जुन्या मराठी सिनेमात, हीरोच्या शर्टाचं बटण लावणे, दोरा दातांनी तोडणे. हे पराकोटीचं रोमॅण्टिक वाटायचं. असे सीनसुद्धा आता हद्दपार होत चालले आहेत नाही.
तीन-चार छोटी छोटी कामं निघाली म्हणून सुई-दोऱ्याचा डबा काढला. एक बटण, दोन टिपा आणि एक काज दुरुस्त करायला अवघी दहा-बारा मिनिटं लागली. खूशच झाले मी. नंतर माझ्याकडे एका मीटिंगसाठी दोन मुली आल्या होत्या. त्यातली एक जाताना तो शिवणाचा डबा पाहून हळवीच झाली एकदम. ती म्हणाली, ‘‘माय मदर युज्ड टू टेक फॉल-बिडिंग ऑर्डर्स. आमच्याकडे सगळ्या रंगांचे दोरे असायचे.’’ दुसरी म्हणाली. ‘‘खरंच? आय हॅव्ह नो कनेक्शन. मला कदाचित सुईत दोरा घालताही येणार नाही. किती टाइमटेकिंग आहे हे. कपडे उसवले किंवा हूक वगैरे तुटलं तर मी सरळ तो ड्रेस वापरातून बाद करते.’’
मला तिचं बोलणं ऐकून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. नवश्रीमंतांचा एक वर्ग झपाटय़ाने उदयाला येत चालला आहे. ते फक्त ‘ब्रॅण्ड’शी नातं सांगतात आणि चोवीस तास एसी वातावरणात राहतात. घर असो, ऑफिस असो किंवा जिम! त्यांना रिळं शोधून शर्टाला बटणं लावण्यासारख्या गोष्टी वेळखाऊ आणि नॉनसेन्सिकल वाटत असतील कदाचित. शिवाय काळाबरोबर कपडय़ाचे पोत, सूतही बदलत चालले आहेत. होजिअरी प्रकारचे टी-शर्ट फाटता फाटत नाहीत ना लायक्रा प्रकारचे.
माझ्या ओळखीतल्या कितीतरी जणी आत्ता आत्तापर्यंत नवा परकर किंवा गाऊन आणला की घरच्या घरी त्याला झरझर टीप मारून घ्यायच्या. कारण उसवण्याची भीती असायची. माझी आई कितीतरी र्वष साडीला स्वत:च फॉल लावायची. आमच्या लीला मामी घरातल्या सगळ्या जणींचे ब्लाऊज बेतून- शिवून द्यायच्या. दुपारची जेवणं झाली. की त्यांचं शिवणाचं मशीन सुरू व्हायचं. मग कुणाकुणाच्या नव्या मागण्या, कुणाची दुरुस्तीची कामं यायची. बाकीच्यांना थांबवत त्या म्हणायच्या, ‘‘तुमचं काम मागनं बघू या. आधी आक्कांचं (सासू) झंपर पूर्ण करू दे मला झंपर हा शब्द कुणाच्या तोंडी ऐकून र्वष लोटली! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर माझं आजोळ. सगळ्या मामे-बहिणी जरा घेर असलेला डिझाइनचा परकर आणि पुढे बटणं असलेला टॉप घालायच्या. कितीतरी सुट्टय़ांमध्ये हौस म्हणून मी त्यांची परकर-पोलकी घालून फिरले आहे. प्रत्येक जण शिवणटिपणात तरबेज. एकेकीचं भरतकाम, विणकाम तोंडात बोट घालायला लावेल इतकं सुबक. कुणाच्या लग्नात रुखवतासाठी इतके सुंदर उशांचे अभ्रे, वॉलपीस करून द्यायच्या. ते करताना सुई-दोरा घेतलेली बोटं, आधाराला दुसरा तळवा देणं, केंद्रित नजर आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. हे आठवलं तर भरूनच येतं एकदम. तसंच माझी नंदा आत्या. दर भाऊबिजेला आम्हा भाच्यांना स्वत: फ्रॉक शिवायची. एकाच ताग्यातले. सगळेजण आम्हाला बॅण्डवाले म्हणून चिडवायचे. पण पैसे टाकून विकत घेण्याऐवजी स्वत: मापं घेऊन फ्रॉक शिवत बसण्याचा प्रेमळ खटाटोप फार मायेनं करायची ती.
आमची आईसुद्धा फार क्रिएटिव्ह! माझ्या भावांच्या मुंजीत आदल्या दिवशी रात्री जागून तिने माझ्यासाठी एक स्पेशल ड्रेस शिवला होता. एका संक्रातीचा चांदण्यांचा काळा फ्रॉक, फक्त तीन फुलांची मॅक्सी- हे माझ्याच नाही, आमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्यासुद्धा लक्षात आहेत. आठवडय़ातनं एकदा ती दुरुस्तीची कामं करायची. काही शिवायचं वगैरे असेल तर मशीनवर ठेवायचं. असा आमच्या घरातला नियम होता. जरा मोठं झाल्यावर तिनं आम्हा भावंडांना मशीन चालवायलाही शिकवलं. आमच्या रीटा मशीनची वादी निखळली तर पुन्हा त्या लोखंडी चाकात बसवून देणे, बॉबीन भरणे, रिळातला दोरा विविध ठिकाणी फिरवून सुईत ओवून देणे- अशी मदत ऊर्फ लुडबुड करायला मला फार फार आवडायचं.
लहानपणी शिवणकाम शिकलं तर फार स्वयंपूर्ण वाटतं माहितीए. कुठे प्रवास असेल, परगावी गेलो, गरज पडली तर अजिबात असहाय वाटत नाही. आपल्या आपण चटकन दोन टाके घालू शकतो- आणि सेफ्टी पिनची नामुष्की टळू शकते. मी एक-दोनदाच बटण तुटलं म्हणून गणवेशाला सेफ्टी पिन लावून गेले होते. पण इतर कुणाचं तसं पिना लावलेलं इतकं बेंगरूळ दिसायचं. त्यामुळे आपण टापटिपीत राहावं असं आतूनच वाटायचं. बटणाच्या भोकातून सुई नीट आरपार घालणं आवडीचं झालं. काही शिवल्यावर उलटय़ा बाजूला चांगल्या शिवणाऱ्याच्या खुणा-नीटस टाक्यांनी बनलेल्या नक्षीत उमटतात. सैल झालेलं काजं घट्टं करणंसुद्धा मजेचं असतं. आईनी जेव्हा हूक अडकवायचं लूप करायला शिकवलं तेव्हा मला आभाळ ठेंगणं झालं होतं.
खूप मजबूत कपडे यायला लागलेत बाजारात. किमतीइतकीच कपडय़ांची क्वालिटीही तगडी असते. वर्षांनुवर्षे कपडे फाटायचं नाव घेत नाहीत. शिवणकामासारखी एक सुंदर कला घरातून बाहेर फेकली जात आहे. शहरांमधून तरी नामशेष होत चालली आहे.
फॉल-पिको आणि शिवणकामाच्या कमाईतून कुणी घरं चालवली असल्याची उदाहरणं अजून आपल्या आठवणीत ताजी आहेत. त्या पाश्र्वभूमीवर घरात सुई-दोरा नसणं, तुटलेलं बटण लावण्यात स्वारस्य नसणं, रिळांचं उच्चाटन करणं. हे मनाला रुखरुख लावत चाललं आहे. खूप आतला, लहानपणातला एखादा टाका उसवल्यासारखं.
सो कुल : रुते कुणाला.. टाका..
जुन्या मराठी सिनेमात, हीरोच्या शर्टाचं बटण लावणे, दोरा दातांनी तोडणे. हे पराकोटीचं रोमॅण्टिक वाटायचं. असे सीनसुद्धा आता हद्दपार होत चालले आहेत नाही. तीन-चार छोटी छोटी कामं निघाली म्हणून सुई-दोऱ्याचा डबा काढला. एक बटण, दोन टिपा आणि एक काज दुरुस्त करायला अवघी दहा-बारा मिनिटं लागली.
आणखी वाचा
First published on: 22-03-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So cool needle and thread