होना. अगबाई. छे छे. तसलाच आहे तो. बापरे. या उद्गारांपुरती घटना सीमित राहते. तिचा पुढे जाऊन किस्सा बनतो. विरून जातो. काही स्वभावविशेष नुसती सवय नाही तर विकृती होऊन बसतात. याला आळा घातलाच पाहिजे.
आता तो साधारण सत्तर वर्षांचा आहे. कधी कुठे भेटला तर हसून ओळख देतो. सभ्यपणे बोलतो. लग्नकार्यात सफाईदारपणे सोशल कॉन्व्हरसेशन करतो. एखाद् दुसरा विनोद टाकून समोरच्याला हसवितो. या वयातही टी-शर्ट- स्पोर्ट शूज घालतो, गाडी चालवितो. घरगुती गोष्टी दुरुस्त करून घेतो. टी. व्ही. बघतो. जेवण नीट आहे. कुठे कुठे प्रवासाला जातो. तब्येत राखून आहे. अवास्तव मागण्या नाहीत, उधळपट्टी करीत नाही. तसं बघायला गेलं तर सगळं चांगलंच वाटतं ना ऐकायला? मग मी त्याचा एकेरीत उल्लेख का करते आहे? सांगते. या सगळ्या चांगुलपणावर बोळा फिरविणारी एक विलक्षण सवय आहे त्याला. तो लहान मुलींची छेड काढतो.
लहान म्हणजे बारा-तेरा वर्षांच्या आतल्या शाळकरी मुली. आजूबाजूला कुणी नसताना तो त्या मुलींच्या अवयवांना स्पर्श करतो. जिन्सची चेन दाखवायला सांगतो. मुलींना जवळ खेचून त्यांना दाबतो, कुरवाळतो, चुंबन घेतो. हे सगळं चालू वर्तमानकाळात म्हणताना मला प्रचंड राग येतोय. घुसमटल्यासारखं होतंय. गेली कितीतरी र्वष त्याची ही थेरं चालू आहेत. नातेवाईक, शेजारी, कामावर येणाऱ्या महिलांच्या मुली.. कितीतरीजणी त्याच्या तावडीत सापडल्या आहेत आजवर. माझ्या माहितीतल्या अनेक मुलींच्या मनावर त्यांनी ओरखडा उमटवलाय. या ७० वर्षांच्या पव्‍‌र्हर्ट इसमाने चोंबाळलेल्या चिमुकल्या मुली डोळ्यासमोर येतात. शाळा. गृहपाठ. खेळ. अशा निरागस विश्वात असणाऱ्या मुलींना हा अकाली प्रौढ करून ठेवतो. भिववतो. त्या त्या प्रसंगी त्या मुलींना किती अनाकलनीय, जीवघेणी भीती वाटली असेल.
त्या मुलींप्रमाणेच त्यांचे कोंडमारा झालेले पालक. माझी एक मैत्रीण आहे. ती मला तिच्या मुलीवर ओढवलेला प्रसंग सांगत होती. याच माणसानी तिच्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर अश्लील चाळे केले म्हणे. काय काय केलं याचा पुनरुच्चार करण्याचं धाडस माझ्या अंगात नाही. वर त्यानं तिचं तोंड दाबलं आणि कुणाला काही सांगायचं नाही, अशी धमकी दिली. त्या दिवसापासून ती छोटी बदलूनच गेली आहे. भेदरलेल्या सशासारखी झाली आहे. गप्प गप्प झाली आहे. सांगताना असहाय्य वाटून घेत माझी मैत्रीण ढसाढसा रडायला लागली. आपण काहीच करू शकलो नाही याबद्दलचा आकांत आणि उद्वेग होता तिच्या अश्रूंमध्ये. जरा वेळालं ती मला म्हणाली. असो. परमेश्वर बघून घेईल. आपण काय करू शकतो? माफ करायचं आणि पुढे जायचं.
मी तिला प्रश्न विचारले, पर्याय सुचवले.. पण यातना भोगणारी व्यक्ती / कुटुंब- आणि सल्ले देणारे हितचिंतक यांच्यामध्ये आपापल्या व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांची दरी उभी राहते कधी कधी. मला खरंच वैतागानीू असं वाटतं. की भारतीय संस्कृती ‘माफ करण्याला’ फार ग्लोरिफाय करते. माफ करणं हे एव्हरेस्टसारखं अंतिम टोक झालं. तिथपर्यंत पोचण्याच्या पायऱ्या आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला आलेला राग, संताप, हतबलता, सूड. या भावनांची दखल तरी घ्यायला पाहिजे. कारण आपण माणूस आहोत. अशा भावना वाटून तरी जाणारच ना. त्यांचा निचरा नको होऊ द्यायला? एकीकडे बेशरम गुन्हेगार आणि दुसरीकडे क्षमा करायला तत्पर असे संतसज्जन! हा असमतोल नाही का? गुन्हा करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे. स्पष्टपणे आपला असंतोष व्यक्त केला पाहिजे. कारणमीमांसा केली पाहिजे. इतर कुटुंबीयांना सावध केलं पाहिजे. संबंध तोडणे, तावातावानी आरडाओरडा करणे याने तात्कालिक तरंग उठेल आणि विरूनही जाईल.
त्या माणसाचे कुटुंबीय नामानिराळे असल्यासारखे वागतात. दुर्घटनेवर तत्परतेनी पांघरूण घालणे ही आपली जबाबदारी असल्यासारखे वागतात. यामुळे साध्य काहीच होत नाही. गुन्हे थांबत नाहीत, धोका टळत नाही आणि गुन्हेगाराला ना समज मिळते ना अनुशासन. शिक्षा देणं आपल्या हातात नसलं तरी आपल्या पोरी-बाळींना अशा धोकासत्रापासून फार दक्षपणे सांभाळलं पाहिजे. मुख्य म्हणजे अशी विकृती असलेला माणूस नुसता ‘घाणेरडा’ नसून ‘गुन्हेगार’ आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे कुणाला सांगायचं नाही. असं लहान मुलांना दटावण्यातच आपली शक्ती खर्च होते. त्यापेक्षा अशा घाणीचा बुरखा फाडण्याची धमक दाखवलीच पाहिजे. फारतर मानहानी आणि संतप्त आरोप-प्रत्यारोप होतील पण वाचा फोडली पाहिजे. अशा बाबी कायम खासगीत कुजबुजत्या स्वरात बोलल्या जातात. जनलज्जा, कुटुंबाची इज्जत यापेक्षा एका चिमुकल्या जिवाचं मन फार फार मोलाचं आहे. ते जपलं पाहिजे. तुमची विकृती आम्हाला त्रासदायक होत असेल तर फक्त बोटं मोडून, मनातल्या मनात शिव्याशाप देण्यापलीकडे, खोलवर बदल घडवून आणणारी सकारात्मक कृती केली पाहिजे.
लहान मुलांवर प्रेम करणाऱ्या चाचा नेहरूंचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. प्रत्येक बालकाचा प्रत्येक दिवस आनंदी, स्वच्छंद असावा यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो जन्मसिद्ध हक्क आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा