आमचा विनूमामा कसा जेवतो- हा आमच्या भाचे मंडळींमध्ये किस्सा आणि नकलेचा विषय असायचा. तो आजही ताट चाटून पुसून स्वच्छ करतो. वाढलेलं सगळं खातो. ताटात एक शीतही दिसत नाही उरलेलं. अक्षरश: घासून ठेवल्यासारखं दिसतं ताट. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही कृतज्ञता दिसून येते त्याची.
आत्ता आत्तापर्यंत असं असायचं की परदेशातून आलेली माणसं आपल्या देशातलं पाणी प्यायला कचरायची. त्यांच्या हातात मिनरल पाण्याच्या बाटल्या दिसायच्या. पण आता आपणही सगळे अनिवासी भारतीय होत चाललो आहोत बहुतेक. आपण ज्या मातीत राहतो तिला अशुद्ध मानणारे. सर्रास सगळेजण पाणी विकत घेतात. मोठमोठय़ा हॉटेलमध्ये ‘पाणी साधं की बॉटल्ड?’ असं विचारतात. मी आग्रहानी साधं पाणी मागते. पंचतारांकित हॉटेलात पाण्यासाठी फिल्टर तर नक्कीच लावला असला पाहिजे. पण ‘फॉर द सेफ्टी सेक’ असं म्हणत प्रत्येक वेळी विश्वास टाकायला का घाबरयचं? मी आजतागायत खोपोलीच्या दत्त स्नॅक्समध्ये भरून ठेवलेलं स्टीलच्या पेल्यातलं पाणी पीत आले आहे. कध्धी काही बाधलं नाही त्यामुळे. जितके चविष्ट त्यांचे पदार्थ. तितकेच स्वच्छ पाणी. पण नाही! अति दक्षता किंवा निव्वळ आळस ह्य़ामुळे माणसं पाणी विकत घेतात आणि वाया घालवतात. सिनेमाला गेल्यावर थिएटरमधे नाही का. पॉपकॉर्न आणि सामोश्यांच्या राशीबरोबर उंचाडी, ढब्बी पाण्याची बाटली पण स्थानापन्न झालेली असते.
घरी काम करणाऱ्या बायका स्वैंपाक झाल्यावर भांडी घासायला टाकतात. उरलेलं पीठ कशात तरी काढून परात घासायला टाकावी की नाही. मध्ये एका बाईंना मी दाखवलं- एक फुलका होईल एवढी कोरडी कणीक चिकटली होती. लाटणं-पोलपाट आणि परात मिळून. वरचं काम करणारा एक मुलगा जेवून झाल्यावर उरलेलं अन्न छोटय़ा वाटय़ांमध्ये काढताना इतका निष्काळजीपणा करायचा. पिठलं, आमटी कायम लागलेलं असायचं केवढं तरी. घासायला टाकलेल्या भांडय़ांना, भाताची शीतं तर- अरे बापरे! आपल्याच घरात आपण नसताना इतकं काही वाया जातंय त्याबद्दल इतकं अपराधी वाटायचं. सांगायला गेलं की ऐकल्यासारखं करायचे. पण पुन्हा पालथ्या घडय़ावर पाणी. वर इतरांशी चहाडय़ा- ही किती कटकटी आहे म्हणून.
अन्न वाया घालवू नका असा आग्रह धरणं ही खरंच कटकट आहे का? हॉटेलमध्ये आपण स्वेच्छेने जेवायला जातो. प्रत्येक हॉटेलमध्ये पदार्थाचा पोर्शन वेगळा असतो. एखाद वेळी एका हॉटेलमध्ये भाजी नीट बेताच्या सवर्ि्हग बाऊलमध्ये येते- तर काही हॉटेलमध्ये तसराळासारख्या विचित्र भांडय़ांमध्ये डचमळत काहीतरी घेऊन येतात. ते प्रमाण काही आपल्या हातात नसतं. पण ऑर्डर देताना किमान आपण विचारू तरी शकतो. ‘‘की चार माणसांसाठी तुमच्या हॉटेलात आम्ही दोन भात मागवू की तीन?’’ दुसरा अडचणीचा मुद्दा म्हणजे- हॉटेलात जेवून झाल्यावर काही पदार्थ उरले- तर काय करायचं! मी बहुतेक वेळी उरलेलं सगळं पॅक करून घेते. त्याबद्दल काहीजणांचे नेत्रकटाक्ष सहन करावे लागतात. नंतर कॉमेंटस् कानावर येतात. ‘‘काय हे. हावरटासारखं उरलेली प्रत्येक गोष्ट घरी काय नेते ही नेहमी?’’ पण सगळ्याच हॉटेलांमध्ये उरलेल्या पदार्थाची ‘विल्हेवाट’ योग्य पद्धतीनी लावत नाहीत. काही ठिकाणी खरंच ‘वेस्ट फूड व्हॅन’ येतात आणि गरजूंपर्यंत अन्न पोचवतातही. पण बाकी निम्नस्तरातल्या हॉटेलांमध्ये चक्क फेकून देतात. कारण वेटर आणि स्वच्छता कर्मचारी रोजच्या रोज का म्हणून उरलेलं खातील? शिवाय त्यातलं उरलेलं आणि उष्ट- ह्य़ातला फरक कुणाला माहिती? घरी घेऊन आलो तर दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो आपण. पैशाची आणि अन्नाची नासाडी, मानहानी टाळू शकतो.
हल्ली डाएटिंगची अनेक दुकानं निघाली आहेत. काही ठिकाणी ठळक अक्षरात लिहिलेलं असतं- ‘‘की तुमचं पोट म्हणजे डस्टबीन नाही. पदार्थ संपवायचे म्हणून पोटात ढकलू नका. फ्रीजमधलं शिळं अन्न वारंवार खाल्ल्यानी शरीराला अपाय होतो.’’ तत्त्वत: हे अगदी बरोबर आहे. पण एका पुस्तकात पुढे लिहिलं होतं- ‘जास्त झालेले पदार्थ एक वेळ कचऱ्याच्या डब्यात फेका पण ते खाऊन जाड होणं टाळा.’ ह्य़ा कचऱ्यात टाकण्याला माझा जोरदार आक्षेप आहे. रोजच्या स्वैंपाकाचा अंदाज नसावा का माणसाला? अवाच्या सव्वा उरेल इतकं शिजवायचंच कशाला? मला काही कुटुंबं माहिती आहेत- जी सर्रास उरलेले किंवा शिळे पदार्थ कचऱ्यात टाकतात. त्यांची आलिशान घरं, सेवाभावी वृत्ती हे सगळं त्यांच्या फेकेगिरीसमोर फिकं पडतं. काही जणांना आग्रह करायला खूप आवडतं. त्यासाठी काही कमी पडू नये म्हणून गरजेपेक्षा दुप्पट तिप्पट शिजवून ठेवतात सगळं. पाहुणे परत गेले की समाधानानी उद्गारतात ‘वाह.! काही कमी पडलं नाही बरं का.’ एकदा मी एकांच्याकडे राहायला गेले होते. रात्रीच्या जेवणात दोन भाज्या, दोन गोड पदार्थ, पोळ्या, पुऱ्या, साधा भात, पुलाव, ग्रीन सलाड, पायनॅपल रायता (बापरेॅ), कोफ्ता करी, पापड, भजी. मेन्यू ठरवताना अंदाज नावाची गोष्ट ह्य़ांच्या डोक्यातच आली नसावी की काय असं वाटलं. रात्री उरलेले पदार्थ पाहून मला घेरीच आली. पुढच्या दोन जेवणांना पुरेल एवढे उरलेले दिसले सगळे पदार्थ. पण दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाला वेगळंच वाढलेलं दिसलं. मी जरा भीड चेपत विचारलं- ‘‘ग्रीन सलाड आणि कालची कोफ्ता करी संपवू या का? छान झाली होती.’’ त्यावर यजमानीणबाई म्हणाल्या, ‘‘छे छे. आम्ही नाही शिळं खात कधी.’’ माझा श्वास अध्र्यावरच अडकला. कारण त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सकाळीच टाकलं सगळं कचऱ्यात.’’
घरी बनवलेले पदार्थ कचऱ्यात टाकायला हात धजतात तरी कसे? आपणच असं करत राहिलो तर हाताखालच्या माणसांना कितपत पर्वा राहील? उरलेलं अन्न डस्टबीनमध्ये फेकणं हे आधुनिक काळातलं पाप वाटतं मला.
सो कुल : ..पूर्णब्रह्म?!
आमचा विनूमामा कसा जेवतो- हा आमच्या भाचे मंडळींमध्ये किस्सा आणि नकलेचा विषय असायचा. तो आजही ताट चाटून पुसून स्वच्छ करतो. वाढलेलं सगळं खातो. ताटात एक शीतही दिसत नाही उरलेलं. अक्षरश: घासून ठेवल्यासारखं दिसतं ताट. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही कृतज्ञता दिसून येते त्याची.
आणखी वाचा
First published on: 21-12-2012 at 12:47 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So coolfood