जगात इतक्या घडामोडी होतायत. सगळ्याच बाबतीत सगळ्यांच्या आधी अपडेट होता येईल? माझं नाव अबदुल नाही. मैं सबकी खबर नहीं रख सकती. असं म्हणायला पाहिजे!
हल्ली मला फार दबून गेल्यासारखं वाटतं. दिवस इतके भराभर उडून जातायत प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक आठवडय़ाचं- अगदी महिन्याचं वेळापत्रक पाहिलं तर गच्च भरलेलं असतं. एखादा रविवार मोकळा मिळतोय असं वाटेपर्यंत चार कामं आठवतात. एखादी र्अजट मीटिंग येते, सोसायटीचं काम निघतं, घरातली मिक्सर किंवा फ्रीजसारखी निकडीची गोष्ट बिघडते, लगेच दुरुस्तीला पळावं लागतं. नातेवाईकांकडे कार्यक्रम असतो, नेमकं लोकलच्या ओव्हरहेड वायरचं त्या दिवशी काम असतं. गाडीनं जावं म्हटलं तर अर्थातच ड्रायव्हरना सुट्टी असते. आपणच सीट बेल्ट बांधत आपली गाडी हाकायला घेतो. तेव्हाच आपल्याला काही महत्त्वाचे फोन येतात, ते मिस्स होतात मग कार्यक्रम संपवून घरी आल्यावर कॉलबॅक करणे, पुढच्या आठवडय़ातले बदल जुळवून घेणे- यात बघता बघता रात्रच होते आणि कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकतोय असं होऊन जातं.
एका अर्थानं चांगलंच आहे म्हणा. डोकं सतत कार्यरत ऊर्फ अ‍ॅक्टिव्ह राहतं. उगीच नसते विचार डोक्यात थैमान घालत नाहीत. माझी आई एक कानडी म्हण म्हणते- ‘उद्योग इल्ल बडग्या’- म्हणजे ‘रिकामा न्हावी भिंतीला तुंबडय़ा लावी-’ अशी अवस्था आपल्या आसपास फिरकतही नाही. पण हे समाधान असलं तरी सारखं काहीतरी राहून गेल्याची खंत जीवाला डाचत राहते. खूप मागे पडलोय आपण असं वाटत राहतं. रात्री झोपताना मन निवांत असतं. पण सकाळी आंघोळ झाली रे झाली किंवा बाहेर पडताना चपला घातल्या, की अचानक तो सगळा जडशीळ बॅकलॉग आपला ताबा घेतो- आणि सुरू होते एक जीवघेणी घालमेल.
माझ्या एका मित्राचा मला तिसऱ्यांदा फोन आला, ‘‘अगं पाहिलास की नाही लाइफ ऑफ पाय अजून?’’ हा सिनेमा रिलिज झाला त्या दरम्यान मी मुंबईत नव्हते. पुढे त्याला ऑस्कर मिळालं तोपर्यंत तो थिएटर्समधून गेला होता. एकतर तो सिनेमा थ्रीडी. मग तो डीव्हीडीवर बघण्यात काय मजा? सगळे इफेक्ट वगैरे केरातच जाणार ना. तरी बघायला पाहिजे बघायला पाहिजे या अनिवार इच्छेनी- बाजारात आल्या आल्या घेतली एक डीव्हीडी, पण अति उत्साहात न बघता घेताना कळलंच नाही की ती ‘ब्लू रे’ टेकनिकची आहे. आता आली का पंचाईत! मग नंतर पुढच्या आठवडय़ात माझा नवरा अगदी आठवणीनी- खास माझ्यासाठी ‘लाइफ ऑफ पाय’ची साधी डीव्हीडी घेऊन आला- आणि अखेर अगदी आता आता पाहिली मी ती फिल्म. कशी वाटली, किती आवडली ते सांगायलाच नको!
पण फिल्म बघेपर्यंत मधल्या काळात मला वेगवेगळ्या जाचातून जावं लागलं. जी माणसं आपल्या आधी तो सिनेमा किंवा नाटक बघतात त्यांना नवं पाहिलेलं हिरिरीनं डिस्कस करायचं असतं. अशा गप्पांमध्ये ‘थांबा थांबा मी पाहिलेलं नाहीए, माझ्यासमोर बोलू नका,’ असा आग्रह धरला तरी तो नेहमीच यशस्वी होतो असं नाही. नेमका एखादा महत्त्वाचा इफेक्टच फोडून टाकला जातो. त्यांचंही बरोबर आहे. सहा सहा महिने आपली चर्चा करण्याची उबळ कशी काय दाबून ठेवायची? त्यामुळे वेळच्या वेळी ती कलाकृती न बघणारा माणूस नुकसान खात्यातच राहतो आणि वाईट वाटून घेण्याला सीमाच राहत नाही.
पण एकुणात मी जरा विचारात पडले आहे. जरा जास्तच निर्मिती होतीए का नाटक सिनेमांची? तीन तीन पानं भरून जाहिराती ओसंडून चालल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि इतर भाषांमधली सगळी नाटकं- सिनेमे पाहायचे म्हटले तर एक नाटय़-चित्र महोत्सव आयोजित करायला पाहिजे स्वत:साठी? आपलं कौटुंबिक जीवन आणि व्यवसाय यातली व्यवधानं सांभाळून वेळ कसा काढायचा? कसा वापरायचा, पुरवायचा? अशा विचारमंथनानंतर मला एकदम पुरात वाहून चालल्यासारखं वाटतं. म्हणून ना अशा वेळेला मी एखाद्या छानशा आवडत्या पुस्तकाचं बोट धरते. पुस्तकांमध्ये ठहराव असतो. वाचून घे चटाचट येत्या पंधरवडय़ात नाहीतर गेली तुझी संधी- अशी धमकी नसते. किती आश्वासक असतात नाही पुस्तकं! दोलायमान मनाला सावरतात. मग ना अपराधी नाही वाटत. झोपताना एखाद्या आवडलेल्या नाटक-सिनेमातल्या ‘चांगल्याला’ आठवत, रसास्वाद घेत. नि:शंक मनानं झोपी जाता येतं. नको बाबा ससा. दमछाक होते. मान्यच करावं की मी कासव आहे.

Story img Loader