वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सिक्रेट मराठी स्टँडअप’च्या माध्यमातून ‘भारतीय डिजिटल पार्टी’च्या फॅन्स आणि श्रोत्यांना परिचित असलेली आणि ‘भाडिपा’च्या यूटय़ूब चॅनेलवरच्या व्हिडीओजमधून व्हायरल झालेली ‘सावनी वझे’. लॉच्या तिसऱ्या वर्षांला असलेली मुंबईची सावनी केवळ स्टँडअप कॉमेडीच नव्हे तर सोशल वर्कही मनापासून करते.

कायद्याचं शिक्षण घेताना, अर्थात लॉ करताना एका बाजूला तिने स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली. ‘सिक्रेट मराठी स्टँडअप’च्या माध्यमातून ‘भारतीय डिजिटल पार्टी’च्या फॅन्स आणि श्रोत्यांना परिचित असलेली आणि ‘भाडिपा’च्या यूटय़ूब चॅनेलवरच्या व्हिडीओजमधून व्हायरल झालेली ‘सावनी वझे’. लॉच्या तिसऱ्या वर्षांला असलेली मुंबईची सावनी केवळ स्टँडअप कॉमेडीच नव्हे तर सोशल वर्कही मनापासून करते. वयाने लहानशी असली तरी अल्पावधीतच ती तरुणाईमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तिने लिहिलेली आणि तिच्या सादरीकरणात ऐकलेली तिची वाक्यं तरुणाईच्या तोंडून वारंवार ऐकायला मिळतात. एरव्हीही सावनीला एका वेळी एकच काम करायचा कंटाळा येतो. त्यामुळे अनेक गोष्टींची आवड जोपासणारी सावनी सध्या कायद्याचा अभ्यास, स्टँडअप कॉमेडी आणि समाजकार्य असं तीनही एकाच वेळी लीलया सांभाळते आहे.

लॉ म्हटलं की रूक्ष विषय अशी आपोआपच समजूत होते. त्यातूनही आपली विनोदबुद्धी सतत ताजीतवानी ठेवणारी सावनी तिच्या ‘भाडिपा’मधील प्रवेशाबद्दल सांगते, ‘‘मी एके ठिकाणी इंटर्नशिप करत होते. तेव्हा भाडिपाचे व्हिडीओज फॉलो करणं हा माझा आवडता विरंगुळा होता. मी आणि माझ्या एका सीनियरने एकमेकांना डेअर म्हणून, चॅलेंज म्हणून, भाडिपामध्ये अप्लाय करायचं ठरवलं होतं. माझ्या मेलला सारंग साठय़ेचा रिप्लाय येणं ही गोष्टच माझ्यासाठी एवढी भारी होती की सहज म्हणून मी केलेल्या अ‍ॅप्लिकेशनला मग मी सीरियसली घेतलं.’’ भाडिपात शिरल्यावरचा अनुभवही सावनी त्याच उत्साहाने सांगते.

‘‘मी त्यांच्या जॅमिंग सेशनला गेले. माझी लेखनाची पद्धत, स्टाइल, त्यातला कन्टेन्ट असं सगळंच त्यांना अर्थात पाहायचं होतं.

मात्र ती कोणतीही ऑडिशन नव्हती.

माझ्यावर लहानपणापासून पुलंचे संस्कार झाल्यामुळे असेल, पण बोलताबोलता सहज विनोद सुचायला मला प्रचंड कष्ट पडत नव्हते. अर्थात स्टँडअप कॉमेडीसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक गोष्टी भाडिपामध्ये जाऊ न मला कळल्या आणि शिकायलाही मिळाल्या,’’ असं सावनी सांगते. भाडिपामध्ये तृप्ती खामकर आणि पॉला या दोघींनी मला स्टँडअप कॉमेडीमधले बारकावे समजावून दिले. ते बोलणं कृत्रिम किंवा स्क्रिप्टेड वाटता कामा नये, उलट ते जितकं उत्स्फूर्त येईल तितकं चांगलं. मग त्यासाठी स्वत:ला सादरीकरणाच्या वेळी रिजिड ठेवून चालणार नाही, थोडय़ाफार आराखडय़ावर आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर परफॉर्मन्स हळूहळू उभारावा लागतो हे त्यांनी मला शिकवलं, अशी माहिती तिने दिली.

कॉमेडी ही अशी गोष्ट आहे, की समोरचा प्रेक्षक हसला तरच आपली कॉमेडी यशस्वी, अन्यथा सगळं मुसळ केरात! एखादी व्यक्ती परोपरीने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करते आहे आणि प्रेक्षकांना त्यातलं काहीही आवडत नाही आहे, अशा वेळी त्या परफॉर्मरची अत्यंत तारांबळ उडते. नेमक्या त्याच वेळी गरज असते ती सगळं धैर्य एकवटून आपला परफॉर्मन्स पूर्ण करण्याची! असे प्रसंग सर्वच कलाकारांच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. अशा अनुभवांबद्दल बोलताना सावनी म्हणते, ‘‘आपल्या एकाही विनोदाला कोणी हसत नाहीये असं दिसलं तर टेन्शन साहजिकच येतं; पण त्या वेळी स्वत:ला सावरून आपला परफॉर्मन्सही सावरून घ्यावा लागतो. समोरच्या प्रेक्षकांची प्रवृत्ती बघून आपलं बोलणं बदलावं लागतं. कधीकधी स्वत:बद्दलच काही विनोद करावे लागतात, कधी आपल्या ठरलेल्या स्क्रिप्टचा फार आग्रह न धरता पुढे जावं लागतं. आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाहीये याबद्दलचे विचार डोक्यात येत असतात, पण ते बाजूला ठेवून तो परफॉर्मन्स पूर्ण करण्यावर लक्ष द्यावं लागतं.’’

स्टँडअप कॉमेडी ही आजकाल भरात आलेली गोष्ट आहे. स्टँडअप कॉमेडीकडे करिअर म्हणून बघण्याची मानसिक तयारी अजून पूर्ण व्हायची आहे. मात्र तरुणाईमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे आणि या क्रेझपोटीच अनेक जण या क्षेत्रात येण्याचे प्रयत्न करत असतात. काहींना अचानकपणे यातून प्रसिद्धी मिळते आणि नंतर मात्र मिळालेल्या या प्रसिद्धीला हँडल कसं करायचं हे त्यांना समजत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर या प्रसिद्धीचा प्रत्यय वारंवार येत राहतो आणि फॅन्सही सहजपणे एखाद्यापर्यंत पोहोचू शकतात. या सगळ्यात स्वत:चे पाय जमिनीवर ठेवणं खूप अवघड तरीही गरजेचं असतं. याबद्दल सावनी म्हणते, ‘‘आपलं वयच असं आहे की, आपल्याला ही प्रसिद्धी मिळाली म्हणजे सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटायला लागतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे गोष्टींची आपल्याला लगेच भुरळ पडते; पण खरं सांगू का, ही प्रसिद्धी खूप क्षणिक असते असं मला वाटतं.’’ मात्र या प्रसिद्धीपासून सावध होण्यासाठी स्वत:च्या मनाची तयारी करावी लागते, असेही ती अनुभवाने सांगते. ‘‘आज माझा व्हिडीओ आला तर काही दिवस, फार फार तर काही महिने लोकांना मी लक्षात असेन, नंतर मला लोक विसरलेले असतील. ही प्रसिद्धी लगेच मनावर घेतली तर आपण स्वत:ला लगेच मोठे समजायला लागतो आणि हा आपला समज आपल्याला पुढे अजून प्रगती करूच देत नाही,’’ असे सावनी स्पष्टपणे सांगते.

सावनी कायद्याचा अभ्यास तर जोमाने करतेच आणि त्याच्यासोबतच तिचे शोजही सांभाळते. ‘युवा मोरया’ या सोशल वर्कर ग्रुपसोबतही ती उत्साहाने काम करते. एका वेळी एकच गोष्ट करणं हे तिच्या स्वभावातच नाही. भविष्यात हायकोर्टात प्रॅक्टिस करायची तिची इच्छा आहे. लॉचा अभ्यास आणि स्टँडअप कॉमेडी हे दोन्ही सांभाळणाऱ्या सावनीला या दोन्ही आघाडय़ांवर यशस्वी व्हायचं आहे, असं ती तितक्याच आत्मविश्वासाने सांगते.

आज माझा व्हिडीओ आला तर काही दिवस, फार फार तर काही महिने लोकांना मी लक्षात असेन, नंतर मला लोक विसरलेले असतील. ही प्रसिद्धी लगेच मनावर घेतली तर आपण स्वत:ला लगेच मोठे समजायला लागतो आणि हा आपला समज आपल्याला पुढे अजून प्रगती करूच देत नाही.

सोशल मीडियावर आजकाल पटकन व्हायरल प्रसिद्धी मिळते. मात्र त्याला खरं मानून आपण चाललो तर आपलं करिअर फार उच्च ठिकाणी पोहोचणार नाही हे निश्चित. याउलट प्रत्येक टप्प्यावर विचार केला, सतत आपल्या कामात काही तरी नवीन देत राहायचा प्रयत्न केला तर आपल्यालाही त्याचं समाधान मिळतं आणि आपल्या कामालाही आपण पूर्ण न्याय देऊ  शकतो.

– सावनी वझे

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standup savni vaze youtube bhadipa abn