फुरसत मिले तो इनके चरणों में आकर बैठो
क्योंकि यही हमारी सभी
उलझनो के जवाब हैं..
स्पॉटिफायवर प्रसारित होणाऱ्या ‘शिवा’ या पॉडकास्टमध्ये आर. जे. जॅकी श्रॉफ दर प्रत्येक भागात महादेवाच्या वेगवेगळय़ा कथा सांगतो. ‘शिवा’ या पॉडकास्टच्या ‘उमीद’ या भागात क्रिश या लहान मुलाची कथा सांगितली आहे. एक लहान मुलगा सतत आजारी असतो. अचानक त्याच्या घरी एका रात्री एक माणूस येतो. ज्याला रात्रीसाठी आसरा हवा असतो. क्रिशचे आईबाबा त्याला त्याच्या घरी थांबवतात. बोलता बोलता क्रिशचे बाबा त्या गृहस्थाला क्रिश सतत आजारी असल्याचे सांगतात, तेव्हा तो त्यांना ‘फुरसत मिले तो इनके चरणों में आकर बैठो.. क्योंकि यही हमारी सभी उलझनो के जवाब है’ असं त्यांना ऐकवतो आणि एका माणसाचा नंबर देऊन निघून जातो. निघताना क्रिशचे बाबा त्याला त्याचं नाव विचारतात तेव्हा तो शिव असं सांगून निघून जातो.
मध्यंतरीच्या काळात एकूणच महादेवाबद्दल तरुणांमध्ये खूप आकर्षण निर्माण झालेलं दिसून येतं. माझे अनेक मित्र केदारनाथ आणि बद्रीनाथला याच क्रेझमुळे गेले आहेत. पण मुळात यासाठी एवढय़ा लांब जायची कधी गरज नसते. तुम्ही जिथे आहात तिथून देवाला मनापासून हात जोडले की तुमचा नमस्कार पोहोचतो. या पॉडकास्टमध्ये देखील हाच संदेश आणि काही अशा आशयाच्या सुंदर कथा सांगितल्या जातात ज्यातून आयुष्याचं सार समजतं. म्हणूनच मला हा पॉडकास्ट ऐकावासा वाटतो.
सारंग शिंदे ( विद्यार्थी )
शब्दांकन: श्रुती कदम