आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवायचं. सार्वजनिक स्वच्छतेचं कंत्राट मात्र सरकारनं घ्यावं- ही हातझटकी वृत्ती बरोबर आहे का?
अक्षरश: श्वास रोखून मी उभी होते. नाही. नाही काही भीतीदायक असं घडत नव्हतं. पण भयंकर नक्कीच होतं. किती वेळ झाला तरी दारच उघडलं जात नव्हतं. मी एकदोनदा दारावर थाप मारली. अखेर स्वत:च्या तंद्रीत एक तरुणी बाहेर आली. तिने दार उघडल्याबरोबर कुठल्याही सार्वजनिक स्वच्छतागृहातून येतो-तसा दरुगधीचा उग्र भपकारा आला. मी त्या मुलीला म्हटलं, ‘‘फ्लश नाही केलंस का?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘बहोत गंदा है. हात लगाने को भी मन नही करता.’’ हे सर्रासपणे बघायला मिळतं. नाक मुठीत धरून स्वत: बाथरूमला जायचं-आणि पाणी टाकायची तसदी न घेता-आपली लघुशंका उरकून जमेल तेवढय़ा चटकन बाहेर पडायचं. आपल्यानंतर या स्वच्छतागृहात येणाऱ्या भगिनींचा जराही विचार करायचा नाही. फक्त स्वत:च्या गरजेचा विचार करायचा. आणि आपण जातो तेव्हा सगळं स्वच्छ असलं पाहिजे या अपेक्षा ठेवायच्या! (किती टक्के माहिती नाही. पण अनेक. अनेक स्त्रिया असं करतात.
एकीकडे आपण सरकारच्या नावानी ओरडत बसायचं-की महिलांवर नामुष्कीचा प्रसंग आणू नका. ठिकठिकाणी स्वच्छतागृहाच्या सोयी करा. अर्थातच ते अगदी-म्हणजे शंभर टक्के बरोबर आहे. पुरुषांसारखं गर्दीकडे पाठ करून स्त्रियांना लघुशंका उरकता येत नाही. निसर्गानं शरीराची ठेवणच तशी केली आहे. पण त्यामुळे अपराधी का वाटून घ्यायचं? जेंव्हा केंव्हा बाथरूमला लागेल तेंव्हा का घुसमटायचं? मग बाथरूमला लागूच नये म्हणून काहीतरी अघोरी उपाय करायचे. पाणीच प्यायचं नाही, फळंच खायची नाहीत. असे अविचारी अन्याय स्वत:वर करून-शरीरातलं पाण्याचं प्रमाण धोक्याच्या पातळीला आणायचं आणि भविष्यात विविध आजारांना आपणच निमंत्रण देऊन ठेवायचं! त्यापेक्षा बाथरूमला जाणं किती श्रेयस्कर. प्रत्येक प्रशासनानं महिलांसाठी टॉयलेटस् उभी करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे.
शूटिंग नसताना मी जिथे कुठे जाते-जिम, ऑफिसेस, दवाखाने, थिएटर्स, बँका, पेट्रोलपंप, रेस्टॉरंट्स-या सर्व ठिकाणची टॉयलेटस् माझ्या ओळखीची झाली आहेत एव्हाना. शिवाय वाटेतली मित्र-मैत्रिणींची घरं आणि हॉटेलंसुद्धा जिथे मी हक्काने दोन मिनिटं जाऊ शकते. तसेच प्रवासात सार्वजनिक स्वच्छतागृहदेखील आजही वापरते. यात संकोच वाटण्यासारखं काय आहे? आपण इतका वेळ घर सोडून बाहेर असतो. कधी ना कधी बाथरूमला लागणारच. स्त्री असो की, पुरुष. बाथरूम कुठे आहे-असं विचारताना अवघडलेपणा का येतो आपल्या बोलण्यात?
निसर्गनियम आहे. शू करणे हा सान, थोर, मध्यम, प्राणी, पक्षी या सर्वाचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण हक्काची भाषा आली की, हक्काचा गैरवापरही आलाच. तोही माणसांमधे. याचं बोलकं उदाहरण म्हणजे ‘स्त्रीलिंगी’ माणसांची स्वच्छतागृहं. एक तर अनेक ठिकाणी त्याची ‘दशा’ झालेली असते. कडय़ा लागत नाहीत. दारं बंद होत नाहीत. फ्लश चालू नसतात, नळ तुटलेले असतात. बहुसंख्य स्त्रिया बेफिकीरपणे स्वत:चा कार्यक्रम उरकून बाहेर पडतात. आपण पाण्याचा फुटका-वाहता नळ बंद करायचा प्रयत्न करावा किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना तक्रार तरी सांगावी.
पण ना. अनेक वेळेला कर्मचाऱ्यांचाच पत्ता नसतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसून येणारा किळसवाणा प्रकार म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये आंघोळ, वेणी-फणी करणाऱ्या किंवा जोराचा फॅन लावून वामकुक्षी घेणाऱ्या कर्मचारी महिला. चक्क डाराडूर घोरत पडलेल्या असतात किंवा टीप मिळेल या आशेनी साबणाचं पाणी पुढे पुढे करतात. निरीक्षकाची फेरी असेल तेव्हा उगीच धबाधबा पाणी ओतून ठेवून ‘वेट फ्लोअर’च्या पाटय़ा लावतात. एरवी तोंडाची टकळी चालू आणि मुक्काम आरशासमोर! त्यांचं कामाकडे लक्ष नसलं की, प्रवासी महिला हमखास अस्वच्छपणा करून ठेवतात. केसांचे गुंतवळे टाकतात, छोटय़ा मुलांना कुठेतरीच शू-शीला बसवतात. आपण जातो त्या क्युबिकलमधला नळ सुरू नसेल तर दुसरीकडून पाणी घेऊन टाकायचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. आपल्या लघु आणि दीर्घ शंका आटपल्या की संबंध नसल्यासारख्या पसार होतात बाया!
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरच्या दत्तात्रयच्या शेजारची टॉयलेट्स जितकी स्वच्छ- त्याच्या उलट पलीकडच्या फूडमॉलचं- गलिच्छ! कपडे, चपला सावरत कसंबसं चालावं लागतं. पावसाळ्यातले खड्डे, डबकी, चिखल वाचवत चालल्यासारखं. एका अति प्रसिद्ध व्यक्तीला मी नॉनसेन्स, सो डर्टी, ऑफुल इ. शिव्या घालत आत जाताना पाहिलं. पण या बाई चालू असलेला फ्लॅश न दाबताच- नव्या शिव्यांची लाखोली वाहात बाहेर पडल्या. स्वच्छतागृह घाण-बिघडलेलं असणार हे जणू आम्ही स्वीकारलेलं कटू वास्तव आहे. फक्त संयम ठेवून दोन मिनिटं खर्च केली- तर सार्वजनिक स्वच्छता-स्वच्छ राहू शकते. प्लीज. प्लीज. आपण एकमेकींसाठी जरा तरी जाण ठेवू या. पॅडस् इतस्तत: उघडय़ावर टाकणं, खिडकीच्या झडपांमधे किंवा संडासात फेकणं बंद करू या. महिन्यातले हे चार दिवस इतरांसाठी कुचंबणेचे ठरू नयेत यासाठी- पर्समध्ये एक सेफ्टी पॅड (ऐनवेळेला लागू शकेल म्हणून.) आणि जुने पॅड गुंडाळून टाकायला एक वर्तमानपत्र सोबत ठेवू या. सर्व स्वच्छतागृहांमध्ये पर्स ठेवायला जागा किंवा हूक करण्याचा आग्रह धरू या.
पुरुष मित्रांनो, तुमच्या विभागात किती स्वच्छता आणि दक्षता असते माहिती नाही. पण तुम्हाला आमच्या विभागात यावं लागत नाही याबद्दल आनंदच वाटून घ्या.. आता बाथरूमला जायचं आहे- या कल्पनेनीसुद्धा आम्हाला दडपण येतं अनेकदा. दोष आम्हा स्त्रीवर्गाचाच आहे. आम्हीच निर्माण केलेल्या आधुनिक नरकयातना भोगण्यात आम्ही बिझी आहोत सध्या. महिला दिनानिमित्त फेशिअल करून घेणं- आणि तुम्हाला चहा करायला सांगणं हे खूप वरवरचं आणि सोप्पं आहे त्या मानानं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा