नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
येत्या ३० जुलैला आपल्या सोनू निगमचा ४२ वा वाढदिवस. सोनू निगम.. जवळजवळ १५ वर्षे गायन क्षेत्रातले सुपरस्टारपद निर्विवादपणे गाजवणारा; ज्याला गायकांमधला शाहरुख खान असे म्हणायला हरकत नाही. सोनू निगम.. रफीसाहेबांचा खरा वारसदार, ज्याने रफीसाहेबांच्या स्टाइलने गायला सुरुवात केली खरी, पण नंतर स्वत:ची अशी गायकी निर्माण केली की नवोदित गायकांच्या अख्ख्या दोन-तीन पिढय़ा (या यादीत मीसुद्धा येतोच) केवळ सोनूचे अनुकरण करीत वाढल्या. असे अनेक वेळा झाले आहे की, मी एखादे रेकॉर्डिग गायलो आहे. समोरच्याने कौतुक केले आहे, मी स्वत:वरच खूश आहे.. नेमके अशाच वेळी गाडीत ‘साथिया’ किंवा ‘सतरंगी रे’ लागते.. आणि स्वत:विषयीचा सगळा अभिमान गळून पडतो. ५० फुटांवरून धाडकन जमिनीवर पडल्यासारखे होते. आपण अजून कुठेच पोहोचलो नाही याची जाणीव होते. त्याचबरोबर अजून शिकायची, अजून प्रयत्न करायची प्रेरणा मिळते. सोनू निगम या अर्थाने स्वत:ला भीम समजणाऱ्या प्रत्येक गायकाच्या वाटेत आडवे येणारे हनुमानाचे शेपूट आहे.
खरे तर सोनू निगम हीच एक प्लेलिस्ट आहे. मला तरी सोनूचे असे गाणे क्वचितच सापडेल, जे मला आवडले नाहीय. कारण प्रेमगीत, आयटम साँग, टपोरी गाणे, विरहगीत, वेगळ्या धाटणीचे, टिपिकल चालीचे, असे कुठलेही गाणे असो, सोनू त्यातल्या सुरासुरात, शब्दाशब्दात आपला जीव टाकतो. हिंदी, कन्नड, तमिळ, मराठी, बंगाली भाषांमध्ये इतकी गाणी गायली आहेत सोनूने, कुठलेच गाणे असे सापडत नाही, ज्यात त्याने पाटय़ा टाकल्या आहेत. अनेक गाणी अशी आहेत, जी केवळ सोनूने गायली म्हणून चांगली वाटतात. आजच्या प्लेलिस्टमध्ये मी सोनूच्या अशा गाण्यांचा उल्लेख करीत आहे, जी मला फार म्हणजे फारच आवडतात. ज्या गाण्यांमधून मला खूप काही शिकायला मिळाले. सोनू निगम ही चीज ‘और’ कशी आहे, हे त्याने गायलेल्या द्वंद्वगीतांमधून आणि समूहगीतांमध्ये लगेच कळून येते. उदाहरणार्थ, ‘ताल’मधले ‘इश्क बिना क्या..’ हे अनुराधा श्रीराम या गायिकेने चांगलेच गायले आहे; पण ‘तुमने इश्क का नाम सुना है..’ म्हणत जिथे सोनू निगम एंट्री घेतो, तिथे त्या गाण्याचा नूरच बदलून जातो. ‘संदेसे आते है (बॉर्डर) किंवा ‘कंधोसे मिलते है कंधे’ (लक्ष्य) या गाण्यांमध्ये मोठमोठाल्या गायकांची फौजच आहे. ते सगळे भारीच आहेत, पण सोनूच्या ओळी येतात, तेव्हा गाण्याचे सौंदर्य अजूनच खुलते. तोच प्रकार ‘मेरा रंग दे बसंती चोला.’ या गाण्यात. अशीच मला आवडणारी अजून काही द्वंद्वगीते म्हणजे – ‘किस्मत से तुम’ (अनुराधा पौडवाल, चित्रपट- पुकार), ‘खामोशिया गुनगुनाने लगी’ (लता मंगेशकर, वन टू का फोर), चोरी चोरी चुपके से (अलका याज्ञिक, लकी नो टाइम फॉर लव्ह), आणि मला फारच आवडणारे ‘इन लम्हों के दामन में’ (मधुश्री, जोधा अकबर).
गोविंदासाठी गाताना सोनूचा मूड वेगळाच लागलेला दिसतो. ‘खिडकी खुली जरा’, ‘नीचे फूलों की दुकान’, ‘व्हॉट इज मोबाइल नंबर’ ही टपोरी स्टाइल गाणीसुद्धा सोनू सर तेवढय़ाच तयारीने, उत्साहाने आणि कारागिरीने गातात. जेव्हा गाण्यात फक्त सोनू आणि सोनूच असतो, तेव्हा तर काही विचारायलाच नको. मला अत्यंत आवडणारी एकल (सोलो) गाणी, ज्यांचा अभ्यास करावा तेवढा कमी आहे, अशी गाणी म्हणजे ‘दीवाना’ अल्बममधली सगळीच गाणी, ‘तनहाई’ (दिल चाहता है), ‘दिल.. दीवाना’ (परदेस), ‘एकला चलो रे’ (बोस), ‘अजनबी शहर है’ (जान-ए-मन), ‘दो कदम और सही’ (मीनाक्षी) आणि अर्थातच ‘अभी मुझमे कही’. ‘क्लासकली माइल्ड’ हा पूर्ण अल्बमही असाच तयारीचा. विशेषत: ‘छलकी छलकी चांदनी में’, ‘सुना सुना’ आणि ‘सुरतिया मतवारी’ हा अल्बम अद्भुत आहे. सोनू सरांचा गळा कुठे कुठे पोहोचू शकतो, कसा कसा वळणे घेऊ शकतो आणि हे करताना भाव पोहोचवण्याचे कामही चालूच ठेवतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अल्बम. हा अल्बम नुसता ऐकणे हाच एक रियाजाचा भाग आहे! जसे उस्तादजी गात असतात आणि शागीर्द समोर किंवा मागे बसून ऐकत असतात, तशातलाच हा प्रकार आहे. गुरुजींना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
हे ऐकाच.. : क्लासिकली माइल्ड, द म्युझिक रूम
‘क्लासिकली माइल्ड’मध्ये सोनूने ज्या पद्धतीने स्वत:ला आवडेल ते गायले आहे, तसेच त्याने बिक्रम घोष या तबलावादक आणि ताल-संयोजक कलाकाराबरोबर ‘द म्युझिक रूम’ या अल्बममध्ये केले आहे. यातल्या काही गाण्यांमध्ये सोनूने नेहमीपेक्षा वेगळ्या ढंगाची गायकी वापरली आहे. गाण्यांचे संगीत संयोजनसुद्धा हटके अशा टेक्नो पद्धतीचे आहे. गाणी classically mild एवढी भारी नसली, तरी ती ‘अलग’ नक्की आहेत. स्वैर, अतरंगी सोनू निगम ऐकायचा असेल तर हा अल्बम चुकवू नये असाच आहे.
जसराज जोशी