जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची. देहू-आळंदीपासून शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांची चित्रं मीडियामधून आपल्यासमोर येत असतात. हातात भगवी पताका घेऊन, गळ्यात तुळशीमाळ घालून विठ्ठलनामाच्या गजरात तल्लीन झालेला वारकरी अगदी आनंदात आषाढसरी अंगावर घेत चालत असतो. वारी आणि तरुणाई याचा संबंध असा फक्त टीव्हीवरच्या बातम्यांमधून, पेपरमधल्या फोटोंमधूनच येतो हा सर्वसाधारण समज. आजचा तरुण वारीत सहभागी होतो का? झालाच तर काय भावनेनं? मेट्रोपॉलिटन तरुणाईचा वारी एक्सपीरियन्स त्यांच्याच शब्दांत.
सुमीत झारकर, एमसीए
पालखी पुण्यात येते त्या दिवशी पालखी बघायला मी अनेकदा गेलो होतो. आम्हा मित्रांच्यात वारीबद्दल गप्पाही व्हायच्या. मात्र वारीनिमित्त होणारी गर्दी, ट्रॅफिक डायव्हर्जन, रस्ते बंद अशा गोष्टींबाबतच जास्त बोललं जायचं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच फोटोग्राफीचा छंद लागला. मग कॅमेरा घेऊन आम्ही काही मित्र हडपसरला जायचो. तिथून वारीतल्या दिंडीचे अफलातून फोटो मिळायचे, पण तेव्हाही लक्ष वेगळ्या अँगलकडे, कॉम्पोझिशनकडे आणि फोटोग्राफिक स्किल्स तपासण्याकडेच जास्त असायचं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट ओलांडून जाते तेव्हा तर हा पालखी सोहळा अवर्णनीय दिसतो. गेल्या वर्षी मी पालखीचा फोटो काढायला पार सासवडपर्यंत गेलो होतो.
विठ्ठलाचं नाव घेत मैलोन्मैल न थकता चालण्याचं बळ या वारकऱ्यांकडे कुठून येतं? ते ज्या उत्साहात रिंगण घालतात, टाळ-मृदुंगाच्या साथीत अभंग आळवतात, त्या ठेक्यावर अक्षरश: नाचतात. कुठून येते त्यांच्यामध्ये ही एनर्जी? असे प्रश्न मला नेहमी पडायचे. आपणही एकदा या वारीत सहभागी व्हायला पाहिजे, असं वाटायचं. बघूया तर जमतंय का आपल्याला या गर्दीचा भाग होणं, हा विचार मनात यायचा.
सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून कामाला सुरुवात केली तशी वारीतलं हे स्पिरिट शोधण्याची आणखी आस लागली. यंदा किमान थोडं अंतर तरी चालायचंच असं ठरवून पहिल्या दिवशी पालखीबरोबर चालायचं ठरवलं.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान ठेवते तिथपासून पुण्यापर्यंत वारीबरोबर चालत यायचं ठरलं. बरोबर तीन-चार ओळखीचेही होते. आम्ही सगळे जण पहिल्यांदाच वारीत चालण्याचा अनुभव घेणार होतो. सगळा प्लॅन ठरला. ऑफिसमध्ये मित्रांबरोबर गप्पा मारताना हे सांगितलं, तर बहुतेक जण आश्चर्यचकित. तू वारीला जाणार? कशासाठी? अख्खा दिवस त्या गर्दीतून चालणार? वारकरी लोकांबरोबर चालत जाणार? असे अनेक प्रश्न समोर आले. मला त्या गर्दीतला एक होऊन जायचंय, कुठल्या आवेशानं आणि कुठल्या स्पिरिटनं हे सगळे वारकरी भारावून जातात, ते पाहायचंय. माझं उत्तर ठरलं होतं, पण तरीही मी खरंच जातोय, ऑफिसमधून रजा घेऊन अख्खा दिवस वारीत चालतोय, यावर तिथे काय रिअॅक्शन असेल अंदाज नव्हता. म्हणून अगदी आयत्या वेळी फोन करून आज ऑफिसला येणार नाही, असं सांगितलं.
माझ्या कॅमेऱ्यासकट वारीमध्ये सहभागी झालो. वारीचा एक दिवसाचा अनुभव खरोखर अवर्णनीय होता. त्या मेळ्यासोबत चालण्याचा अनुभव खरंच वेगळा होता. म्हणजे नॉर्मल माणसासाठी ते चालणं अमुक एक किलोमीटर किंवा आळंदीपासून पंढरपूपर्यंत वगैरे काहीही असेल. नॉर्मल माणूस म्हणून विचार केला, तर एका दिवसात एवढं चालणं कठीण असेलही, पण एकदा का तुम्ही वारकरी म्हणून त्या वैष्णवांच्या मेळ्यात सामील झालात, की तुम्ही नॉर्मल माणूस राहातच नाही. काळ, काम, वेगाची गणितं डोक्यातून जातात. विठ्ठलाचा ध्यास घेतलेल्या शिस्तबद्ध वारीचा तुम्ही एक छोटासा भाग होता. दिंडीतले रंग, भाव.. तो टाळ-मृदुंगांचा नाद, ठेक्यात पडणारी पावलं तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं.
या विठुनामाच्या गजरात पुणं कधी आलं कळलंच नाही. भानावर आलो तेव्हा मग किती तास चालत होतो वगैरे हिशोब केले, पण तो अनुभव खरोखर वारंवार घेण्यासारखा होता. पुढे दोन दिवस माझ्या कानातला तो टाळ-मृदुंगाचा नाद तसाच झंकारत राहिला होता. आता पुढच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर हे पूर्ण अंतर पायी चालायचं हे आत्ताच ठरलंय. हा स्पिरिच्युअल अनुभव घेण्यासाठी माझी काही मित्रमंडळीही तयार झालीत. आतापासूनच आमचा पुढच्या वर्षीचा प्लॅन ठरतोय. ग्यानोबा- माउली- तुकारामचा जयघोष मनातल्या मनात सुरूच आहे.
मधुरा गोधमगावकर
मी लहानपणापासून वारीबद्दल ऐकत होते. आषाढी वारी शहरात आली की, आता एकादशी जवळ आलीय.. म्हणजे उपास.. म्हणजे छान वेगळे पदार्थ.. एकादशी दुप्पट खाशी वगैरे विचारच मनात यायचे.
मी एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करते. मागच्या आठवडय़ात सहजच आमच्या डिरेक्टरनी कॅज्युअली बोलताना सांगितलं की, ते गेली सात र्वष आळंदी ते पुणे हे अंतर वारीबरोबर चालतात. मला खरोखर आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही. एकदा वारीमध्ये चालून बघायला पाहिजे, असं वाटलं.
आयटी दिंडीविषयी माहिती मिळाली आणि त्यात सहभागी व्हायचं ठरवलं. पहाटे चार वाजता सगळी तयारी करून बाहेर पडले. आम्ही बाणेरला राहतो. तिथून आळंदीपर्यंत जाणारी गाडी नेमकी चुकली, पण तरीही एका एअरपोर्ट पिकअपसाठी जाणाऱ्या गाडीनं आम्हाला तारलं आणि आम्ही आळंदीला पोचलो. िदडी जिथून निघते तिथपासूनच वातावरण भारलेलं होतं.
दिंडीसमोर रिंगण, फुगडय़ा घालणं सुरू होतं. त्यांचा उत्साह बघून आम्हालाही स्फुरण चढलं. एकदा चालायला सुरुवात झाली आणि मन खरोखर त्या दिंडीत विठ्ठलमय झालं. तेव्हा कशाचीच चिंता राहिली नाही. ऑफिस, घर सगळं काही काळासाठी विसरायला झालं. मी एक वारकरी आहे, एवढीच भावना उरली.
त्या चालण्याचा शारीरिक स्ट्रेस जाणवला नाहीच, नव्हे तर मानसिक स्ट्रेसही विसरला गेला. हा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा असा आहे. दरवर्षी या दिंडीत सहभागी व्हायचं हा संकल्प करूनच आम्ही थांबलो.