सेंट झेविअर्स कॉलेजचा ‘मल्हार’ हा मुंबईतल्या सर्वात मोठय़ा कॉलेज फेस्टपैकी एक. यंदाच्या ‘मल्हार’चं वैशिष्टय़ म्हणजे या उत्सवाची सगळी धुरा आहे चार मुलींच्या खांद्यावर. राज्यभरातून येणाऱ्या ३० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असणारा हा उत्सव यंदा या चौघींच्या समर्थ खांद्यावर आहे.
मुंबईच्या महाविद्यालयीन विश्वात आता कॉलेज फेस्टचे वारे वाहू लागतील. कॉलेज सुरू होऊन अगदी काही दिवस झाले असले तरी कॉलेज फेस्टची चर्चा मात्र सुरू झाली आहे. राज्यभरात सगळीकडेच हल्ली छोटय़ा-मोठय़ा स्केलवर कॉलेज फेस्ट होत असतात. मुंबईच्या कॉलेज फेस्टचं मात्र अनेकांना आकर्षण असतं. नुकताच हेरिटेज दर्जा मिळालेल्या मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजचा मल्हारनं फेस्ट सीझनची सुरुवात होते. यंदा १५, १६ आणि १७ ऑगस्टला होणाऱ्या ‘मल्हार’ची थीम अक्रॉनिकल अशी आहे. एखादय़ा बातमीमागे लपलेल्या किंवा कधीही उजेडात येऊ न शकणाऱ्या गोष्टींना इथे एक एक व्यासपीठ मिळणार आहे. यंदाच्या मल्हारचं आणखी एक मोठं वैशिष्टय़ आहे आणि ते म्हणजे या भव्य फेस्टची धुरा चार मुलींच्या खांद्यावर आहे.
या वर्षी मल्हारच्या कोअर कमिटीवर केवळ मुली आहेत. मलोनी दोषी ही कोअर कमिटीची चेअर पर्सन आहे. तिच्या जोडीला तीन वाइस चेअर पर्सन्स आहेत. अवंती पटेल – वाइस चेअर पर्सन (इव्हेंट्स), सिद्धी सुभेदार (मॅनेजमेंट) आणि झील गाडा (कॉन्क्लेव्ह) या चार मुली यंदाच्या मल्हार फेस्टच्या मुख्य कार्यकर्त्यां आहेत. चार मुली एकत्र आल्या की, तिथे वाद होतातच, असा एक गैरसमज आहे. या चौघींकडे बघता आणि त्यांच्या कामाचा झपाटा बघता तो नक्कीच गैर असणार याची शंका वाटत नाही.
मल्हार फेस्टचा कारभार मोठा आहे. एखाद्या कसलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीप्रमाणे याचं आयोजन केलं जातं. १२०० पेक्षा जास्त व्हॉलेंटिअर्स आणि २० कमिटय़ा यासाठी राबत असतात. राज्यभरातून या कॉलेजसाठी विद्यार्थी येतात. इतका मोठा पसारा हाताळताना येणाऱ्या अनुभवाबद्दल सिद्धी सांगते, ‘मल्हार हा एक मस्त अनुभव आहे. या वर्षी सुपूर्ण मुलींची कोअर कमिटी आहे आणि ही गोष्ट मुलींची शक्ती दर्शवते. वाइस चेअर पर्सन असल्यामुळे अर्थातच खूप खंबीर असावं लागतं. कामं करून घ्यावी लागतात. कारण या वर्षीचा मल्हार प्रत्येक दृष्टीने एक नवीन गोष्टीची उंची गाठत आहे आणि संपूर्णपणे मुलीचं क्वार्टेट हे त्यामधीलच एक आहे.’
ही मोठी जबाबदारी पेलण्याचा अनुभव विचारल्यावर अवंती म्हणते, ‘मल्हारची तयारी अनेक महिने चालू आहे आणि मल्हारमुळे अनेकांप्रमाणे मलाही खूप काही शिकायला मिळतंय. आम्ही मुली असलो तरीही आम्हाला संपूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. फक्त आमच्या सुरक्षेसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. अॅडमिनिस्ट्रेशनच्या बदलीमुळे थोडे प्रॉब्लेम आले, पण त्या मानाने सर्व काही खूप सुरळीत पार पडलं.’
यंदा ‘यार्डसेल’सारखा सामाजिक उपक्रम असेल शिवाय कॉमिक कॉन, चित्र प्रदर्शन, द म्युजिकल, फ्युजन डान्स, लिपसंग, कठपुतली के राज अशा कलात्मक स्पर्धा असणार आहेत.
शांभवी मोरे – viva.loksatta@gmail.com