दूरवरून आकाशगंगा तटस्थ वाटली तरी अवकाशात कितीतरी बदल होतात. आपापल्या गती आणि स्वभावानुसार सगळे ग्रहगोल मार्गस्थ असतात. ह्य़ा सूर्यमंडळामध्ये पृथ्वीसुद्धा आहे. स्वत:भोवती फिरत ती सूर्याला प्रदक्षिणा घालते. ती सुद्धा बदलते आहे. अगदी रोज.
नवा लेख लिहून झाला. थोडा फेरफार बदल केला, दुरुस्त्या झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा लेख तपासायला घेतला. वाचताना लक्षच लागेना. काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं. गप्प बसून विचार केल्यावर लक्षात आलं. अरे! हा ऑक्टोबरचा दुसरा आठवडा. म्हणजे आपल्या ‘सो.कुल’चा वाढदिवस आला की. गंमतच वाटली मला. काय भराभर दिवस उडून जातात. आत्ता लिहायला सुरुवात केली असं वाटतंय. तर चक्क ह्य़ा पर्वाला आकडय़ांमध्ये आख्खी दोन र्वष पूर्ण होत आली! गाडीत बसल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे आपण एकाच जागी बसलेले असतो. पण गाडी आपल्याला वेगवेगळ्या गावांना नेत असते. एक मिनिट गाडीतून उतरून जरा थांबावंसं वाटलं मला ह्य़ा लेखाच्या निमित्तानं. केवढा प्रवास झाला ना.!
काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं सारखं. किंवा नव्यानी काहीतरी ‘रिअलाईझ’ होत असतं. मागच्याच लेखातली शेवटची ओळ- ‘समंजसपणे मोठं होणं किती विदारक असतं ना.’ आता ह्य़ातला ‘विदारक’ हा शब्द मला इतका सतावतोय. कशाला मी इतका तीव्र शब्द वापरला? त्या क्षणी एवढं हरल्यासारखं का वाटत होतं मला.? खरं तर ‘आव्हानात्मक’ चाललं असतं. ‘परीक्षा घेणारं’, ‘कोडय़ात टाकणारं’. असं कुठलंही विशेषण चाललं असतं. किंवा अगदी सोपा म्हणजे- ‘अवघड’ हा साधा शब्दसुद्धा चालला असता. एकूणात मोठं होणं म्हणजे काय- तर प्रवास करणं. किंवा प्रवासात असणं. आपण ठरवलंच, तर प्रवासाला कितीही त्रासदायक मानू शकतो. पण प्रवास/ जगणं. ही आपली निवड आहे. तिचे स्वाभाविक पाठीराखे सोबती-आनंद आणि कुतूहल. अनुभव असणारच वैविध्यपूर्ण. आणि त्यातच मजा आहे.
शिवाय प्रवासात/ जगण्यात- बदल फक्त इतरच गोष्टींमध्ये होतात असं नाही. आपल्या स्वत:तही होतात- आणि ते होऊ दिले पाहिजेत. मला कळतंय मीही बदलत चालले आहे. मला ‘मी’ असणं मिळत चाललंय. आधी आपण अनेक गोष्टी भीडमधल्या भेडियोंकी तरह करतो. पण आता काही करण्यापूर्वी मी एक शांत श्वास घ्यायला शिकले आहे. आपण चांगलंच वागायचं हे न्यायप्रिय असणं खरंच आहे. पण काही ठिकाणी- आपण गुंतण्याची, वेळ देण्याची, भावना खर्च करण्याची गरजच नसते- हे आता मला कळायला लागलंय.
माझ्या एका मैत्रिणीला रुसायला फार आवडतं. ती वाटच पाहात असल्यासारखी वाटते निमित्तासाठी. जर कुठे खट् झालं. की झालीच ही खट्टू. मग तिच्या मित्र आणि परिवाराचं- तिला मनवण्याचं सत्र सुरू होतं. तिचा ईगो काचेइतका नाजूक असतो. पाहावं तेव्हा ती क्रोधागृहात निघायच्या तयारीत असते. मग भांडणं, समजुती घालणं, ऊहापोह. ह्य़ा सगळ्यात तिचं चांगलं मनोरंजन होतं. पण बाकीच्यांच्या वागण्यात सतत एक धास्तावलेपणा असतो. मला तर आता ‘लांडगा आला रे.’सारखा कंटाळा आलाय तिच्या रुसण्याचा. त्यामुळे अलीकडेच मी तिच्या ह्य़ा खेळातून हलकेच अंग काढून घेतलंय. मलाच इतकं बरं वाटायला लागलंय. थोडक्यात, मोठं झाल्यासारखं वाटतंय.
दुसरी एक मैत्रिण कॉलेज संपल्यावर काही वर्षांतच परदेशी जाऊन बसली. आम्ही मायदेशी उरलेले मित्रमैत्रिणी सतत हळवे व्हायचो. तिचं नाटय़मय लग्न, तिच्या अडचणी, ओढाताण. ह्याबदद्दल फार फार वाईट वाटून घ्यायचो. आठवणीच्या प्रत्येक क्षणाला/ दिवसाला पैशाची पर्वा न करता- तिला फोन/ एसएमएस/मेल करायचो. डोळ्यातलं पाणी आवाजात जाणवू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत बरी हायेस ना. विचारायचो. काही लागलं तर सांग. परत कधी येशील.चा धोशा लावायचो. पण अलीकडे मला जाणवलं, चांगलं एक तप झालं की तिला परदशी स्थायिक होऊन! ती तिथे घरं, नोकऱ्या बदलते आहे, घरच्यांना सुट्टीला बोलवते, फेसबुकवर तिथल्या फ्रेंडसबरोबरचे नवी गाडी घेतल्याचे फोटो टाकते.. ती तिथे रुळली आता. परदेशी जाण्याचा निर्णय तिचा होता. तिच्या निर्णयाला- मित्र म्हणून आपण कुठेतरी काही अंशी अपराधी का वाटून घ्यायचं? आणि किती दिवस.! ती सुजाण झाली. आपण आपलं मोठं होणं कशाला थोपवून धरायचं? बरं दिसणार नाही म्हणून? यंदा मला अर्थातच तिची आठवण आली. पण फोनपाशी गेलेल्या उजव्या हाताला, मी डाव्यानी थोपटलं. म्हटलं, असू दे गडय़ा. हेतू चांगला आहे तुझा. पण ठेव जरा तुझ्याच मुठीत, तुझ्याचसाठी. हृदयातली कळ आणि डोळ्यातलं पाणी ह्य़ांची किंमत तुझी तुलाच मोजावी लागणार आहे. नकळत लागलेल्या भाबडय़ा सवयींना थांबवूया आता.
तर हे आकलन वाढणं मला खूप सुखावह आणि ‘एनरिचिंग’ वाटायला लागलंय. चीअर्स ऑन-मोठं होणं. ‘सो-कुल’च्या पाठोपाठ माझ्या बाळाचा- कावेरीचा पहिला वाढदिवस येतोय. मावणार नाही इतका आनंद व्यापून राहिलाय आयुष्यात. मग खुळ्यासारखं हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे का लागायचं? तुम्ही सगळे आहात की एवढे माझ्यासाठी. मग हट्टीपणाचंच काय एवढं अप्रूप वाटून घ्यायचं? खरं अप्रूप आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी. ते सुंदरपणे व्यक्त होऊ दे. ‘मुला रुश’ ह्य़ा सिनेमात एक अप्रतिम वाक्य आहे- ‘व्हॉट आय हॅव लन्र्ट. इज टू लव्ह इन रिटर्न.’ तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, प्रेम ह्य़ासाठी पुरे पडण्याचं बळ मला मिळो. थँक यू ऑल. माझी कृतज्ञ भावना तुमच्यापर्यंत पोचतील ना? लॉटस् अॅण्ड लॉटस् ऑफ लव्ह.
सो कुल : वाढ-दिवस
हा ऑक्टोबरचा दुसरा आठवडा. म्हणजे आपल्या ‘सो.कुल’चा वाढदिवस आला की. गंमतच वाटली मला. काय भराभर दिवस उडून जातात. आत्ता लिहायला सुरुवात केली असं वाटतंय.
आणखी वाचा
First published on: 13-10-2012 at 06:36 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sokool sonali kulkarni birthday