एक लहानशी गोष्ट- आपला मूड बदलू शकते. मत ठरवू शकते. दृष्टिकोन  चढवू शकते..
कधी नव्हे ते दुपारचा वेळ मोकळा मिळाला. आधी दोन दिवस जरा जागरण झालं होतं. आता काही काम नाही तर जरा पाठ  टेकावी म्हणून आडवी झाले आणि साधारण चार मिनिटांत टणाटणा बेल वाजली. खूप संताप आला, पण कुणीतरी बघेल असं म्हणत मी गच्च डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करत होते. पण तेवढय़ात कळलं, कुरिअरवाला मलाच बोलवायला सांगत होता. झोपेचा त्याग करत मी अनिच्छेनी उठले. म्हटलं असेल काहीतरी बँकेचं किंवा इनकमटॅक्सचं वगैरे पत्र. किंवा कुरिअरवाला नवा असेल. मी दारापाशी गेले तर खरंच एक नवा कुरिअरवाला दिसला. छान हसत मला म्हणाला, काय झोपला होतात वाटतं. म्हटलं सहज घरी असलात तर बघावं तुम्हाला. त्याला नीट ‘बघून घ्यावं’ असं आलं माझ्या मनात. पण आता कुठे वाद घालत बसायचं म्हणून मी गुपचूप सह्य़ा केल्या, फोन नंबर लिहिला. ते करेपर्यंत  झोप गेलीच. चला आता कुरिअर उघडून बघू म्हणून उत्सुकता चाळवली गेली.  लगेच दुसरा विचार आला की जाऊ दे ना. अध्र्या तासानी बघू- जरा पडावं ठरल्याप्रमाणे. पण पुन्हा अधीरपणानी उचल खाल्ली आणि मी कुरिअरचं पाकीट उलटंपालटं करत उघडण्याकडे वळले. नाव काही ओळखीचं वाटेना.
पण पाकिटावरचं अक्षर फार मोत्यासारखं होतं. प्रत्येक गोष्ट मराठीत लिहिली होती. म्हणजे रोड नाही-रस्ता. वेस्ट नाही-पश्चिम. अगदी पिनकोडचे आकडे पण डौलदारपणे मराठीतच लिहिले होते. मी पाकीट उघडायला गेले मात्र.! कुठून सुरुवात करावी तेच कळेना. त्या पाकिटावर आडव्या, उभ्या जाळीदार पद्धतीनी पट्टय़ाच पट्टय़ा मारल्या होत्या. त्या जाड तपकिरी रंगाच्या चिकटपट्टय़ा. बरं पाकीट कापता येईना. कारण आत फुलस्केपच्या आकाराचे कागद असल्यासारखे वाटले. मासिक वगैरे असेल तर हाताला जाणवतं. पण ह्य़ा कागदांमधला एखादा चुकून फाटला तर? ते पाकीट कुठून आणि कसं उघडावं अशी पंचाईत होऊन बसली माझी! अखेर थर्माकोल कटर घेऊन पंधरा मिनिटं मी त्या पाकिटावर (शाळेत शिकलेल्या) हस्तकलेचा आविष्कार केला. हलकेच त्या चिकटपट्टय़ा वरचेवर कापून काढल्या. एके ठिकाणी खिंडार पाडता आलं. मग तिथून कटरचा शिरकाव करून पाकीट- फाड मोहीम फत्ते केली. त्यातून काय निघावं? एका होतकरू महिलेनी लिहिलेल्या कवितांच्या पुस्तकाचं प्रूफ. ती पन्नास एक कागदांची चळत  एका मनाविरुद्ध लग्न झालेल्या स्त्रीच्या खदखदत्या भावनांचा उद्रेक व्यक्त करत होती. ‘अर्पण पत्रिका’ नाव असलेल्या पानावर मदर इंडियारूपी आईवर एक लघुनिबंध होता. त्यात चुकून वडिलांचा खरपूस शब्दात उद्धार झाला होता. पाकिटावर माझं नाव असलं तरी आत माझ्या नावानी पत्रबित्र काही नव्हतं- होती फक्त काव्य कारंजी! हेच वाचायला मी इतकी मेहनत घेऊन ते पाकीट उघडत बसले का. तिच्या कारंज्यासमोर मला माझ्या वैतागाचा ज्वालामुखी उद्रेकावासा वाटायला लागला. म्हणून फिल्मी पद्धतीनं मी ते पाकीट फाडायला गेले. पण ‘वुण्डेड सोल्जर’सारखं दिसणारं ते पाकीट महाचिवट होतं. एकदाही मी मनाच्या समाधानासाठी टर्र्र आवाज करू शकले नाही. थँक्स टू कवयित्रीसाहिबांचं पॅकिंग!
पण खरंच मला अशा न उघडता येणाऱ्या पाकिटाचं एक्झिबिशन काढावंसं वाटतं. मोबाईलच्या बिलाचं पाकीट! त्या बिलाचं पाकीट चिकटल्यावर एक-दोन पिना कशाला मारून ठेवतात कोण जाणे! बिल न फाडता आपण पाकीट उघडायचं म्हणजे एक कसोटीच असते. एकतर तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत मला त्या पिना कशा काढायच्या हेच माहीत नव्हतं. मी नेहमी नख दुखवून घ्यायचे. पातळ चमचा घेऊन यायचे (कधी कधी सुरीसुद्धा!) नंतर अचानक कधीतरी खुल जा सिमसिम असं म्हणत मला युक्ती कळली- की स्टेपलरच्या मागच्या टोकानी पिना उचकटता येतात. ते कळलं असलं तरी पाकिटावर इतरांनी मारलेल्या पिना काढणं हे अजिबात आनंदाचं काम नाही.
फोटो हमखास चुकीच्या पाकिटामध्ये चुकीच्या टेप लावून पाठवतात. ती आतून दोरे असलेली पाकिटं पाठवणाऱ्याला फार सुरक्षित वाटतात पण ज्याला उघडावी लागतात-त्याची व्यथा तोच जाणे. सगळ्यात मोठ्ठी धारदार कात्री घेऊन बसावं लागतं. आतले धागे स्वत:च्या मर्जीनी तटातटा तुटतात किंवा अभेद्य राहतात. कधी कधी मला मी अफझलखानाच्या पोटात वाघनखं घुसवणारे शिवाजीमहाराज असल्यासारखी वाटते. पण  आतली पत्रं किंवा कागदपत्र कधीच कोथळ्यासारखी यशस्वीपणे बाहेर येत नाहीत. काहीजण सीडी किंवा डीव्हीडी त्या बुडबुडय़ाच्या प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून पाठवतात. ते खूप योग्य आहे, पण काहीजण अतिहुषार बनून त्या प्लॅस्टिकला पण टेप चिकटवतात. वर जराही माया न सोडता अगदी कट टू कट पॅक करतात. झालं! बसा खेळखंडोबा करत! बँकेकडून पिन नंबर वगैरेंचा पत्रव्यवहार जो होतो, त्यात आतला कागद जराही न फाडता पाकीट उघडणाऱ्याला मी जाहीर बक्षीस द्यायला तयार आहे. अरे अतिमहत्त्वाचं किंवा गोपनीय पत्र खुद्द ज्या व्यक्तीचं आहे तिलाही वाचायला मिळू नये अशी सोय करतात वाटतं!
पण ह्य़ात दोन टोकंच बघायला मिळतात. काहीजण अतिशय बेजबाबदारपणे पाकीट बंद करतात. मोठय़ा रकमेचा चेक एकतर त्या सुंदर लिफाफ्यालाच चिकटलेला असतो- किंवा उघडय़ाच पाकिटात- अगदी वॉचमन शेजारी कुणालाही बघता येईल अशा पद्धतीनं न चिकटवलेल्या पापुद्रय़ा पाकिटात दिलेला असतो. अनेक चांगली मासिकं-अतिशय दरिद्री कव्हरांमध्ये कशीबशी तुरकलेली असतात. तर काही मासिकांच्या अंकांना पाकीटच नको म्हणून इतक्या घडय़ा करून गुंडाळतात की तो चोळामोळा झालेला अंक वाचायचीही इच्छा होत नाही.
मधे एकदा माझी फार मजा झाली. माझ्या लेटरहेड आणि पाकिटांचं- माझा नाशिकचा स्नेही वैभव पुराणिक ह्य़ानी दृष्ट लागेल इतकं सुंदर आणि अचूक डिझाइन केलं आहे. पण तो झाला लग्नाआधीचा पत्ता! त्यामुळे कुरिअरच्या पाकिटावर मी ‘करंट अ‍ॅड्रेस’चा सुटसुटीत शिक्का चिकटवला-स्क्रीन प्रिंटिंगच्या शेजारी. पण कुरिअर मी पाठवत होते पुण्याहून- कारण तिथे शूटिंग चालू होतं. कुरिअरवाले म्हणायला लागले हे दोन्ही खोडा आणि पुण्याचा पत्ता लिहा. एका साध्या पाकिटावर पाठवायचा धरून एकूण चार पत्ते, चार फोन नंबर, खाडाखोड हे बघून मलाच ओशाळल्यासारखं झालं-आणि मी एक नवीन पाकीट आणायला स्वार झाले बाईकवर..
कधी कधी वाटतं मात्र- पाकीट महत्त्वाचं की पाकिटाच्या आतली गोष्ट/ मजकूर? थोडक्यात, प्रॉडक्ट की पॅकेजिंग? जमाना बदल रहा है दोस्तों..

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Story img Loader