फॅशन या शब्दाला मराठी प्रतिशब्द नाही, इतका हा विषय आपल्यासाठी परका. पण भारतीय परंपरेत फॅशन आहे, ती वेगळ्या अर्थाने. हे डिझायनर वैशाली एस. यांच्याशी झालेल्या संवादातून जाणवले. फॅशनची परिभाषा उलगडून सांगताना त्यांनी फॅशन डिझायनिंगमधील करिअरच्या संधीबाबतही माहिती दिली. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी या क्षेत्रात जागा कशी निर्माण केली, ती कथा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. गेल्या बुधवारी मुंबईत झालेल्या व्हिवा लाउंजमध्ये उपस्थित असणाऱ्यांना या संवादातून नवी प्रेरणा, नवी दिशा मिळाली. उपस्थितांपैकी काहींच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया..

प्रेरणादायी अनुभव
Untitled-1
मीसुद्धा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे हे समजलं. वैशाली एस.सारख्या एस्टॅब्लिश्ड डिझायनरशी संवाद साधता आला. कोणतं फॅब्रिक निवडावं, ट्रेण्ड कसा ओळखावा, आपला व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल खूप माहिती मिळाली. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, तर ती कशी पूर्ण होते, हे तिच्या स्वत:च्या गोष्टीवरून शिकायला मिळालं.
– आसावरी नवरंगे

 

हॅट्स ऑफ टू वैशाली

Untitled-2

 

आत्तापर्यंतचा माझा समज होता की या क्षेत्रात फक्त मुलींनाच करिअर घडवता येतं, पण वैशाली मॅमच्या बोलण्यातून कळलं की, फॅशन डिझायनिंग ही एक कला आहे आणि मुलींसोबत मुलांनादेखील यात भरपूर स्कोप आहे. वैशाली यांनी इथपर्यंत पोचण्यासाठी केलेली मेहनत खरंच वाखाणण्याजोगी आहे. हॅट्स ऑफ वैशाली मॅम.
प्रथमेश घाडगे

 

मार्गदर्शनपर कार्यक्रम
Untitled-3
मी गेल्या दीड वर्षांपासून फॅशन डिझायनिंग शिकते आहे; पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या क्षेत्राविषयी खूप वेगळ्या गोष्टी समजल्या. अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या. हॅण्डलूममध्ये आपण अनेक फॅशनेबल गोष्टी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन वैशालीकडून लाभलं. एक वेगळा दृष्टिकोन घेऊन मी बाहेर पडते आहे.

– तेजश्री गायकवाड

 

वैशाली मॅमनी प्रेरणा दिली
Untitled-4
प्रत्येकाला आपल्या आवडीचं करिअर करायला मोठय़ांचा पाठिंबा लागतो, असं म्हणतात. आज वैशाली मॅमशी संवाद साधताना मला तशीच प्रेरणा मिळाली. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात शिखर गाठलं. मला त्यांची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख विदेशातही करून दिली. प्रसिद्धीसाठी वेस्टर्न फॅशन केली पाहिजे हा समज वैशाली मॅमने खोटा करून दाखवलाय. त्या खरंच माझ्यासाठी गॉडफादर ठरल्या आहेत. जिद्द, मेहनतीची तयारी आणि स्वत:वर विश्वास असला की नक्कीच आपण हव्या त्या क्षेत्रात पुढे जाऊ  शकतो, हेदेखील त्यांच्या   बोलण्यातून मला उमगलंय.

-अभिजीत मुरुडकर.

 

फॅशनची परिभाषा उलगडली
Untitled-5
वैशाली एस. यांच्याबरोबरचा हा व्हिवा लाउंज ‘फॅशन’ या विषयाला अधिक जवळून पाहण्याची संधी देऊन गेला. मोजक्या वेळेत फॅशनची परिभाषा उलगडली गेली. फॅशन जगतातील ग्लॅमरनं हुरळून जाण्यापलीकडची प्रोत्साहित करणारी माहिती वैशाली एस. यांनी दिली. बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टींची गुगलमध्येही सापडणार नाही, अशी माहिती मिळाली आणि संवाद साधता आला.

-अक्षता तानवडे

 

निसर्गाशी जवळीक साधणारा फॅशन फंडा
Untitled-6

डिझायनर वैशाली एस. यांनी फॅशनची एक वेगळी व्याख्या सांगितली. फॅशन जगतात सर्वात महत्त्वाचा असतो आत्मविश्वास, हे पटवून देत निसर्गाच्या जवळ जाणाऱ्या घटकांशी जवळीक साधण्याचा फॅशन फंडा त्यांनी सांगितला. तो कसा अजमावयाचा हेदेखील शिकायला मिळालं. तसंच हातमाग आणि त्याची देशी बनावटीची कलाकुसर याचा वापर करूनही फॅशनच्या साचात ही बांधणी कशी करता येईल हेही जाणता आलं.

-नीलम पेडणेकर

 

फॅशनेबल दुवा
Untitled-7

फॅशनबद्दल असणाऱ्या गैरसमजुती दूर करण्याचं काम वैशाली एस. यांच्याबरोबरच्या या व्हिवा लाउंजमधून झालं. कार्यक्रम फारच छान झाला. भारतीय फॅशनची पताका आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिमानानं मिरवू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला. एकंदरच हा भारतीय संस्कृतीबरोबरचा फॅशनेबल दुवा मनाला फारच भावला.

-स्वाती तुळसकर

 

नवी प्रेरणा मिळाली
Untitled-8

वैशाली यांनी या ‘व्हिवा लाउंज’मधून फॅशन डिझायनिंगची कन्सेप्ट क्लीअर केली. तसंच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असं म्हणत निसर्गालाच प्रेरणास्रोत मानून कसं वापरावं हा मूलमंत्र वैशाली एस. यांच्या बोलण्यातून मिळाला. सर्वसाधारण डिझायनर ते फॅशन वीकपर्यंतचा प्रवास फार सोप्या शब्दांत ‘व्हिवा लाउंज’मध्ये उलगडण्यात आला.

 


-स्नेहल थारळी

 

आवडीच्या करिअरचं स्वप्न
Untitled-9
खरंतर मला फॅशन डिझायनिंग करायचंय. पण माझ्या घरातून या क्षेत्रात येण्यासाठी मला परवानगी नाही, कारण माझ्या घरच्यांना या क्षेत्राबद्दल पुरेशी माहितीच नाही. या क्षेत्रात येऊन नेमकं काय करायचं याबद्दल अनेकांच्या मनात शंका असते. त्या सगळ्यांना आजच्या या मुलाखतीमधून उत्तर मिळायलंय. वैशाली एस. यांना व्हिवा लाउंजला बोलावल्याबद्दल ‘लोकसत्ता व्हिवा’ला धन्यवाद. माझी आवड हेच माझं करिअर होण्यासाठी आजचा कार्यक्रम नक्की मदत करेल, अशी आशा आहे.

-साधना पिसे

 

संकलन :  अमृता अरुण, कोमल आचरेकर, सायली पाटील. * छाया : मानस बर्वे