विनय जोशी

दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर हा आठवडा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याच्या थीमला अनुसरून जगभर व्याख्याने, प्रदर्शन, स्पर्धा असे विविध उपक्रम होतात. या वर्षी ‘अंतराळ आणि उद्योजकता’ हा अंतराळ सप्ताहाचा विषय आहे. 

investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

जागतिक अंतराळ सप्ताह २०२३ च्या शुभेच्छा! दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान साजरा होणारा जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week) म्हणजे खगोलशास्त्राची पर्वणी. जागतिक स्तरावर साजरा होणारा हा सगळय़ात मोठा खगोलीय कार्यक्रम आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. जगभरातल्या अनेक देशातील अवकाश संशोधन संस्था, खगोलीय संस्था, हौशी मंडळे, शाळा, महाविद्यालये यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीच्या यशानिमित्त  अंतराळ सप्ताह साजरा करण्यासाठी १९८० साली ‘जागतिक अंतराळ सप्ताह संस्था’ (World Space Week Association- WSWA)  स्थापन झाली. जुलै १९८० मध्ये पहिला असा सप्ताह अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे साजरा झाला. १९९९ पर्यंत १५ देशांत या कल्पनेचा प्रसार झाला. ६ डिसेंबर १९९९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत असा एक सप्ताह जागतिक स्तरावर साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार २००० पासून ४ ते १० ऑक्टोबर हा आठवडा अंतराळ सप्ताह म्हणून साजरा होतो आहे.

या दोन तारखांचेदेखील विशेष महत्त्व आहे. शीतयुद्धात ४ ऑक्टोबर १९५७ ला सोव्हिएत रशियाने स्पुटनिक नावाचा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडून अंतराळप्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे अनेक अंतराळ मोहिमांतून जणू स्पेसवॉर सुरू झाले. यातून अंतराळ प्रदूषण, अंतराळ युद्ध, अंतराळातील संसाधनांवर मालकी हक्काची चढाओढ असे प्रश्न उभे राहण्याची शक्यता तयार झाली. या सगळय़ा पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर यासंबंधी नियम असण्याची गरज जाणवू लागली. परिणामी १० ऑक्टोबर १९६७ रोजी बाह्य अंतराळ-तह (Outer Space Treaty) अमलात आला. अशा अनेक अंतराळ कायद्यांतून अंतराळावर सगळय़ा मानवांचा  समान अधिकार असून त्याचा संशोधन आणि शांततापूर्ण कार्यासाठीच उपयोग व्हावा यावर सगळय़ा राष्ट्रांचे एकमत झाले. ४ ऑक्टोबर १९५७ ला अंतराळात मानवाच्या हस्तक्षेपाची सुरुवात होऊन अंतराळाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली, तर १० ऑक्टोबर १९६७ ला अंतराळ कायद्याची मुहूर्तमेढ रोवली जाऊन माणसाला आपल्या जबाबदारीचे भान आले. या दोन घटनांच्या स्मरणार्थ ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान साजरा होणारा हा जागतिक अंतराळ सप्ताह आपल्याला अंतराळाविषयी आपल्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो.

जागतिक अंतराळ सप्ताह संस्थेकडून अंतराळ सप्ताहाचे आयोजन केले जाते. यासाठी संस्थेकडून दरवर्षी एक नवीन थीम घोषित केली जाते. या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून जगभर व्याख्याने, प्रदर्शन, स्पर्धा असे विविध उपक्रम होतात. २००० साली पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजऱ्या झालेल्या या सप्ताहाचा विषय होता ‘अंतराळ सहस्रकाचा आरंभ’. आदिम काळापासूनच अंतराळ हे मानवाच्या भावविश्वाचा एक भाग राहिले आहे. काव्य, साहित्य, चित्रकला, संगीत, धर्म यात अंतराळातून मिळालेल्या प्रेरणा यांचा आढावा घेण्यासाठी २००१ सालचा विषय होता ‘अंतराळातून प्रेरणा’. मानवाने पहिला उपग्रह अवकाशात पाठवल्याच्या घटनेला २००७ साली ५० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्या वर्षीचा विषय होता ‘अंतराळातील ५० वर्षे’. २००९ साली  ‘शिक्षणासाठी अंतराळ’ या विषयातून विज्ञान, तंत्रज्ञान, गणित शिकवताना अंतराळातील काही संकल्पनांचा वापर कसा करता येईल याचा ऊहापोह झाला. २०१२ हे वर्ष ‘मानवाच्या बचाव आणि संरक्षणासाठी अंतराळ’ या विषयाला समर्पित होते. विविध उपग्रह आणि उपकरणांतून आपली संचरण प्रणाली (navigation system) अधिक अचूक झाली आहे. यावर प्रकाश टाकणारा  ‘पथदर्शक अंतराळ’ हा २०१४ या वर्षीचा विषय होता. जगाला एकत्र आणणारे अंतराळ हा २०१८ वर्षीचा विषय होता. २०२१ या वर्षांसाठीचा विषय अंतराळातील महिलांच्या सहभागाला समर्पित होता, तर मागच्या वर्षीचा विषय होता ‘अंतराळ आणि शाश्वतता’.

‘अंतराळ आणि उद्योजकता’ (Space and Entrepreneurship) हा २०२३ साठी अंतराळ सप्ताहाचा विषय आहे. सुरुवातीपासून अंतराळ संशोधन क्षेत्र नासा, रॉसकॉसमॉस, इसा, इस्रो अशा सरकारी संस्थांची मक्तेदारी होती. या क्षेत्रातील प्रचंड खर्च आणि तांत्रिक आव्हानांमुळे खासगी उद्योजकदेखील यात गुंतवणूक करायला फारसे उत्सुक नव्हते; पण नंतर परिस्थिती बदलत गेली. अंतराळ मोहिमांविषयीचा सुरुवातीचा जाज्वल्य राष्ट्राभिमान मागे पडत मानवजातीच्या विकासासाठी अंतराळ संशोधन असा व्यापक दृष्टिकोन रुजू लागला. नव्या व्यावसायिक संधींमुळे खासगी उद्योजक या क्षेत्राकडे वळू लागले. त्यांच्या भागीदारीतून कमी खर्चात आणि उच्च गुणवत्तेसह अंतराळ  मोहिमा राबवता येऊ शकतात हे लक्षात आल्याने सरकारी संस्थांनीदेखील आपली दारे उघडली. खासगी कंपन्या आणि सरकारी संस्था यांच्या सहकार्याचे नवे युग सुरू झाले. भारताच्या चांद्रयान मोहिमेत गोदरेज एरोस्पेस, एल अँड टी, वालचंदनगर इंडस्ट्रीज यांचा मोठा वाटा होता. अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी स्पेसएक्स, बोइंगसारख्या कंपन्यांशी नासाची  भागीदारी हे याचे अलीकडच्या काळातील मोठे उदाहरण म्हणावे लागेल.

अंतराळ क्षेत्रातील उद्योजकतेचा पाया ६० च्या दशकात घातला गेला. ह्युजेस एअरक्राफ्ट, लॉकहीड मार्टिन, बोइंगसारख्या कंपन्यांनी संप्रेषण आणि हवामान उपग्रह तयार करण्यास सुरुवात केली. २००२  मध्ये एलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या स्पेसएक्ससारख्या खासगी कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत प्रक्षेपण खर्च कमी करून दाखवला. नफा कमावणे इतकाच अंतराळ उद्योजकतेचा उद्देश नाही. एलॉन मस्क (स्पेसएक्स), जेफ बेझोस (ब्लू ओरिजिन), रिचर्ड ब्रॅन्सन (व्हर्जिन गॅलेक्टिक) यांसारख्या द्रष्टय़ा व्यावसायिकांनी या क्षेत्राला नवे व्हिजन दिले आहे. सर्वसामान्यांसाठी अंतराळ पर्यटन हे स्वप्न यांनी सत्यात उतरवले आहे. गेल्या काही वर्षांपासून खासगी उद्योजकतेच्या सहभागाची  व्याप्ती आणि गरज दिवसेंदिवस व्यापक होत चालली आहे. उपग्रह आणि क्षेपणयान निर्मिती, प्रक्षेपण सेवा, अंतराळ पर्यटन, लघुग्रह खाणकाम, अंतराळ कचऱ्याची स्वच्छता, अंतराळयानांची निर्मिती, संशोधन अशा अनेक बाबतीत मोठय़ा प्रमाणात खासगी कंपन्या सेवा देत आहेत. संदेशवहन, संचरण प्रणाली अशा कार्यासाठी उपग्रहांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. क्यूबसॅट्ससारख्या लहान उपग्रहांपासून तर संचार उपग्रहांपर्यंत उपग्रह जेएससी इन्फॉर्मेशन सॅटेलाइट सिस्टम्स, नॉर्थरोप ग्रॅमन, मॅक्सर स्पेस अशा कंपन्यांकडून  बनवले जातात. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून आयएसएसवर अंतराळवीर आणि सामानाची ने-आण केली जाते. व्हर्जिन गॅलेक्टिक आणि ब्लू ओरिजिनसारख्या कंपन्या अंतराळाचा अनुभव घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांना सबर्बिटल स्पेसफ्लाइट्समधून अंतराळात नेऊन आणतात. कर्मन, ट्रान्सएस्ट्रा, अ‍ॅस्ट्रोफोर्ज यांसारख्या कंपन्या लघुग्रहांवरून मौल्यवान धातू, दुर्मीळ खनिजे यांसारख्या संसाधनांसाठी अ‍ॅस्ट्रोइड माइिनगमध्ये कार्यरत आहेत.

भारतीय अंतराळ क्षेत्रातील खासगी क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी  भारत सरकारनेही पुढाकार घेतला आहे. या उद्देशाने न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ((NSIL) ही  इस्रोची व्यावसायिक शाखा २०१९ मध्ये स्थापन झाली. स्वदेशी उद्योगांना अंतराळ क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्याकडून  उत्पादने आणि इतर  सेवांचे उत्पादन करून घेणे ही उद्दिष्टे यामागे आहेत. यासाठी इस्रो आपल्या पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शनदेखील देणार आहे. २०२० मध्ये स्थापन  IN- SPACe ही स्वायत्त सरकारी संस्था इस्रो आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात दुवा म्हणून कार्य करते.

भारताच्या ‘इंडियन स्पेस पॉलिसी २०२३’मधून हा उद्देश ठळकपणे अधोरेखित झाला आहे. यातून स्वदेशी बनावटीचे उपग्रह, पीएसएलव्ही, एसएसएलव्ही अशा क्षेपणयानांसारखी उत्पादने देशातच मोठय़ा प्रमाणात बनतील. उपग्रहांचे प्रक्षेपण, ट्रान्सपॉन्डर लीजिंग, रिमोट सेन्सिंग, मिशन सपोर्ट यांसारख्या स्पेस-सव्‍‌र्हिसेसदेखील खासगी क्षेत्राकडून पुरवल्या जातील. जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा सध्या २ टक्क्यांपेक्षा कमी असून या नव्या अंतराळ धोरणामुळे भविष्यात तो १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला संशोधन आणि अन्वेषण या उद्देशांपुरत्या मर्यादित असणाऱ्या अंतराळ मोहिमांना उद्योजकांच्या सहभागातून व्यावसायिक दृष्टिकोन मिळाला आहे. सुट्टय़ांमधील अंतराळ सहल किंवा अगदी स्पेस हॉटेल्स अशा कविकल्पना वाटणाऱ्या गोष्टी नजीकच्या काळात  शक्य होताना दिसणार आहेत. अंतराळ क्षेत्रातील खासगी उद्योजकांच्या  वाढत्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. यातून नव्या संकल्पना, नवा दृष्टिकोन असणारे स्पेस आंत्रप्रेनर घडावेत याच अंतराळ सप्ताहानिमित्त सदिच्छा!

viva@expressindia.com

Story img Loader