‘विसराळू विनू’ नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली गोष्ट आता आठवत नाही, पण शीर्षक मात्र पक्कं लक्षात आहे.
जवळजवळ ‘परफेक्शनिस्ट’ अशी जवळच्या मित्रमंडळींमधे माझी ख्याती आहे. आवडत्या माणसांचे वाढदिवस तर मला तोंडपाठ असतात. सदा-सर्वकाळ मी काहीतरी लक्षात ठेवण्यात बिझी असते. आता तर मोबाइलच्या ‘रिमायण्डर’ सुविधेमुळे माझ्यासारख्यांची चंगळच आहे. प्रत्येक दिवसाला मी कुणाला तरी फोन, उद्याच्या मीटिंगची आठवण, शूटिंगला न्यायच्या कंटिन्युईटीच्या गोष्टी माझे (परफेक्शनिस्ट गुणिले शंभर) असे सीए -उदय साठे सरांनी मागितलेली बिलं, बँकस्टेटमेंट- असे वेगवेगळ्या वेळेला अलार्म लावलेले असतात. आपणच आपल्याला आठवण करून देण्याची काय फॅण्टॅस्टिक सोय आहे ही! त्यामुळे कामं कसली वेळच्या वेळेवर होतात ना!
पण तुम्ही कुणी कधी विसरलाय काही कुठे? कारण कामांचं काय. ती होतच राहतात. कामावर जाणं आपण कधी विसरत नाही. जिमला जाणं विसरत नाही. जेवण, झोप, पेट्रोल भरणं, नखं कापणं हे सगळं ऑटो मोडवर टाकल्यासारखं बिनचूकपणे चालू असतं. सकाळचा चहा किंवा पगार अकाऊंटला आलाय का हे तपासणं- हे कुठे लक्षात ठेवावं लागतं? पण ह्य़ा मुख्य गोष्टींच्या मधल्या ज्या बारीकसारीक बाबी असतात, त्या मात्र विनाकारण विसरल्या जातात. उदाहरणार्थ : मध्ये मी मटकी भिजत घातली होती रात्रभर. दुसऱ्या दिवशी कापडात बांधून ठेवली. कसले मस्त मोड आले मग. नेमका त्याच दिवशी माझ्या नवऱ्याला -लंच मीटिंग होती- म्हणून घरचा डबा नको होता. शिवाय आम्ही बाकीच्यांसाठी आदल्या दिवशीची भाजी जरा जास्त उरली होती. म्हणून मी उसळ नंतर करूया म्हटलं. पण पुढचे दोन-तीन दिवस काहीतरी कामात अडकून मी मटकीचं पार विसरले. पुढे फ्रीजमधून जाळीचा डबा काढून पाहते तर काय.. बिचारे मोड अगदी सुकत आले होते. माझा किती हिर-मोड झाला असेल कल्पना करा!
एकदा गोव्याच्या चित्रपट महोत्सवाला गेले होते. एक अप्रतिम साडी उद्घाटनाला नेसायचं ठरवलं होतं. फ्लाईट वेळेवर पोचली. सुस्मित आयोजक तत्परतेनं स्वागताला पुढे झाले. गोव्याचं निसर्गसौंदर्य न्याहाळत हॉटेलवर पोचले. मागवलेला चहासुद्धा चांगला निघाला. मी मेकअप वगैरे करून तयार झाले तरी अजून निघायला वेळ होता. म्हटलं पंधरा-वीस मिनिटं टीव्ही बघून जस्ट निघण्यापूर्वी साडी नेसावी. तर ती ‘जस्ट’ वेळ झाल्यावर साडीची घडी उलगडली आणि अचानक लक्षात आलं सेफ्टीपिना??? विसरून आलेले आहोत आपण! जी धांदल उडाली माझी. ती साडी होती प्रचंड सुळसुळीत.. विना सेफ्टीपिन नेसावी तरी कशी? त्यात उद्घाटन सोहळ्याच्या वेळी पूर्ण वेळ मी स्टेजवर असणार होते. सतत पदर सावरत बसणं काही बरं दिसलं नसतं- ना पदर खोचून जाणं! मला अजिबात ते खांद्यावरून ढळण्याचा धाक दाखवणारे घरंगळणारे पदर आणि तो सावरण्याच्या लाडीक बायकी अदा आवडत नाहीत. ओके ह्य़ा आवडीनिवडी, तत्त्व वगैरे ठीक आहेत पण सेफ्टीपिन विसरून कशी आले मी. याच्यावर किती ही दात ओठ खाल्ले तरी उत्तर काय- तर मनुष्याची स्मृती. त्या दिवशी एका पिनेच्या शोधात मी तेल मागणाऱ्या अश्वत्थाम्यासारखी गोएं’च्या कुठकुठल्या कानाकोपऱ्यात फिरले असेन काय सांगू!
सेम तसंच झालं परवा. पुण्याला आमच्या ‘कोकणस्थ’चा प्रिमीअर आणि त्याआधी प्रमोशनचे काही कार्यक्रम होते. आदल्या दिवशी मुंबई प्रिमीअर संपवून घरी यायला रात्रीचे बारा वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गडबडीत बाकी सगळ्या गोष्टी घेतल्या. ऑप्शन असू देत म्हणून बाळाचे दोन छान ड्रेससुद्धा घेतले. अनेकदा पुण्याला आईबाबांकडे जाताना मी टॉवेल किंवा टूथब्रश विसरते आणि मग आईने (आठवणीने) माझ्यासाठी ठेवलेले वापरते. या वेळी न विसरता तेही घेतलं, मेकअप किट, गेस्ट पासेस, मोबाइल चार्जर सगळं सगळं घेतलं. स्वत:वर खूष होत प्रवासात रिलॅक्स व्हायला सज्ज झाले. ट्रॅफिकमधून वाट काढत वाशीच्या आसपास आल्यावर लक्षात आलं. काहीतरी महत्त्वाचं राहिलंय घ्यायच. काय राहिलं असेल ओळखा? प्रिमीअरला नेसायची साडी, आधीचा टॉप, पंजाबी सूट थोडक्यात प्रवास सोडता बाकी दिवसाचा संपूर्ण वॉर्डरोब सगळं घरीच राहिलं होतं! भगवंता! आता या ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून पुन्हा मागं फिरणंही शक्य नव्हतं. स्वत:वर चिडणे, चडफडणे, रडकुंडीला येणे. ह्या विसराविसरी झाल्यानंतरच्या टीपीकल भावनिक आंदोलनांमधून जाऊन आले. त्यात ट्रेड युनिअनच्या संपाचा तो कडक दिवस होता. पुण्यात कुठलंही दुकान उघडं नव्हतं!
नाही. म्हणजे डोण्ट वरी. दिवस साजरा झाला पण त्यासाठी किती आटापीटा करावा लागला, किती क्लृप्त्या लढवाव्या लागल्या ह्य़ाच्यावर एक वेगळा सिनेमा होऊ शकेल. नेमकी कळीची गोष्ट का विसरली जाते आपल्या हातून? डोक्यातनं नेमकी तीच फाइल का विसरली जाते त्यावेळी? कधी कधी मला वाटतं फार व्यासंग आणि त्याचा पसारा लावून घेतो आपण आपल्या मागे. असो. पण ते सगळं समजा कमी केलं अथवा वजाही केलं. तरी गावाला गेल्यावर- नळ नीट बंद केला होता ना आपण- की विसरलो?- ह्य़ाचा जो भुंगा लागतो ना डोक्याला तो स्वस्थच बसू देत नाही. मग शेजाऱ्यांना, घरी काम करणाऱ्यांना फोन, किल्लीची तजवीज, स्वत:ला शिव्याशाप ह्य़ा चक्रानंतर अखेर सगळं आलबेल आहे, आपण आठवणींनी नीट बंद केला होता- हे कानावर येतं ना तेव्हा जो जीव भांडय़ात पडतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एकेका थेंबासाठी जिथं जिणं हैराण झालंय अशा परिस्थितीत आपल्या वेंधळेपणामुळे नैसर्गिक संपत्तीचं नुकसान होणं हे आजच्या काळात अक्षम्य वाटतं.
सो कुल : विसराळू विनू
‘विसराळू विनू’ नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली गोष्ट आता आठवत नाही, पण शीर्षक मात्र पक्कं लक्षात आहे. जवळजवळ ‘परफेक्शनिस्ट’ अशी जवळच्या मित्रमंडळींमधे माझी ख्याती आहे. आवडत्या माणसांचे वाढदिवस तर मला तोंडपाठ असतात. सदा-सर्वकाळ मी काहीतरी लक्षात ठेवण्यात बिझी असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali kulkarni tells us how she forget very small things which are important