तरुणाईच्या प्रातिनिधिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय नि समाजाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाची सध्याच्या जमान्यातली उत्तरं शोधायचा हा प्रयत्न.
विचार प्रगल्भ व्हावेत
एके काळी एका विशिष्ट वयात प्रेमभावना रुजायला लागायची. हल्ली पौगंडावस्थेत आल्या आल्या या गोष्टी सुरू होतात. त्याच वेळी दुसरीकडं एक काळजीयुक्त भीती वाटतेय की, हल्ली कॉलेजगोअर्समध्ये पझेसिव्हनेस वाढीस लागलाय. दुसऱ्या व्यक्तीचा आदर करणं, हे प्रेमात अंतर्भूत असलं पाहिजे, असं सगळीकडंच असतं असं नाही. एखाद्या मुलीला ‘नाही’ म्हणायचं असेल, तर ते अॅक्सेप्ट करणं, अलीकडं मुलांना कठीण झालंय. मुलींच्याबाबतीत खूपच उदारपणा यायला लागलाय, मध्यम-उच्चमध्यमवर्गामध्ये. पण तसंच मुलांना वाढवलं जात नाही. मुलींचा नि त्यांच्या भावनांचा आदर करायला मुलग्यांना शिकवायला हवं. ते न झाल्यानं त्याचा परिणाम मुलींना सहन करावा लागतो. रिग्रेसिव्हली हे प्रमाण सध्या वाढीस लागलंय. संस्कृतीरक्षकांना संस्कृतीची चिंता वाटायला लागली आहे. एकीकडं समाजातल्या रिग्रेसिव्ह टेण्डन्सीज बळावताहेत नि त्याच वेळी तारुण्यसुलभ फिलिंग्ज नाकारून नाही चालत. प्रेमातही एकमेकांवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला जातोय. त्याच वेळी सनातनी दृष्टिकोनाच्या विरोधात प्रेमाच्या बाजूनं उभं ठाकण्याचाही प्रयत्न होतोय.
प्रेमात पडण्याचा अधिकार सर्वाना आहे, त्यावर कुणाचा कंट्रोल नसावा. पण त्यासाठी समाजही तेवढाच प्रगल्भ व्हायला हवा. दोन्ही प्रवृत्तींमधला हा झगडा चालूच राहणार. दुर्दैवानं आपली आधुनिकता पेहराव नि वागण्यापुरती मर्यादित राहिल्येय. ती अजून चांगल्या अर्थानं विचारांत आलेली नाहीये.
प्रा. अंजली कानिटकर,समाजशास्त्रज्ञ
आम्ही प्रेमात काय बघतो?
आमच्या दृष्टीने प्रेम अगदीच स्पनाळू नसलं तरी ‘प्रेमात पडणं’ या गोष्टीला लॉजिक लावायला आम्ही जात नाही. मुळात गोष्टी एका साच्यातूनच बघाव्यात हेच आम्हाला पटत नाही. त्यामुळे समोरच्याच्या ड्रेसिंग सेन्सपासून सेन्स ऑफ ह्य़ुमपर्यंत काहीही आम्हाला आवडू शकतं. एखाद्याच्या सहवासात कम्फर्टेबल वाटणं हे आमच्यासाठी प्रेम असतं. त्यासाठी तिने किंवा त्याने आमच्यावर गिफ्ट्सचा वर्षांव करावा, दिवसातून दहा वेळा लव यू अशा फिल्मी अपेक्षा नक्कीच नसतात आमच्या. पण एक व्यक्ती म्हणून आमचा आदर आणि स्वीकार करावा असं आम्हाला नक्कीच वाटतं. आजही आमच्यातली मॉडर्न शकुंतला समोर दिसलेल्या दुष्यंताकडे बघून हरखून जातेच. पण तिची नजर केवळ त्याचं बाह्य़ सौंेदर्य न पाहता तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचे विचार, त्याचा आत्मविश्वासास सगळ्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करते. आम्ही सौंदर्यापेक्षा पर्सनॅलिटीने इम्प्रेस होणारे आहोत. आमची पिढी प्रेमाच्या बाबतीतही बोल्ड आणि क्लीअर आहे. त्यामुळे प्रेमात पडल्यावरही रॅशनली बघणं आम्हाला जमू शकतं. पण कुठे तरी आम्ही प्रेमाच्या त्या उत्कट भावनेचा ओलावाही जपलाय. त्यामुळे कधी तरी त्याने तिला अचानक दिलेलं सरप्राइज किंवा बाईकवर मागे बसून तिने त्याच्यासाठी गायलेलं एखादं रोमॅन्टिक गाणं, मस्त पावसात आयत्या वेळी ठरवून भेटण्यातला आनंद आणि एकत्र खाल्लेलं कणीस हे सगळं आम्हाला आजही हवंहवंस वाटतंच. आमचा प्रेमाचा एक असा कुठलाच फंडा नाही. पण आयुष्यातले प्रेमाचे ते सुंदर क्षण भरभरून जगायचे असतात आम्हाला. फक्त त्याचं किंवा तिचं होऊन!
’ लीना दातार, विद्यार्थिनी,रुईया महाविद्यालय
मन तळ्यात..मळ्यात..
टीनएजपासून ते यूथपर्यंतचं वय खूप डायनामिक नि चेंजिंग असतं. भावना, विचार, प्रायोरिटीज बदलत्या असतात. त्यामुळं ज्या व्यक्तीची एखादी गोष्ट आवडायला लागते, ती पुढं ते नातं टिकवायला पुरेशी पडेलच असं नाही. मग आपण प्रेमात का पडलो, असा थोडासा मनस्तापच व्हायला लागतो. अशा वेळी मुलांनी कमिट करायच्या आधी किंवा फार पुढं जाणं आधीच टाळलेलं बरं. लहान वयात प्रेमात पडताना लग्नाचा विचार केला जात नाही. त्या वयात कमिटेड रिलेशनशिपमध्ये राहिलं तर कडवटपणा येऊ शकतो नि त्यातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं. त्यामुळं एकमेकांना नीट ओळखेपर्यंत खूप कमिट करू नये किंवा मगच करावं. सध्या सोशल मीडिया खूप प्रभावी ठरतोय. त्यामुळं व्हच्र्युअल लाइफ नि रिअल लाइफमधला फरकच कधी कधी मुलांच्या लक्षात येत नाही. प्रत्यक्ष भेटीतल्या संवादांतला टोन नि बॉडीलँग्वेज महत्त्वाची असते. तो सोशल मीडियात कुठंच येत नाही. फक्त शब्द येतात नि त्यांवरच सगळा डोलारा उभा केला जातो. त्यामुळं प्रत्यक्षात भेटल्यावर समोरच्याचा भ्रमनिरास होऊ शकतो. पण तोपर्यंत ते मनानं इतके गुंतलेले असतात की, मग कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. आता काही पाश्चात्त्य गोष्टी आपण स्वीकारल्या आहेत. त्यातलाच व्हँलेंटाईन्स डे एक आहे. हल्ली पर्सनल गोष्टी सेलेब्रेट करण्याचे मार्ग खूप दिखाऊ झाल्यासारखे वाटताहेत. गिफ्टिंग, त्याचे फोटो काढणं, ते सोशल मीडियावर टाकणं यातून हे सगळं त्याच्याचसाठी केलंय की काय, असा प्रश्न पडायला लागलाय. नात्यांचा फील जो हळूहळू यायचा, तोच आता ‘दाखवला’ जातोय, असं दिसतंय. त्यात काहीसा कृत्रिमपणा येऊन तो केवळ एक इव्हेंट होऊन जातोय. सायकॉलॉजिस्ट अल्बर्ट एलिस यांनी सांगितल्यानुसार, जोडीदार शोधण्याची नैसर्गिक मानसिकता असतेच. त्यानुसार अपेक्षांमध्ये बसणारं कुणी दिसलं की आकर्षण वाटतं नि पुढं प्रपोज केलं जातं. याबाबतीत मुलांचे विचार चटकन बदलत नाहीत, फॅमिलीज रिजिड असतात. मग त्यामुळं थोडी ओढाताण होते. मुलांनी मुलींचा संशय घेणं, स्वामित्वाची भावना असणं या गोष्टी घडतात. त्यामानानं मुलींना करिअर करायचं असतं. स्वत:ची मतं असतात. मुलांची मानसिकता वर्षांनुर्वष मुरलेली आहे. ती पटकन बदलेल ही अपेक्षा नाही करू शकत. लहानपणापासून मुलांना थोडंसं ग्रुम केलं तर त्यांचा विचार थोडा थोडा बदलू शकेल. या प्रवासात अनेक खाचखळगे असल्यानं त्याचे धक्के मुलांना नि मुलींनाही बसणार आहेत, पण कालांतरानं हे विचार स्थिरावतील.
’ डॉ. वैशाली देशमुख, पौंगंडावस्था तज्ज्ञ
(संकलन : राधिका कुंटे)