गिरीश कर्नाड. माझे पहिले चित्रपट दिग्दर्शक. त्यांनी शूटिंगदरम्यान माझं कॉलेज महिनाभर बुडेल म्हणून आमच्या प्रिन्सिपलना एक पत्र लिहिलं होतं त्याची एक प्रत मी जपून ठेवायला हवी होती.
सोऽऽ नाऽऽ लीऽऽ लवकर खाली ये. गिरीश कर्नाडांचा फोन आहे.! माझ्या विद्याकाकूंनी हाक मारली आणि मी धावत सुटले. ‘हॅलो सोनली? धिस इज गिरीश.. आय अ‍ॅम व्हेरी हॅपी वुईथ युवर स्क्रीनटेस्ट. यू सूट द पार्ट. आय वॉण्ट यू टू प्ले द लीड रोल चेलुवी. तुला आवडेल का?’ इथेच तो फरक आहे. असं किती माणसं विचारतात दुसऱ्याला? तेही चित्रपटसृष्टीतले निर्माता-दिग्दर्शक. मनात पाश्र्वसंगीत वाजत असल्यासारखे थेट अनाऊन्स करतात- मी तुला माझ्या सिनेमात घेतोय! संधी देतोय, लॉन्च करतो- अशी भाषा वापरतात साधारणपणे. आणि तुम्ही…
प्रिय गिरीश अंकल.
आजपर्यंत मी तुम्हाला कितीतरी पत्रं लिहिली. त्या प्रत्येक पत्राला, एसएमएस, ई-मेलला तुम्ही न विसरता उत्तर लिहिलंत. तुमच्यासारखं उच्चशिक्षित ऱ्होडस् स्कॉलर, शिकागो युनिव्हर्सिटीतला प्रोफेसर, किरण देवहंससारख्या भुसावळच्या मुलाला इंग्लिश कच्चं आहे म्हणून प्रवेश नाकारला जात असताना त्याच्या गुणवत्तेसाठी भांडणारा फिल्म इन्स्टिटय़ूटचा प्रमुख, भारताच्या महत्त्वाच्या पाचातला प्रतिभावान नाटककार, सशक्त अभिनेता, गाढा विचारवंत. अशा प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाला एकदा भेटायला मिळालं हीच गोष्ट माझ्यासाठी फार मोठी होती. त्यापुढे तुमच्याबरोबर काम करायला मिळालं- हे माझं भाग्य. आपल्या शूटिंगचे दिवस आणि तुमच्याबरोबर मिळालेला वेळ हे माझं आयुष्यभराचं संचित आहे.
चेलुवीचं शूटिंग म्हणजे माझ्यासाठी सिनेमाची कार्यशाळा होती. केरळमधल्या कूट्टनाडु गावातल्या त्या हॉटेलमध्ये माझ्या आईबाबांना आपुलकीनं भेटायला येणं असो की मला सीन समजावणं. यू हॅव्ह बीन डिग्निटी पर्सोनिफाईड. एकदा सेटवर लंचब्रेकमध्ये छोटी पत्रकार परिषद असणार होती. काही पत्रकार सकाळी दहा-साडेदहालाच येऊन पोचले. मुलाखतीसाठी- बोलूया का विचारायला लागले. आयुष्यात पहिल्यांदाच दोन-तीन बाजूंनी मला क्लिक करणारे फोटोग्राफर, सिनेमाची हिरॉइन म्हणून माझ्याकडे बघणारे पत्रकार पाहून मी खूपच सुखावले. थोडी हुरळलेही होते. मी दोन-तीनदा येऊन तुम्हाला विचारलं की, गिरीश अंकल, ते थांबलेत बिचारे. मी मुलाखत देऊन येऊ? नंतर एकदा हसून तुम्ही मला म्हणालात. आय कॅन अंडरस्टॅण्ड युवर एक्साइटमेंट. पण त्यांना आपण लंचब्रेकची अपॉइण्टमेण्ट दिली आहे. ते थांबतील. कायमच लक्षात ठेव सोनाली. आपण प्रसिद्धीची चिंता करू नये. कामावर लक्ष केंद्रित करावं. यश, प्रसिद्धी आपोआप आपला माग काढत येतात. तुमची ही वाक्यं अक्षरश: माझ्या मनावर कोरली गेली तेव्हा. तुमच्या बोलण्यात आजतागायत कधी अक्कल शिकवण्याचा आव नसतो. जे बोलता ते अगदी सहज. एखाद्या सहकाऱ्याशी संवाद साधावा इतक्या स्निग्धपणे.
शूटिंगला जाताना, डबिंगसाठी मी जेव्हा केव्हा बंगलोरला आले- तेव्हा कधीच तुम्ही माझी हॉटेलात रवानगी केली नाहीत. रघू आणि राधाच्या बरोबरीने मलाही घरात सामावून घेतलंत. दिल्लीला इंटरनॅशनल पॅनोरमामध्ये आपली फिल्म निवडली गेली तेव्हा तुम्ही मला आणि संदेशला अक्षरश: नवीन विश्वाची ओळख करून दिली. हॉटेलच्या खोलीचं दार कसं बंद करायचं, गरम पाणी कुठल्या नळाला येतं इथपासून ते डायनिंग टेबलावरचे एटिकेटस्, काटा चमचा कसा वापरायचा हेसुद्धा सांगितलंत. आजही मी कुठे नाईफ, स्पून, फोर्क वगैरे मांडलेले बघते तेव्हा तुम्ही दिल्लीत ब्रेकफास्ट करताना म्हटलेलं ‘नो सोनाली नेव्हर. यू शुड नेव्हर पुट द नाईफ इन युवर माऊथ’ हे वाक्य आठवतं आणि हसू येतं. पुराना कीलापाशी फिरताना संदेशच्या लेखनाविषयीच्या प्रश्नांना इतकी गंभीरपणे उत्तरं दिलीत. खरं तर आम्ही किती लहान होतो. आम्हाला तुम्ही इतका एक्स्क्लुझिव्ह वेळ द्यायची काय गरज होती. पण सगळ्यांना समान मानण्याची आदब नेहमीच तुमच्यात दिसते. तुम्ही सांगितलेला एक मुद्दा आजही माझ्या लक्षात आहे. तुम्ही म्हणालात, ‘मी माझ्या लेखनावर पुन:पुन्हा संस्कार करतो. रायटिंग इज रीरायटिंग अ‍ॅजवेल. माझ्या लेखणीतून उतरलेलं मी कधीच ब्रह्मवाक्य मानत नाही.’ किती नाटकांचे तुम्ही दाखले दिलेत. इतका मोठा लेखक आपल्या ड्राफ्टविषयी बोलायला कचरत नाही हे विलक्षण आहे.
आपल्या सिनेमामुळे माझं करिअर सुरू तर झालंच, पण घडवलंही. ‘चेलुवी’ पाहून मणीरत्नमनी माझं नाव ‘मे मादम’साठी सुचवलं. मग जब्बार पटेलांनी ‘मुक्ता’साठी माझी निवड केली. ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘चेलुवी’ पाहून सर्जिओस्कॅपॅग्निनी आणि लंबेरतो त्यांच्या इंग्लिश सिनेमासाठी माझा शोध घेत भारतात पोचले. तुम्ही माझ्या सगळ्या प्रवासाची दखल घेतलीत, पण श्रेय कधीच घेतलं नाहीत. पोहायला आलं असं वाटल्यावर यशस्वी भव म्हणत बाजूला झालात. गॉडफादर होण्याचा मोह तुमच्यात यत्किंचितही दिसला नाही.
चेलुवीची गोष्ट आजही मला महत्त्वाची वाटते. कुटुंब, नवरा, सासर यांसाठी फुलणारी, बहरणारी स्त्री, स्वत:चा कस ओळखायला अडखळणारी. त्यागाधिष्ठित प्रेम करणारी. तुटून गेल्यावरच तिला स्वत:ची किंमत जाणवते का? ही लोककथा तुम्ही किती गर्भितार्थासह मांडलीत. त्याची डीव्हीडी रीलीज करूया ना प्लीज. किती जण विचारतात. दूरदर्शनवर कधीकाळी दाखवलेली गेलेली ही हिंदी टेलिफिल्म आजही कित्येकांच्या लक्षात आहे. भारताचा इतिहास, लोकसंस्कृती, पुराण, परंपरा यावर तुमचा किती सखोल अभ्यास आहे. कितीतरी लेखक आता चटकन् जगापर्यंत पोचण्यासाठी इंग्लिशमध्येच जन्मतात. तुम्ही तुमच्या मातृभाषेत- कानडीत लिहायला कधीच कचरला नाहीत. तुम्ही पत्रात मायन्याच्या वर नेहमी ‘बंगळुरु’ असं लिहिता. पुढे अनेकदा स्वत:च्या साहित्यकृतींची भाषांतरंही तुमच्या अस्खलित इंग्रजीत केलीत. माणसं अनुवादाच्या सुपाऱ्या देऊन टाकतात प्रकाशकाकडे. तुम्ही कधीच कंटाळा केला नाहीत. कला नावाच्या ऊर्मीच्या-कलंदर क्षेत्रात असूनही सातत्य, शिस्त आणि सुसूत्रता याच्याशी कटिबद्ध राहिलात.
तुमच्या ‘अग्नि मत्तु मळे’ या नाटकावर आधारित ‘अग्निवर्षां’ या सिनेमात मला नित्तीलाईची भूमिका करायला मिळाली. ही नित्तीलाई माझ्या जगण्याचं ध्येय आहे गिरीश अंकल. इतकं पारदर्शी, उत्साही, आनंदी. चैतन्याचा झराच. स्वत:च्या प्रेमाशी आणि निसर्गाशी, पाईक असणारा. तुम्ही कसं काय असं कॅरेक्टर रेखाटू शकलात. एकदा टाकलेल्या विश्वासावर, आपल्या मनावर संशय न घेणारं माणूस. स्वच्छ आणि निर्मळ. नित्तीलाईशी ओळख झाली आणि माझं जगणंच बदललं.
९ डिसेंबरला तुम्हाला तन्वीर सन्मान प्रदान केला जातोय. डॉ. श्रीराम आणि दीपा लागूंच्या या पुरस्कारामागच्या भावना तुमच्यापेक्षा कोण नीट समजून घेईल. अतिशय उच्चतम कलाकारांचे एकत्र असण्याचे हे क्षण पाहून आम्ही धन्य होणार आहोत. जो निर्भयपणा तुमच्या लेखणीत आहे, तोच सच्चेपणा तुमच्या वाणीत आहे. गेल्या महिन्यात व्ही. एस. नायपॉल यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे मीडियामध्ये जे वादळ उठलं, त्यात तुम्ही ठाम राहिलात. मी असं बोललोच नव्हतो. गैरसमज झाला. असं थातुरमातुर बोलून पांघरूण घालायची धडपड केली नाहीत. तुम्ही नायपॉलांच्या बलस्थानांचा गौरव केलात, न पटलेल्या मुद्दय़ांवर बोट ठेवलंत. तुमचं मत आणि निर्भीडपणा दोन्ही आमच्यापर्यंत पोचलं. हल्ली विविध पुरस्कार सोहळ्यांमुळे जीवन गौरवपर भाषणांना ऊत आला आहे. वयाने ज्येष्ठ कलाकारांना पकडून त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्याच्या औपचारिक, गुळचिट्ट वातावरणात खरं बोलणारी, स्वच्छ मतं मांडणारी माणसं सापडणारच नाहीत की काय, अशा भीतीला तुम्ही छेद दिलात. एक कलावंत दुसऱ्या कलावंताच्या कलाकृतीविषयी बोलला. तोसुद्धा तुमच्यासारखा पराकोटीचा सुसंस्कृत आणि सौजन्यशील कलाकार माणूस. हे धैर्य फार विरळा दिसतं अलीकडे.
वेल. खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, लेखनासाठी. वुई आर प्राऊड ऑफ यू. गेल्या पंधरा-वीस वर्षांतल्या माझ्या आयुष्यातल्या घडामोडी अर्थातच तुम्हाला माहिती आहेत. एकदा फक्त कावेरी कडेवर असताना तुम्ही आम्हाला तिघांना. ‘गुड गुड. हाऊ नाईस. आय अ‍ॅम सो हॅपी. ऑल द बेस्ट’ म्हणावं अशी फार इच्छा आहे. लवकरच भेटू.
तुम्हाला आणि सरसआंटींना खूप प्रेम.
रघू आणि राधालाही.
वॉर्म रीगार्डस.
युवर्स सिन्सिअरली.
-सोनाली

Story img Loader