थर्टिफस्ट आता फक्त तीन दिवसांवर आलाय! नाचायला कुठं जायचं, ड्रेस कुठला घालायचा, क्लबचे पासेस कोण पैदा करणारेय, कुणाच्या गाडीतनं, कुणाबरोबर जायचंय, शेवटपर्यंत न झिंगणारे आपल्यापैकी कोण गाडय़ा चालवणारेत, अशा सगळ्या धामधुमीत सध्या बहुतेक तरुणाई व्यस्त असेल! वारुणीशी सलगी नसलेले मित्र वर्षभर फुटकळ किंवा लिंबूटिंबू वाटले तरी थर्टिफर्स्टच्या रात्री मात्र त्यांचा भाव अचानक वधारतो आणि त्यांना खूप डिमांड येतो! असो!
इयरएण्डची पार्टी पुरेपूर एन्जॉय करण्यासाठी खाणं, पिणं आणि नाचणं या तिन्ही बाबतींत गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये मी बऱ्याच टिप्स दिल्या होत्या. त्या तुमच्या लक्षात असतीलच. थर्टिफर्स्टला एकत्र जमून गप्पाटप्पा करणारे, सिनेमे पाहणारे, ट्रिपला जाणारे किंवा घरीच बसून टीव्हीवरची करमणूक पाहणारेही अनेकजण असतील. शेवटी प्रत्येकाला कशातून आनंद मिळेल ते ज्याचं त्यानंच ठरवावं.
या वर्षांच्या सुरुवातीला आपण सगळ्यांनी रोज व्यायाम करण्याचा आणि फिटनेस वाढवण्याचा संकल्प केला होता. बघता बघता अख्खं वर्ष संपलं! मला नक्की माहित्येय की हा संकल्प पाळलेल्यांची संख्या खूप कमी असेल आणि त्याउलट काही ना काही कारणानं हा संकल्प बहुतेकांनी मोडला असेल. पण हरकत नाही. या वर्षी नव्यानं आपण व्यायामाचा आणि फिटनेसचा संकल्प करूयात आणि पाळूयात.
मला माहीत आहे की तुम्ही सगळे फेस्टिव्ह मूडमध्ये आहात. तरीसुद्धा इयरएण्डच्या निमित्तानं मला तुम्हाला काही सांगायचंय. फिजिकलबरोबरच मेंटल फिटनेस
तुमच्यापैकी जे खूप जाड आहेत, त्यांनी या वर्षांच्या सुरवातीला ‘मी रोज फक्त ५०-१०० ग्रॅम वेटलॉस करीन, त्याशिवाय रात्री झोपणार नाही’ असा नियम केला असता, तर आज तुमचा फिटनेस किती वाढला असता त्याचा तुम्हीच गंभीरपणे विचार करा. मला सांगा, रोज फक्त ५०-१०० ग्रॅम वेटलॉस करणं अवघड आहे का हो? पण एकेक दिवस आपण कंटाळा करतो आणि शेवटी त्याची फळं भोगायची वेळ येते तेव्हा पश्चात्ताप करायची पाळी येते. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की आगामी वर्ष ‘फिटनेस इयर’ म्हणून ठरवा आणि व्यायामाच्या बाबतीतला कंटाळा कटाक्षानं टाळा.
सरलेल्या वर्षांत आपण पैसे किती मिळवले, यश किती कमावलं याचा जसा विचार करतो त्याचबरोबर ‘ज्या शरीराच्या जीवावर मी हा पैसा, हे यश मिळवतोय त्या शरीरासाठी मी काय केलं?’ याचाही विचार करा म्हणजे पुढच्या वर्षीचा व्यायामाचा संकल्प मोडणार नाही. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीप्रमाणे निरोगी आणि सशक्त शरीर आणि तंदुरुस्त मन असेल तरच तुमच्या जगण्याला आणि इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याला अर्थ आहे. ‘इफ यू डोण्ट हॅव्ह टाइम फॉर युवर फिटनेस टुडे, देन यू विल हॅव्ह टु फाइण्ड टाइम फॉर युवर इलनेस टुमॉरो’ हे कोटेशन व्यायामाचा कंटाळा करणाऱ्या प्रत्येकानं कायम लक्षात ठेवावं.
माझ्या माहितीतल्या अनेक तिशी-चाळिशीतल्या लोकांना बी.पी., डायबेटीसच्या गोळ्या खाणं किंवा कोलेस्टेरॉल वाढणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल वाटतो! बिझनेस पाटर्य़ामध्ये हा एक हमखास चर्चेचा विषय असतो आणि तिथं ‘इट इज पार्ट अॅण्ड पार्सल ऑफ माय सक्सेस’ असं ते मोठय़ा अभिमानानं सांगतात! किती चुकीची मानसिकता आहे ही! अशा लोकांचा मेंटल फिटनेस म्हणजे मानसिकता सुधारण्याची जास्त आवश्यकता आहे. बी.पी., डायबेटीस, ओबेसिटी अशा रोगांपेक्षाही मला सततच्या मेंटल स्ट्रेसची जास्त काळजी वाटते. कारण बहुतेक आजाराचं मूळ तिथं असतं. मानसिक ताण कसा कमी करायचा, यावर पुढील वर्षांत मी विशेष भर देणार आहे.
वाचकहो, २०१२ मध्ये तुम्ही ‘व्हिवा’ला आणि माझ्या सदराला उदंड प्रतिसाद दिलात. जशा रेसिपी केल्यात, तसे माझे व्यायामही केलेत. मराठी तरुण वर्गाच्या सगळ्यात लोकप्रिय असलेल्या ‘व्हिवा’ पुरवणीला, ही पुरवणी सातत्यानं अधिकाधिक आकर्षक आणि वाचनीय करणाऱ्या तिच्या संपादकांना आणि त्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या तुम्हा सर्वाना नवीन वर्षांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा