कुठलाच नखरा नाही. समोरच्याला जोखणं नाही. ‘कलाकार’ असण्याचा उसना अभिनिवेश नाही. डावपेच नाहीत. स्पर्धा नाही. जे काही आहे, ते स्वच्छ नितळ आरस्पानी! नजरेत जाज्वल्य ओतप्रोत भरलेलं. स्वत:च्या कलासक्तपणावर ठाम विश्वास. बाकी जगाबद्दल प्रेमळ उत्सुकता आणि अपार आदर. हे सगळं घेऊन एक विलक्षण नदी निघाली आहे. तिला भरगच्च वाहायचं आहे. स्वत:च्या लयीत, कुणालाही न भिववता. ‘न भूतो न भविष्यति’ अशा शीतल प्रवाही ज्योतींनी त्या नदीचं पात्र उजळून निघालं आहे. त्या ज्योतींचा दाह आपल्याला जाणवत नाही. ती नदी आनंदानं तो जाळ लेवून वाहते आहे. आपल्यापर्यंत पोचते, ती एक उंचीवर नेणारी, मनाचं स्खलन करून मऊपणे शांतावणारी, आत्मविश्वास देणारी दिलाशाची फुंकर. पुराचे लोट आणि ज्वाळांच्या लाटा घेऊन वाहणाऱ्या त्या मॅग्निफिसंट, अस्टॉनिशिंगली ब्यूटिफुल आणि धगधगत्या नदीचं नाव आहे- श्रुती सडोलीकर काटकर.
पूर येणार हे माहिती असताना आपण विस्मयचकित होऊन स्तब्ध उभे राहतो कधी कधी. तसा श्रुतीताईंच्या विचारांचा तो भलाथोरला लोंढा मला चिंब करून गेला. मला उभं जाळून गेला. आजची मी जी आहे, तिला नव्यानं जगवून गेला. किती सहजता एखाद्याच्या वागण्यात. किती मार्दव. किती चाणाक्षपणा. आपल्या श्रुतींना रिझवणाऱ्या श्रुतीताईंचं ‘ऐकणं’ पाहून मी थक्क झाले. त्यांचं एकही उत्तर भरकटलं नाही. त्या आपल्याला किती वैविध्यपूर्ण अनुभवांमध्ये घेऊन जातात. परत ताळ्यावर आणतात. हय़ा प्रवासात मी किती जगावेगळी. हा भाव अजिबात नाही. ना-तुम्ही किती सामान्य. हा अहंभाव. जन्म मिळाला आहे, जन्मदत्त देणग्या मिळाल्या आहेत, त्याचा कस लागेपर्यंत स्वत:ला उगाळून सोन्यासारखं झळकायचं- हे वचन आहे स्वत:च्या जगण्याशी.
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या गुरूंचं स्मरण करताना कातर झालेल्या श्रुतीताई दिसल्या. निमित्त होतं- आपल्या विव्हा-लाऊंजचं. श्रुतीताई येणार हे कळल्यावर अक्षरश: माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. ह्य़ापूर्वी कधीच त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नव्हता. पण त्यांच्या आवाजातलं सत्य आणि सौंदर्य सीडींमधून का होईना- कायम सोबत होतं. न भेटताही त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त जिव्हाळा गेली काही र्वष वाटत होता. ह्य़ाला कारण म्हणजे त्यांचा शिष्य नचिकेत- माझा नवरा. संगीत क्षेत्राचा विषय निघाला की एरवीचा बाणेदार नचिकेत एकदम गरीब गाय होणार हे ठरलेलं. फार क्वचित तो श्रुतीताईंचा संदर्भ मिरवतो. पण कधी त्यांचा विषय निघाला, तर त्याच्या स्वरातून एक नम्र ओलावा पाझरताना जाणवतो. त्याच्या गुरूंचं गाणं मला आवडतं- हा आमचं जुळण्याच्या छत्तीसांमधला एक महत्त्वाचा गुण.
आता श्रुतीताईंना भेटल्यावर तर मी हरखून गेले आहे. अशा संपन्न गुरूच्या सान्निध्यात गाणं शिकणं, ऐकायला शिकणं- किती भाग्याचं! त्या किती काय काय सांगत होत्या. गुरूला चांगल्या शिष्याची पारख असते असं म्हणताना- स्वत:च्या गुरूंच्या गोष्टी सांगताना गलबलून गेल्या. स्वत:चे वडील- वामनराव सडोलीकर, गुलुभाई जसदानवाला, अल्लादिया खाँसाहेब ह्य़ांच्या शिकवणीबद्दल किती आत्मीयतेनं बोलल्या. श्रुतीताईंची जडणघडण, विचार, मांडणी- हे सगळं मंत्रमुग्ध करणारं होतं. त्या फार चांगल्या पद्धतीनं स्वत:चा अभ्यास/विचार व्यक्त करू शकतात. पण त्यात सभा जिंकण्याची खुमखुमी नाही. स्वत:ला आलेला प्रत्यय सांगण्याचा प्रांजळपणा आहे. कुठेही भाषण देण्याचा आव नाही. कुठल्याच प्रश्नाला त्यांनी कमी लेखलं नाही. प्रत्येक मुद्दा स्फटिकासारखा स्वच्छ. तळपता. ह्य़ाला कारण घटना आणि माणसं असली. तरी कलेला त्या योगायोग मानत नाहीत. त्यांच्या आईनी मनावर बिंबवल्याप्रमाणे सुशिक्षित, मेहनत घेणारा कलाकार असणं त्यांनी आत्मसात केलंय.
इतर कितीतरी श्रेष्ठ गायकांची नावं निघाली. प्रत्येकाकडे त्या ज्ञानकोश म्हणून पाहतात. बेगम अख्तरजींनी घरी गायलेल्या गाण्याला प्रसाद म्हणतात. स्वत:ची कर्मभूमी, कम्फर्ट झोन सोडून आता त्या लखनौला भातखंडे म्युझिक इन्स्टिटय़ूटचं काम पाहतात. त्यात दिलेला शब्द पाळण्याची कास आहे. चांगलं, प्रामाणिक काम करण्याची निष्ठा आहे. श्रुतीताईंना भेटल्यापासून माझ्या अंगात शक्ती संचारल्यासारखं झालं आहे. खरंच एक नितांतसुंदर, लोकाभिमुख, इन्टेन्स, तरीही अंतर्मुख, खोल, दुथडी भरून वाहणारी, श्रुती नावाची आश्वासक नदी आहे ही. त्यांचा जन्म कुरुंदवाडचा आहे. मला तर डोळ्यांसमोर नरसोबाच्या वाडीत दत्ताच्या देवळाच्या पायऱ्यांशी वाहणारी कृष्णा नदीच दिसते आहे. तिच्या पात्रात स्वत:ला झोकून देण्याचा मोह कसा आवरायचा.
http://www.youtube.com/LoksattaLive वर तुम्ही हा लाऊंज जरूर पाहा. तरच मी जे तोडक्या-मोडक्या शब्दांत सांगायचा प्रयत्न करते आहे, ते तुम्हाला समजेल. अर्थात सीडी/रेकॉर्डिगच्या स्वरूपात ते काळजाला हात घालणारं, स्वर/व्यंजन/व्याकरणाच्या पलीकडचं, आईच्या पोटात असल्यापासून चालू असलेल्या संगीत साधनेला- तीव्र सचोटीनं पेश करणारं आनंदाचं गाणं- कायमच आपल्यासोबत आहे. श्रुतीताई, तुम्ही नक्की लिहा. तुमचं संचित फार मौल्यवान आहे. तुमचे अनुभव, माणसं, काळ ह्य़ाचं आम्हाला दर्शन तरी होईल. न्यायप्रिय, कलाप्रिय, भावनाप्रधान जगण्यासाठी उमेद येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा