विनोद आणि मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती हे घट्ट बांधलेलं समीकरण आहे. विनोदाच्या या सगळ्या प्रवासात तरुणाईला नव्याने सापडलेलं त्यांच्या खास आवडीचं स्टेशन म्हणजे स्टॅन्डअप कॉमेडी. तरुणाईच्या ट्रेण्डमधला स्टॅन्डअप कॉमेडी हा विषय फार खोल झाला आहे.
आपल्या कलेला जितका भक्कम आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे तेवढीच समृद्ध आहे मराठीतील विनोदी शैली. दादा कोंडके, शरद तळवलकर यांच्यापासून ते नंतर सगळ्यांचा आवडता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले, मच्छिन्द्र कांबळी अशी हास्यसम्राटांची ही यादी न संपणारी आहे. आता विविध भाषांमध्ये कॉमेडी शैलीची पाळंमुळं रुजलेली दिसली तरी याची सुरुवात मराठी मनोरंजन क्षेत्रापासूनच झाली. त्याच्याही थोडं मागे जाऊन अभ्यास करायचा ठरवलं तर मराठी साहित्य आणि विनोद ही गोष्ट पु. ल. देशपांडे यांच्यापाशी येऊन थांबते! विनोद हा सहज आणि भावपूर्ण असू शकतो हे पुलंनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून दाखवलं. विनोद करायला आणि अनुभवायला वयाची सीमा नसते, शाब्दिक कोट्यांपासून ते तात्त्विक मुद्द्यापर्यंत विनोद सगळ्यातच लपलेला असतो हेही त्यांनी दाखवून दिलं. सांगायचा मुद्दा हा की विनोद आणि मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती हे घट्ट बांधलेलं समीकरण आहे. विनोदाच्या या सगळ्या प्रवासात तरुणाईला नव्याने सापडलेलं त्यांच्या खास आवडीचं स्टेशन म्हणजे स्टॅन्ड-अप कॉमेडी. तरुणाईच्या ट्रेण्डमधला स्टॅन्ड-अप कॉमेडी हा विषय फार खोल झाला आहे. ही फक्त एक कला किंवा छंद उरलेला नसून, तरुणाई याकडे करिअर म्हणून पाहते आहे.
तरुणाईचा लाडका स्टॅन्ड-अप कॉमेडियन अनिश गोरेगावकर सांगतो, ‘तरुणाईकडे विनोदनिर्मिती करण्यासाठी खूप विषय आहेत, पण ते ऐकायला फारसं कोणी नसतं. स्टॅन्ड-अप कॉमेडी हा विषय भारतात सध्या फक्त मनोरंजन म्हणून मर्यादित आहे, परंतु त्याच्या पलीकडे एक व्यक्ती त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोन तुमच्यापुढे मांडत असतो. तो त्याची विचारशैली मांडत असतो. आपला विचार, म्हणणं कोणीतरी ऐकतंय, त्यांना ते आवडतं आहे हेच तरुणाईला भावतं. म्हणूनच सध्या तरुणाई स्टॅन्ड अप कॉमेडीकडे करिअर म्हणून बघते आहे असं वाटतं’.
हेही वाचा : फेनम स्टोरी: घर देता का घर?
२०१६-१७ च्या आसपास मराठी स्टॅन्ड-अप कॉमेडीला थोडं वलय मिळू लागलं, कारण कलाकारांच्या छोटेखानी संस्था ओपन माईकचे आयोजन करू लागल्या. ओपन माईक हा प्रकार विशेषत: फक्त तरुणांसाठीच असायचा आणि विशेष म्हणजे त्याला भरघोस प्रतिसाद मिळू लागला. तरुणांना अशा पद्धतीने आपली मतं, अनुभव आणि विचार मांडणं आवडू लागलं. महाराष्ट्रात सध्या असे खूप तरुण आहेत जे नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने गावातून मुंबई-पुण्यासारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांना स्टॅन्ड-अप कॉमेडी हा खरंतर आपल्या अभिव्यक्तीचा मंच वाटतो. याबद्दल बोलताना स्टॅन्ड अप कॉमेडी हा एक आरसा आहे. एखाद्या गोष्टींबद्दल आम्ही विनोद करतो आणि लोक हसतात, कारण ती त्यांच्याशीही संबंधित असते, त्यांच्याबरोबरही ते घडलेलं असतं. अनेकदा असंही होतं की एखाद्या बऱ्यावाईट अनुभवातून जात असताना चला… आज आपल्याला शोसाठी एक नवीन कन्टेन्ट मिळाला हा विचारही चमकून जातो, असं अनिश सांगतो.
स्टॅन्ड-अप कॉमेडी तरुणांना आवडण्यामागचं अजून एक मोठं कारण म्हणजे त्या मागे वैयक्तिक अभिरुची आहे. प्रत्येकाकडे स्वत:ची अशी कला सादरीकरणारी वेगळी शैली आहे. विनोदी शैली ही म्हटलं तर फार सहज आणि म्हटलं तर भयंकर अवघड अशी गोष्ट आहे. विनोदाची निर्मिती करायला खरंतर फक्त बारीक निरीक्षणशक्तीची आवश्यकता असते. त्यात फार असं काही गूढ गुपित दडलेलं नाही, असंही अनेक तरुण स्टॅन्ड-अप कॉमेडियन सांगतात.
स्टॅन्ड अप कॉमेडी सादर करताना कलाकारांना ‘क्राउड स्टडी’ करावाच लागतो. तुम्ही जिथे सादरीकरण करताय तो प्रेक्षकवर्ग नक्की कसा आहे, त्यांना काय आवडतं, त्यांची काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. विनोदनिर्मिती किंवा स्टॅन्ड-अप कॉमेडी करणं यासाठी लिखाण आणि अभ्यास दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींमधूनच विनोद निर्मिती करणं सहजशक्य असतं, असंही निरीक्षण हे तरुण कलाकार नोंदवताना दिसतात. मराठी भाषा वळवावी तशी वळते, त्यामध्ये अनेक विशेष शब्द आहेत, विशेषणं आहेत, प्रत्येक प्रांताचा एक लहेजा आहे त्यामुळे या सगळ्याच्या भन्नाट मिश्रणातून कमालीची समृद्ध, सखोल विनोदनिर्मिती होऊ शकते.
हेही वाचा : सफरनामा : ‘पुष्प’ राज
स्टॅन्ड-अप कॉमेडी हा प्रकार अजूनतरी थोडा नवीन आणि तरुणाईच्या प्रयोगशीलतेतूनच निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याचे आशय-विषय अजून जास्तीत जास्त अभ्यासले जातील. समाजासाठी विनोद किती महत्त्वाचा आहे, याबद्दल बोलताना, कलेमुळे समाज बदलतो आणि समाजामुळे कलेमध्येही बदल घडून येतो. आपली कला जर लोकांना आवडली तर लोक त्यातला विचार फॉलो करतात. अशाप्रकारे कलेच्या माध्यमातून लोक त्यांचे रोल मॉडेलसुद्धा निवडतात. कलेच्या माध्यमातून आपली आणि पर्यायाने समाजाची प्रगती होत असते. अनेकदा असंही होतं की एखादा नवीन विचार मांडल्यानंतर लोकांना तो आवडला तर तो ते आत्मसात करतात किंवा तसं वागायलाही लागतात, असं मत अनिशने व्यक्त केलं.
पुण्याची स्वीटी महाले ही सध्या नोकरीबरोबर छंद म्हणून स्टॅन्ड-अप कॉमेडीचे शो करते. ‘या क्षेत्रात मुलांचे दोन प्रकार आहेत. काहींना खरंच यात रस आहे आणि काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे, तर काहींना फक्त कूल दिसायचं आहे म्हणून ते स्टेजवर परफॉर्म करतात’ असं स्वीटी सांगते. स्टेजवर सादरीकरण करताना कुठल्या पद्धतीचा विनोद करायचा याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. समोरचा प्रेक्षक जर वयाने बुजुर्ग असेल तर बऱ्याचदा स्क्रिप्ट लिहून शो करावा लागतो. अगदी ट्रेण्डी विनोद त्यांना रिलेट होत नाहीत. काही विनोद हे फक्त निरीक्षणावर आधारित असतात. काही डार्क कॉमेडी पद्धतीचे असतात. हे क्षेत्र अजून पूर्णपणे प्रगत झालेलं नाही त्यामुळे आमच्यासारख्या तरुण कलाकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारं काम करून स्टॅन्ड अप कॉमेडी करण्याची हौस भागवावी लागते, असंही स्वीटीने सांगितलं.
हेही वाचा : तरुणाईचे ट्रेण्डिंग संस्कृत
स्टॅन्ड अप कॉमेडी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जास्त प्रचलित आहे, पण मराठीत या प्रकाराला अधिक वाव मिळायला हवा, असं या तरुण कलाकारांना वाटतं.
तरुण पिढी या कलेद्वारे एक नवा अध्याय समाजात रुजवू पाहते आहे. हे करताना ते थोडं चुकतील, गडबडतील पण त्यांचा हेतू समाज घडवण्याचा आणि मोठं करण्याचाच आहे. ही कला वाढवण्यासाठी तरुणाईबरोबरच समाजानेही प्रयत्न करायला हवेत. स्टॅन्ड-अपचे शो सिनेमांसारखेच हाऊसफुल्ल करत त्याचा निखळ आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. तरुणाईच्या एकत्रित प्रयत्नातून स्टॅन्ड अप कॉमेडीसारखी कला वाढत असेल तर त्याचा भाग होऊन त्याला मनोरंजनाचं बौद्धिक समाधान मिळवून देणारं साधन म्हणून मान्यता द्यायला हवी.
viva@expressindia.com