शिकणं प्रत्येकाला आवश्यक असतं. मग ‘विद्यापीठ’ कोणतंही असो. जेएनयू प्रकरणाच्या निमित्ताने लर्निगची प्रोसेस पुन्हा कंटिन्यू झाली. अनेक नवे जुगाड कळले, जुने फंडे आऊटडेटेड झाल्याचं समजलं. अनप्लग्ड आयओपनर थिअरीविषयी आजच्या ‘व्हायरलची साथ’मध्ये.

माणसानं आजन्म विद्यार्थी असावं कारण शिकण्याची प्रोसेस अखंडित सुरू राहते म्हणतात. व्हच्र्युअल विद्यापीठात एनरोल केलं आम्ही आणि ऑस्ट्रक फीलिंग देणाऱ्या गोष्टी समजू लागल्या. आदरणीय नेहरूंच्या काळात सोशल मीडिया असतं तर ते वैयक्तिक जेवढे ट्रेन्डिंग असते, त्याच्या कैकपटीने त्यांच्या नावाने सुरू असलेल्या विद्यापीठातला गदारोळ व्हायरल झाला आहे. कर्तृत्ववान मंडळींच्या गौरवार्थ भाषणात म्हणतात ना- ही व्यक्ती नसून, चालतं बोलतं ‘विद्यापीठ’ आहे. तसं का म्हणतात हे आता समजू लागलं आहे. मंतरलेले दिवस वगैरे म्हणतात तो कॉलेजचा टप्पा आम्हीही पार केला. पण आमचे गैरसमज चटकन होतात. सिलॅबस, एक्झाम, अटेंडन्स, ओपन बुक टेस्ट, हॉलतिकीट, प्रेझेंटेशन्स, असाइनमेंट यालाच कॉलेजलाइफ समजण्याची चूक केली आम्ही. आंदोलनं, उपोषणं, ठिय्या, नारेबाजी, भाषणं, राडा हे ‘एक्स्ट्राकरिक्युलर’ एन्जॉय करायचं राहूनच गेलं राव.

पिढीगणिक गोष्टी बदलतात. बदलाची दिशा प्रगतीची का अधोगतीची ते गुरुत्वाकर्षण लहरींसारखं सापेक्ष. बरं आम्ही पडलो किडूकमिडूक गटाचे प्रतिनिधी. देशभक्तीचे प्रदर्शन मांडणं आमच्या एथिक्समध्ये बसत नाही आणि पीस लव्हिंग असल्याने राष्ट्रद्रोह शेकडो मैल दूर आमच्यापासून. बरं इझम, आयडियालॉजी, संप्रदाय, शाखा, परिवार, तसंच डावे, उजवे, निळे, भगवे असं काहीच गाठीशी नसल्याने आमची मोठीच पंचाईत झाली. समाजमाध्यमांनी आम्हाला तारलं, आसरा दिला. आणि तुम्हाला सांगतो गेल्या काही तासांत आम्हाला जे ‘विश्वरूपदर्शन’ झालंय, होतंय बास्स..

अगदी परवापर्यंत फोटोशॉप सॉफ्टवेअर येणाऱ्यांचा आणि व्हिडीओ एडिटिंग करणाऱ्यांचा हेवा वाटायचा आम्हाला. पण हे स्किल ‘ब्रेक इन इंडिया’ करू शकतं हे ध्यानी आलंय. खोल समुद्रात कसे चाचे असतात तसे सोशल मीडियावर सायबर टोळ्या ऑपरेटिव्ह आहेत याचीही जाणीव झाली. चांगल्या मराठीत त्यांना ‘ट्रोल्स’ असं म्हणतात. विखारी कंटेट सैरावैैरा अर्थात व्हायरल करणे हेच त्यांचं टास्क. कोणी आपल्या टीव्ही शोदरम्यान अंधार करून ग्यान देतंय, कोणी तारस्वरात शिरा ताणून, बीपी शूट होऊन पॅनलीय चर्चा करतंय, कोणी त्याच विद्यापीठात जाऊन ग्राऊंड रिपोर्ट देतंय- आम्ही टिपतोय सगळं आणि शिकतोय. ‘कन्हैया’ शब्दाचा कॉन्टेक्स्ट बदलला आमचा. फेसबुकी, व्हॉट्सअ‍ॅपी, ट्विटरी, इन्स्टाग्रामी अकाऊंट आहे आणि आपण अद्याप ‘जेएनयू’वर व्यक्त नाही झालो तर पेनल्टीच होईल, झकरबर्गजी कान पकडतील या भीतीने अनेकांनी एक्स्प्रेस केलं स्वत:ला. चारोळ्या, कोटय़ा, स्फुटं, सुट्टे परिच्छेद, मिनी लेख, दीर्घ लेख, बिब्लिओग्राफीसहित खंडप्राय लेख, व्हिडीओ, टिझर असं सगळं ऑडियो-व्हिज्युल सामावलं. ‘आठ दिवसांत व्हा एक्स्पर्ट’ असं सेल्फहेल्पचं पुस्तक लिहिण्याचं पक्कं केलं आम्ही. रायटर आणि स्वयंघोषित इंटलेकच्युअलवादी चेतनजी भगत यांची प्रस्तावना मिळावी पुस्तकाला अशी सुप्त इच्छा आमची.

एरव्ही कोकणातल्या घाटरस्त्यांमुळे पोटात ढवळतं. या प्रकरणाच्या निमित्ताने आमच्या डोक्यातले बायस, प्रेज्युडाइसेस, नोशन्स, समज, गैरसमज, गुणधर्म असे पार ढवळून निघाले. मंथन, परिवर्तन, क्रांती यांचे हे सिमटम्प्स असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रोगाचं निदान झाल्यावर हायसं वाटण्याची ही पहिलीच वेळ. देशासाठी उणे ४० डिग्री वातावरणात बलिदान देणारे हणमंतप्पा शहीद होतात. त्यांच्या गौरवार्थ सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह होतो. दुसरीकडे स्टाफला सॅलरी न देणारे आयपीएलच्या टीमसाठी कोटींची बोली लावून खेळाडू विकत घेणारे ‘किंगफिशरी’ व्हायरल पाहून एकमद ‘लो’ वाटू लागतं. गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधमोहिमेतील भारतीय ट्रेन्डिंग यादीत अव्वल स्थानी पाहून आम्ही भारावून जातो. दुसरीकडे तिहार जेलमधून लिहिलेलं चिंतनपर आत्मचरित्र हातोहात खपू लागतं आणि आमचा आशेचा उरलासुरला ‘सहारा’ही संपुष्टात येतो. विचारांचं एवढं पोलरायझेशन तब्येतीला बरं नव्हे. म्हणून पुन्हा टेक्स्टबुकी गेलो. अर्थ, वित्त, सुबत्ता टम्र्सपासून आम्ही ‘सुरक्षित अंतरा’वर पण अर्थशास्त्रातल्याच रट्टा मारलेल्या लॉमध्ये जालीम उतारा सापडला- डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. वाढतं असं वाटत असताना प्रत्यक्षात कमी होतं. मागणी-पुरवठय़ाची ही कॉन्सेप्ट जरा तुमच्या भावनांना अप्लाय करून बघा. शेवटी शिकणं महत्त्वाचं..

Story img Loader