‘‘एक मिनीट सोनाली. तुझी ओळख करून देतो. ही माझी गर्लफ्रेंड. न्यूयॉर्कला असते.’’
‘‘हॅलो. नाव काय तुझं?’’ मी विचारलं.
त्यावर ती सुंदरा जे उत्तरली, ते ऐकण्यासारखं आहे-
‘‘अ‍ॅक्चुअली माझं नाव मीनाक्षी आहे. पण घरी सगळे मला प्रियांका बोलतात (बोलतात?!) आणि फ्रेंडस्मध्ये मी मॅक्सी म्हणून नोन आहे. (नोन! के.एन.ओ.डब्ल्यू.एन.!) आणि हा (म्हणजे बॉयफ्रेंड) मला मुमू म्हणतो..’’ वर ती लाजून मुरकत हसायला लागली. मी चकित होऊन पाहत राहिले. शेकहॅण्डसाठी पुढे झालेला हात स्टॅच्यू घातल्यासारखा अधांतरी तिच्या हातात झुलत राहिला. मीनाक्षी, प्रियांका, मॅक्सी आणि मुमू असलेल्या त्या मुलीला मी सभ्यतापूर्वक खेळकरपणे म्हटलं. ‘‘बाप रे. इतकी नावं? मग मी काय म्हणू तुला? त्यावर गळ्यातले केस घोळवत ती कन्यका वदली. विल यू कॉल मी नक्श? कारण बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतल्यावर मी माझं नाव ‘नक्ष’ लावणार आहे.’’ मला शेक्सपीअरच आठवला- नावात काय आहे- म्हणणारा. अगदी गेल्याच आठवडय़ात एक मैत्रीण त्वेषानी नवीन शिकलेला एक फंडा सांगत होती- म्हणे प्रत्येक माणसाला आपापल्या नावाचा अंश मिळतो. जेव्हा काही माणसं म्हणतात ना, की खरं म्हणजे माझ्या आईला माझं नाव अमुक ठेवायचं होतं. पण राहिलंच. अशा व्यक्तिमत्त्वामध्ये अपूर्णता असते म्हणे. कारण अधुरी इच्छा त्यांच्या ओळखीला- म्हणजे नावालाच चिकटून येते.
मधे एकदा आमच्या एका जवळच्या मित्रानी आम्हाला सगळ्यांना फार गंभीरपणे विनंती केली- की मला माझ्या खऱ्या नावानी ओळखा प्लीज! शाळेत असल्यापासून त्याचं एक नाव पडलं होतं. तो त्याच नावानी ओळखला जायचा. इतकं की फोनच्या डायरीत किंवा मोबाइलमधेही टोपणनावानीच त्याचा नंबर सेव्ह केला गेला होता. पंधरा वर्षांच्या ओळखीनंतर आणि घरगुती मैत्रीनंतर आता मला मूळ नावानी संबोधा. हा आग्रह आमच्या पचनी पडायला वेळ लागला. शिवाय तो आग्रह आम्हाला आमच्या आईवडिलांपर्यंत पोचवावा लागला. बऱ्यापैकी कसरत करून सवय बदलावी लागली. अगं तो ‘..’ येऊन गेला असा निरोप सांगताना आईबाबा टोपणनावच घ्यायचे. मग जरा वर्ष-दीड वर्षांनी अंगवळणी पडलं त्याचं खरं नाव. तसंच माझ्या मोठय़ा भावाचंही झालं होतं चुकून. संदीपला मी पहिल्यापासून दादा म्हणते. त्याची ओळखही मी- हा माझा दादा अशी करून द्यायचे. पहाता पहाता माझे मित्रमैत्रिणी, काही सहकलाकार, दिग्दर्शक. सगळेच त्याला ‘दादा’ म्हणायला लागले. तेव्हा त्यांना आणि स्वत:लाही आठवण करून द्यावी लागली- की त्याचं खरं नाव ‘संदीप’ हे बाजूला पडून ‘दादा’ हेच नाव रुळायला लागलंय. नंतर मग मी लक्षात ठेवून ‘माझा मोठा भाऊ- संदीप’ असं सांगायला लागले.
पण टोपणनावं किती मजेदार वाटतात ना. मधे एका फाइट सिक्वेन्सच्या शूटला एक धिप्पाड स्टंटमॅन आला. त्याला कुणीतरी हाक मारली- ए बबलू.! समोरच्या दहा माणसांना एका मिनिटात चीत करेल अशा माणसाचं नाव बबलू? तसाच आमचा एक प्रॉडक्शन मॅनेजर- चिंटू म्हणे!  त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही म्हणजे काही चिंटूपणा नव्हता. इतका तो दणकटु होता. बंगाली टोपणनावं हा त्यांच्या संस्कृतीतला अविभाज्य घटक म्हणायला पाहिजेत. खरी नावं इतकी सुंदर, विशेषणांसारखी अलंकारिक असताना  मजेदार टोपणनावं का ठेवावीशी वाटतात कोण जाणे. इंद्रनील, स्वप्नदत्त , शर्बाणी, ऋतुपर्णा अशा नावाच्या माणसांना घरी कोको, शोना, बुबुन मोनु, छुमकी, पोल्टु, बाप्पा, मोंटु, बिश्तु असं काहीही म्हणू शकतात. मुळात बंगाली भाषा इतकी सुमधुर. त्यात आपल्या मावशी, काका वगैरे नातेवाईकांना अशा गोड गुणिले मजेदार उपनावांनी बोलवणं अजूनही मिष्टी वाटतं नाही.
आपल्याकडे त्यामानानी शिस्तशीर एकनावीच कारभार असतो. फारतर नाना, भाऊ, माई, ताई. इतकंच. माझ्या आईच्या आईला मी आक्का आज्जीच म्हणत आले. ती नुसती आज्जी नाही आणि तिच्या औपचारिक नावाची जानकी आज्जी पण नाही. लोण्यासारखी मऊ मऊ आक्का आज्जीच. ही नावं पडत जातात. कुणीतरी तशी हाक मारत असल्यामुळे. आता माझ्या मोठय़ा मावशीला तिची स्वत:ची मुलंसुद्धा ताई म्हणतात. आणि आम्ही अर्थातच ताईमावशी. बाबा, काका, आत्त्या त्यांच्या वडिलांना आण्णा म्हणायचे. त्यामुळे आम्ही नातवंडं पण आण्णाच. आपल्या प्रत्येक कुटुंबात, कुठल्या तरी पिढीत एक बेबीमावशी किंवा बेबीआत्या असायचीच नाही? आता प्रत्येक जोडप्याला एखादंच मूल. फारतर दुसरं. त्यामुळे चिल्ल्यापिल्ल्यांचा पसारा, चुलत-मामे-आत्ते बच्चेकंपनी एकत्र झाली तर दोन-चार डझन सहज भरायची. त्यात कुणीतरी नाना, भाऊ, माई असायचेच. आता ही संबोधनंच लोप पावत चालली आहेत. भावंडंच कमी- मग आक्का/ ताई/ दादा म्हणणार कुणाला…

Story img Loader