गायत्री हसबनीस
सतत बदलणाऱ्या म तितकाच परिणाम होत असतो. ‘चक्क डोळय़ांसमोर ऋतू कूस बदलून घेतो..’ या कवी सौमित्र यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे फॅशनही डोळय़ादेखत अगदी क्षणात बदलताना दिसते. सध्या डोक्यावर तळपणाऱ्या सूर्यामुळे आणि अंगातील घामाच्या चिकचिकाटामुळे कपडय़ांमध्ये भलताच सुटसुटीतपणा अनुभवायला मिळतो आहे. अगदी जिमवेअर किंवा स्पोर्ट्स वेअर घालून पिकनिकपासून ऑफिसपर्यंत सराईतपणे वावरणारी तरुणाई आजूबाजूला दिसू लागली आहे. समर फॅशनची समीकरणं अंतर्बाह्य बदलली आहेत याचा हा भक्कम पुरावा म्हणता येईल..
‘समर फॅशन कलेक्शन’ या नावाने उघडलेल्या फॅशनच्या पेटाऱ्यात सध्या अगदी साधे पायजम्यासारखे उन्हाळय़ात घरातल्या घरात घालण्याचे प्रकार आऊटिंगसाठी वापरले जात आहेत. पार्टी किंवा अगदी कॉर्पोरेट लुकसाठीही स्पोर्ट्स किंवा जिम वेअरसारखे शॉर्ट आणि टाइट कपडे परिधान करणं ही नवी फॅशन रुजते आहे. मेन्स वेअरमध्येही रोजच्या वापरात लुंगी, धोती किंवा हॅरम पॅन्ट घालणं तसेच उन्हाळय़ातील लग्नसराईतही मुलींनी डिझायनर केप्री किंवा तत्सम गार्मेट्स घालणं असे एक ना अनेक फॅशनेबल बदल सध्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत.
मोठमोठय़ा फॅशन शोच्या रॅम्पवरून आलेले यंदाचे कपडे काही फॅशन जाणकारांच्या मते अत्यंत कम्फर्टेबल होते. एकीकडे सुट्टीचा माहौल आणि दुसरीकडे लग्नसोहळय़ांची धामधूम. या दोन्ही गोष्टी लक्षात घेत यंदा फॅशन कलेक्शन सादर झाले आहेत. मात्र रुटीन वेअरसाठीही अत्यंत फॅशनेबल कपडे असावेत, ही तरुणाईची गरज आहे. त्यामुळे क्लासी, कम्फर्टेबल, कूल असे ‘क’च्या बाराखडीतले कपडे या वेळी परिधान केले जातील. कफ्तान, जम्पसूट हे प्रकार यंदाही कायम आहेत. ‘को-ऑर्ड’ या पायजम्यातीलच एका प्रकाराची सध्या चर्चा आहे. फ्लोरल प्रिंटमध्येही त्रिकोणमिती किंवा त्रिमितीच्या तंत्राने केलेले पिसांचे डिझाईन, वेलींचे डिझाईन तसेच फांद्यांची नक्षी अशा काही वेगळय़ा कल्पना कपडय़ांवर चितारलेल्या दिसणार आहेत.
हेअरस्टाइलपासून ते अगदी पायातील चपलांपर्यंत या वर्षी पर्सनलाइज्ड फॅशनवर भर आहे. फॅब्रिकमध्येही कॉटन, सॅटिन, जॉर्जेट असे प्रकार आहेतच. यंदा ॲक्सेसरीजमध्ये पारंपरिक दागिन्यांना महत्त्व आहे. मोठय़ा आकाराचे दागिने हा त्यातला एक भाग, तर दुसरा म्हणजे खूप गोल्डन ज्वेलरी तसेच काही वेस्टर्न स्टाईलचे कानातलेही ट्रेण्डमध्ये आहेत. उदाहरणार्थ – मेटॅलिक, बोहेमियन आणि गॉथिक ज्वेलरी. चपलांमध्ये हिल्सपेक्षा शूज, सॅन्डल आणि स्लिपरवर जास्त भर असणार आहे.
‘पॅन्ट, टॉप आणि जॅकेट’ – हे त्रिकूट यंदाही सर्रास पाहायला मिळणार आहे. लोकांना डेनिमचा अजूनही कंटाळा येत नाही, त्यामुळे यंदा पहिल्यांदा मेन्स वेअरमध्ये इंडिगो डेनिमची चलती पाहायला मिळेल. सध्या तरी जम्पसूट, हॅरम, शॉर्ट, ट्राऊझर्स, कॅप्री, धोती पॅन्ट असे युनिसेक्स प्रकार चर्चेत आहे. समर सीझनसाठी नेहमीच्याच स्टाइलचे हातमाग, खादीचे तसेच यंदा वेल्वेटचे जॅकेट्स आले आहेत. यात फ्लोरलसह मल्टिकलर आणि काळय़ा रंगांच्या जॅकेट्सचा समावेश आहे. टॉप्समध्ये पेप्लम, पफ स्लीव्ह असे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत त्यातही पॅचवर्क डिझाईन्सवरचा जोर कायम राहणार आहे.
को-ऑर्ड सेटचे नावीन्य –मागल्या वर्षी या प्रकाराच्या फॅशनची चर्चा होती, पण वापरात फारसे नव्हते. करीना कपूर, सोनम कपूर आदी सेलिब्रिटींनी को-ऑर्ड फॅशनची सुरुवात केल्याने हळूहळू सामान्यांपर्यंतही ही क्रेझ वाढू लागली. गेल्या वर्षी पाश्चात्त्य देशात स्ट्रीट फॅशन म्हणून पायजम्याच्या लुकवर कॅनव्हास किंवा स्निकर्सचे शूज घालण्याचा फंडा समर सीझनमध्ये रुजला होता. यंदा या प्रकाराची आपल्याकडे नक्कल झाली आहे. काहीसा हाच प्रकार लोकांनी येथे वापरायला सुरुवात केली आहे. ही स्टाइल फार कम्फर्टेबल आहे, कारण यामध्ये ग्राहकांना पर्याय आहेत. उदाहरणार्थ- शॉर्ट्स आणि शर्ट, पायजमा आणि लॉन्ग शर्ट, लॉन्ग पॅन्ट आणि टी-शर्ट. थोडक्यात असे काहीसे प्रयोग या प्रकारात केले असल्याने हे कुठेही कधीही वापरण्यासाठी योग्य ठरतात, अगदी कॉर्पोरेट मीटिंगसाठीही.. आजकाल हायब्रिड मोडने कामकाज चालू असल्याने बऱ्याचशा कॉर्पोरेट बैठका या रिसॉर्ट्सवरही होत आहेत. त्यातून वर्केशनसारख्या प्रकारामुळेही अनेकांना आपल्या पद्धतीने फॅशन करायला वाव मिळतो आहे. या प्रकारात जास्त करून क्वर्कीनेस दिसेल, त्यामुळे या ड्रेसवरील प्रिंटही मोनोक्रोमॅटिक, जॉमेट्रिकल अशा असतात, ज्यात गडद रंगाचा वापर जास्त केलेला आढळतो. यावर उठावदार ज्वेलरीही पेअर करता येते. शक्यतो को-ऑर्ड सेटवर हिल्स टाळा, त्याऐवजी सॅन्डल्स किंवा शूज घाला. या सेट्सची किंमत ही जम्पसूटसारखी असून ऑनलाइन साइट्सवर यांची गर्दी हमखास पाहायला मिळेल.
काळा महिमा
एरवी काळय़ा रंगांचे कपडे हे चांगलेच देखणे वाटतात. मुलींचा तर हल्ली तो आवडीचा रंग झाला आहे. तरी उन्हाळय़ात काळा फारसा वापरला जात नाही, परंतु यंदा या रंगाला समर सीझनमध्ये एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. फॅब्रिक आणि डिझायिनगच्या मदतीने काळाही आवडीने घातला जाईल, अशी कल्पकता फॅशन डिझायनर्सनी दाखवली आहे. गाऊन्स, वनपीस, लेहेंगा – टॉप्सची रचना अशा पद्धतीने केली आहे जी वाखाणण्याजोगी आहे. मनीष मल्होत्रा, अमित अग्रवालसारख्या डिझायनर्सनी लाल, काळा, गोल्डन, सिल्वरसारखे डार्क रंग समर सीझनमध्ये आणून सगळय़ांनाच आश्चर्यचा धक्का दिला आहे. एकीकडे काळा रंग जरी रॅम्पवर उतरला असला तरी क्रीम कलर आणि लिंबू कलरची चलतीही तेवढीच आहे.
viva@expressindia.com