्दल कळलं. तिथल्या प्राध्यापकांकडून आयसरची माहिती मिळाली. ती ऐकून तिला त्यात रस वाटला. त्याबद्दल अधिक वाचल्यावर आयसरमध्येच प्रवेश मिळवायचं तिने मनाशी ठरवलं. प्रवेशपरीक्षेनंतर तिला आयसर पुणेमध्ये प्रवेश मिळाला. तिच्या या आणि पुढच्याही करिअरविषयक निर्णयांना घरच्यांनी कायमच पाठिंबा दिला.

ती सांगते की, ‘आयसरमध्ये पहिली दोन र्वष आम्ही गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र हे विषय शिकलो. संशोधनासाठी आवश्यक ठरणारा पाया त्यामुळे तयार होतो. दर सेमिस्टर आणि उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना प्रकल्प करता येतात. दुसऱ्या वर्षांच्या सुट्टीत आमची दहाजणांची टीम बोस्टनमधल्या ‘इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनीअर्ड मशीन’(आयजीईएम) या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपापलं संशोधन आपल्या संस्थेत करून सहा महिन्यांनी आपला प्रकल्प सादर करायचा. डॉ. चैतन्य आठले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलं. लॅबमधल्या कामाचा तो पहिलावहिला अनुभव होता. आम्ही सहाजणांनी बोस्टनला केलेल्या सादरीकरणासाठी कांस्य पदक मिळालं. संशोधनाच्या सगळ्या टप्प्यांची जवळून तोंडओळख होऊन माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर डॉ. चैतन्य आठले यांच्या लॅबमध्ये मी आणखी काही प्रकल्प केले’. तिसऱ्या वर्षांनंतर ती ‘मेकॅ नोबायोलॉजी इन्स्टिटय़ूट, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’मध्ये दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी गेली होती. पुढे दोन वर्षांनी तिने मास्टर्स थिसिसही तिथेच पूर्ण केला. तिथल्या सगळ्या खर्चासाठी स्टायपेंड आणि शिष्यवृत्ती मिळाली होती. तिचं मास्टर्स थिसिस २०१८ मध्ये पूर्ण झालं “SsrB regulates genes outside SPI—s to affect Salmonella lifestyle”  हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. Salmonella typhimurium या विषाणूवर तिथे आधीच संशोधन सुरू होतं आणि अद्याप सुरू आहे. त्यातील एका प्रकल्पात तिने Salmonella typhimurium या विषाणूच्या जनुकांचा अभ्यास केला.

पीएचडी करायच्या आधी आणखी थोडा अनुभव गाठीशी बांधावा, असं तिच्या मनात होतं. त्या दरम्यान तिला संशोधनाचं काम खरंच आवडतं आहे का, हेही पुन्हा चाचपता येणार होतं. कारण आधी पदवीसाठी काम करणं वेगळं आणि प्रत्यक्षात याच क्षेत्रात पूर्णवेळ काम करणं वेगळं. तेव्हा अगदी योगायोगाने डॉ. करिश्मा कौशिक यांच्याशी तिची भेट झाली. त्या नुकत्याच अमेरिकेतून पीएचडी करून भारतात परतल्या होत्या. त्यांच्याकडे ग्रॅण्ट होती आणि त्या लॅबचा सेटअप करण्याची तयारी करत होत्या. काही माहिन्यांतच लॅबचं काम झालं आणि मग तिने पुढची दोन र्वष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फर्मेशन अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी’मध्ये डॉ. करिश्मा यांच्यासोबत काम केलं.

आपल्याला काही लागलं, आपण पडलो तर जखम होते. अनेकदा या जखमा बऱ्या होऊन लागल्याचा व्रण निघून जातो. खूपच जास्ती लागलं असल्यास तिथे जरासा व्रण राहतो. पण काहीजणांना जखमेत संसर्ग होतो, तेव्हा ती जखम बरी होत नाही. मधुमेही किंवा अन्य काही आजार असणाऱ्यांसाठी ही एक जोखीम असते. त्यामुळे डॉ. करिश्मा, स्नेहल आणि तिच्या टीमने जखमांच्या संदर्भातल्या मुद्दय़ांवर काम केलं. स्नेहल सांगते की, ‘सध्या सुरू असलेल्या संशोधनासाठी प्राण्यांचा वापर केला जातो. महत्त्वाचं म्हणजे मानवी त्वचा आणि या प्राण्यांची त्वचा यात फरक आहे. प्राण्यांचा कमीत कमी वापर करून त्याचा फायदा मानवी त्वचेसाठी कसा होईल यावर विचारपूर्वक संशोधन केलं जातं. आमच्या संशोधनाचा विषय ‘रिडय़ूस्ड सेरम मेथड्स फॉर कॉन्टॅक्ट बेस्ड कोकल्चर ऑफ ह्युमन डर्मल फायब्रोब्लास्ट्स अ‍ॅण्ड एपिडर्मल के रॅटिनासाइट’ हा होता. मानवी त्वचा अनेक स्तरीय आहे. त्यापैकी फायब्रोब्लास्ट आणि केरॅटिनासाइट  या दोन पेशी लॅबमध्ये कृत्रिम पद्धतीनं वेगवेगळे वाढवता येतात. पण मानवी त्वचेत पेशी एकमेकांच्या जवळ असतात आणि जखम झाल्यावर या पेशी मिसळतात. जखम बरी होताना त्या हळूहळू पूर्वपदावर येतात. लॅबमध्ये या दोन पेशी एकत्र वाढवणं कठीण होतं, कारण त्यांच्या वाढीसाठी आवश्यक घटक वेगवेगळे असतात. यावर जगभरात झालेल्या संशोधनात अनेक

क्लृप्त्या शोधण्यात आल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून आम्ही या पेशींना एकत्र वाढवलं. सेल कल्चरमध्ये सिरमचा सर्रास वापर होतो, मात्र ते मानवी नसतं. लॅबमध्ये फायब्रोब्लास्ट आणि केरॅटिनासाइट वाढवण्यासाठी लागणारं सिरमचं प्रमाण वेगवेगळं असतं. मग फायब्रोब्लास्ट आणि केरॅटिनासाइटना एकत्र मिळून वाढवण्यासाठी किती सिरम लागेल तो सखोल विचार केला आणि सिरम अगदी कमी प्रमाणात असलं तरी ते एकत्र वाढू शकतात, हे दाखवलं. अर्थात हे मी सांगते आहे, इतक्या थोडक्या वेळात लगेचच नाही झालं. त्यात यशापयशाचा लपंडाव सुरू होता आणि तो कोणत्याही संशोधनात असतोच. हा पेपर बायोटेक्निक्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. आता त्या पेशींवर कृत्रिम पद्धतीने जखम करून अधिक संशोधन करणं सुरू आहे’.

‘फ्रॉण्टइयर्स इन फार्माकॉलॉजी’ या जर्नलमध्ये ‘फ्रॉम ट्रीटीज टु टेस्ट : इव्हॅल्यूएटिंग ट्रॅडिशनल रेमेडीज फॉर अ‍ॅन्टी बायोफिल्म पोटेन्शियल’ प्रसिद्ध झालेल्या या त्यांच्या दुसऱ्या पेपरमध्ये डॉ. अनुराधा बंडगर यांच्या सहकार्याने आयुर्वेदिक घटकांचा जखमेवर होणारा परिणाम अभ्यासला. ज्या जिवाणूंमुळे जखमेत संसर्ग होतो आणि अँटीबायोटिक्समुळे तो बरा होतो त्या अँटीबायोटिक्सला आता ते जिवाणू दाद देईनासे झाले आहेत (अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स). त्यामुळे काही अँटीबायोटिकचा उपयोग होईनासा झाला आहे. दुसरं अँटीबायोटिक्स घेतलं तरी काही काळाने तीच गत होते. यावर संशोधन करायची गरज असल्याचं वारंवार लिहिलं-बोललं जात आहे. मग अँटीबायटिक्सखेरीज काय वापरू शकतो, ते पर्याय शोधले जात आहेत. स्नेहलच्या टीमने चरक आणि सुश्रुत संहितेतील श्लोकांचा आधार घेऊन तुळस, दूर्वा आणि पर्णबीज या तीन वनस्पतींच्या पानांचं वेगवेगळं मिश्रण करून ते तिळाच्या तेलात मिसळून, त्याची चाचणी केली. आयुर्वेदात सांगितल्यानुसार प्रक्रियेत आधुनिक साधनांच्या साहाय्याने अचूकपणा आणला तरी मापात बदल केले नाहीत. जखमांमध्ये सहसा आढळणारे दोन जिवाणू घेतले. ते लॅबमध्ये वाढवले. त्यावर त्या मिश्रणामुळे काय फरक पडतो ते पाहिलं. वेगवेगळ्या मिश्रणांमध्ये त्यांची वाढ कमी झाली. अनेकदा जखम होते तेव्हा विषाणू बायोफिल्ममध्ये असतात. बायोफिल्म्स म्हणजे जिवाणूंचा समूह. समूहातल्या या जिवाणूंभोवती एक प्रकारचं कवच निर्माण होतं. अँटीबायोटिक्स त्या कवचात सहज जात नाही. मग बायोफिल्म्सवर या मिश्रणाचा काय परिणाम होतो ते पाहिलं. त्यांनी तयार केलेलं मिश्रण काही प्रमाणात लागू होत होतं.

यानंतरच्या पुढल्या संशोधनात एखाद्या व्यक्तीला मोठी जखम झाल्यावर त्यात पस होतो. त्याला ‘वुण्ड फ्लुइड’ म्हणतात. ते वुण्ड फ्लुइड लॅबमध्ये कसं तयार करता येईल, याची चाचपणी करायची होती. संशोधनांती वुण्ड फ्लुइडसारखं द्रव्य तयार केलं. मग त्याची बायोफिल्म्सवर चाचणी करून अभ्यास केला आणि हा पेपर अलीकडेच सादर केला आहे. डॉ. करिश्मांसोबत काम करताना तिला खूप शिकायला मिळालं असून करिअरला दिशा मिळाल्याचं स्नेहल आवर्जून सांगते. संशोधनाखेरीज तिला वाचन, गाणी ऐकणं आणि खवय्येगिरीची आवड आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर लॅबमध्ये जाता आलं नाही. मग डॉ. करिश्मा आणि स्नेहलनं विद्यार्थी आणि विज्ञानक्षेत्रातील मंडळींसाठी वेबिनार्स घेतले. त्यात प्रबंध लिखाण, इंटर्नशिपसाठी अर्ज करणं, भारतात परतून स्वत:ची लॅब सुरू करणं आदी विषय चर्चिले गेले. शिवाय लहान मुलांचं वैज्ञानिक कुतूहल शमविणारे ‘टॉक टु अ सायंटिस्ट’ हे इंटरअ‍ॅक्टिव्ह वेबिनार्स आयोजित केले आणि अजूनही करत आहेत. त्यांच्या समाजमाध्यमांवर याविषयी वेळोवेळी सूचित केलं जातं. काही महिन्यांनी या उपक्रमासाठी इंडिया बायोसायन्स आउटरिचची ग्रँट मिळाली. ‘द बेटर इंडिया’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या उपक्रमाची दखल घेण्यात आली. विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळींचं मुलांना नि:शुल्क मार्गदर्शन मिळतं. विज्ञानप्रसार आणि सामाजिक जाणिवेच्या हेतूनं हा उपक्रम आयोजला जातो.

स्नेहल सांगते की, ‘मला बोस्टन, सिंगापूरला जायची संधी मिळाली तेव्हा अनेक गोष्टी शिकता आल्या. आपल्या चौकटीच्या बाहेर पडलं की जीवनानुभवांचं क्षितिज विस्तारतं. जाणिवांच्या कक्षा रुंदावतात हे जाणवल्याने पीएचडी परदेशात करायची हे मनाशी पक्कं होतं. म्हणून संशोधनाचं काम सुरू असतानाच मी यूके, युरोपमधल्या लॅबमधील विषयांचा धांडोळा घ्यायला लागले. मग काही ठिकाणी अर्ज केले. मग यूकेतील ‘हल यॉर्क मेडिकल स्कूल’मध्ये मी पीएचडीसाठी प्रवेश घेतला. त्यांची ऑफर आपला लॉकाडाऊन सुरू झाल्यावर काही महिन्यांतच आली. तेव्हा सगळीच परिस्थिती अस्थिर होती. माझ्या सुपरवाइजर डॉ. अँजेला ओटस् यांच्याशी बोलून माझं जाणं पुढंपुढं ढकललं. शेवटी काही अडअडचणींचा सामना करत जेमतेम दोन महिन्यांपूर्वी यूकेमध्ये आले. आम्हाला अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडता येतं. संशोधनासाठी लॅबमध्ये जाता येतं. पीएचडीचा हा सुरुवातीचा काळ वाचन आणि अभ्यासातच जातो. इथे मी जखमा, अँटिबायटिक्स आणि जखम बरी होणं या प्रक्रियेचा अभ्यास करणार आहे’. अनेकदा वाचता वाचता किंवा प्रयोग करताना नवीन काही सापडतंच, असं विश्वासाने सांगणाऱ्या स्नेहलला संशोधन आणि पुढील कारकीर्दीसाठी अनेक शुभेच्छा.

Story img Loader